२८ व २९ जानेवारी ला अंबाजोगाईत गुनीजान संगीत समारोहाचे आयोजन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230125-WA0205-1024x755.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230125-WA0205-1024x755.jpg)
२८ व २९ जानेवारी रोजी अंबाजोगाईत गुनीजान समारोहाचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसीय या सांगितिक कार्यक्रमात मान्यवर कलावंतांची हजेरी लागणार असून या समारोहात रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील एक ग्रामीण शहर आद्यकवी मुकुंदराज व दासोपंत यांची कर्मभूमी असलेले शहर. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणाबरोबरच भारतीय पारंपारिक अभिजात कलाविष्कारांना स्थानिय तसेच जवळपास असलेल्या तालुका व ग्रामिण भागातील रसिक जनतेचे अनन्यसाधारण प्रेम मिळते आणि मिळत आहे. अशा या सुंदर शहरात जन्म घेतलेल्या युवा पिढीच्या भाग्यश्री देशपांडे पाटिल यांनी ग्रेस फाउंडेशन चे प्रवर्तक शशी व्यास यांना अंबाजोगाई येथे भारतीय अभिजात संगीताचा एक द्वि-दिवसीय महोत्सव त्यांचे दादागुरू सुविख्यात गायक पद्मभूषण पं. सी. आर. व्यास उर्फ “गुनीजान” यांना मानवंदना म्हणून प्रतिवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शनिवार-रविवार रोजी करण्याचा विनंतीपूर्वक आग्रह केला. त्याची परिणीती म्हणजेच “ग्रेस फाउंडेशन” तर्फे गुनीजान संगीत समारोहाचे आयोजन.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230125-WA0204-1024x689.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230125-WA0204-1024x689.jpg)
“गुनीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन” अर्थात “ग्रेस फाउंडेशन” ही बिना नफा तत्वावर चालणारी संघटना असून, आपल्या देशातील विविध भागांमधील भारतीय सादरीकरण कला (इंडियन परफॉर्मिंग आर्ट) शी निगडीत सर्व घटकांना एकाच मंचावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्टे टूगेदर ग्रो टूगेदर अर्थात एकत्र रहा एकत्र समृद्ध व्हा. या तत्वावर या – – संघटनेचे कार्य चालते. परफॉर्मिंग आर्टशी निगडीत विविध कलाकार भागीदार आणि देशातील विविध प्रदेशामधील दुवा साधण्यावर तिचे लक्ष आहे.
“ग्रेस फाउंडेशन” हे मुंबईत स्थित संगीत क्षेत्राशी निगडीत श्री. शशी व्यास “पंचम निषाद” या अग्रगण्य कला कंपनीचे संस्थापक यांची संकल्पना आहे. या फाउंडेशनचे उदिष्ट हे शास्त्रीय संगीत गायक, वादक, नृत्य कलाकार, लोक आणि सुगम संगीत कलाकार इत्यादी. भारतीय सादरीकरण कला क्षेत्राशी संबंधित निरनिराळ्या प्रतिभावंतांच्या अस्सल क्षमतांना वाटा देण्याचे आहे. ज्यांनी भारत आणि जगातील लक्षावधी संगीत प्रेमींचे आयुष्य समृद्ध केली आहेत. अशा या “ग्रेस फाउंडेशन” मुंबई यांनी अंबाजोगाई सारख्या ग्रामीण शहराची निवड करुन “गुनीजान” हा संगीत समारोह अंबाजोगाई मध्ये घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे गतवर्षी २०२२ मध्ये १ व २ जानेवारी रोजी अतिशय दर्जेदार कलावंतांच्या हजेरीने गुनीजान समारोह गाजला. प्रति वर्ष जानेवारीमध्येच या महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे “ग्रेस फाउंडेशन चे सर्वेसर्वा शशी व्यास यांनी सांगितले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-1828355039-1674632290876-300x129.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-1828355039-1674632290876-300x129.jpg)
या वर्षी “गुनीजान संगीत समारोह” काही तांत्रिक अडचणीमुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्या ऐवजी शेवटच्या आठवड्यात २८ व २९ जानेवारी रोजी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात घेण्याचे निश्चित केले. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन सत्रांमध्ये कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले. रसिकांनी दोन्ही दिवसात होणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून,प्रवेशिकाद्वारे सभागृहात प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमाची रूपरेखा खालील प्रमाणे असून प्रवेशासाठी प्रवेशिका बंधनकारक आहेत. असेही नमूद केले आहे.
२८ जानेवारी २०२३ रोजी शनिवार रोजी सायं. ६ वाजता गुनीजान संगीत समारोहाची सुरुवात परदेशातून बासरी वादनाचे शिक्षण घेण्यासाठी भारतात आलेले मुंबई येथील प्रख्यात बासरी वादक नॅश नॉबर्ट यांचे बासरी वादनाने होईल, त्यांना तबल्याची साथ अंजिक्य जोशी (पुणे) हे करतील. त्यानंतर बेंगलोर येथील युवा पिढीतील आश्वासक गायक सिद्धार्थ बेलमन्नु यांचे गायन होईल, त्यांना हार्मोनियमची साथ सिध्देश बिचोलकर (मुंबई) व तबला साथ अजिंक्य जोशी हे करतील.
२९ जानेवारी २०२३ रविवार रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात वरदराज भोसले (कोल्हापूर) यांच्या सतार वादनाने होईल. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य जोशी
हे करतील. त्यानंतर संजीव चिमलगी (मुंबई) यांचे गायन होईल, त्यांना साथसंगत सिध्देश बिचोलकर व महेश कानोले (नवी मुंबई) करतील. त्याच दिवशी सायं. ६ वा. भाग्यश्री देशपांडे- पाटील यांचे गायन होईल, त्यांना साथ संगत सिध्देश बिचोलकर आणि महेश कानोले हे करतील. गुनीजान संगीत समारोह महोत्सवाचा समारोप सतीश व्यास (मुंबई) यांच्या संतूर वादनाने होईल. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य जोशी हे करतील. कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या प्रवेशिका सभागृहावर डॉ. निशिकांत पाचेगांवकर ९४२३६१२३११, डॉ. प्रशांत देशपांडे (मेडिकल कॉलेज) ९४२२९३००२०, दगडू लोमटे (अनुश्री खादी भांडार) ९८२३००९५१२, प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी (S.R.T. कॉलेज), प्रकाश बोरगांवकर
(निषाद रेकॉर्डिंग स्टुडीओ ७५१७६६४६१ यांचे कडे उपलब्ध होतील.
कार्यक्रमा विषयी बोलताना भाग्यश्री देशपांडे- पाटील यांनी या समारोह विषयी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गेल्या चार वर्षापासून ग्वालेर आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक व गुरु सुहास व्यास यांच्याकडे त्या शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. चार वर्षात त्यांना आपले दादागुरु गुनीजान यांची भारतीय अभिजात संगीतात केलेल्या भरीव कार्याची महती कळाली. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, पंडित सी. आर. व्यास यांनी संगीतामध्ये नवीन रागांची निर्मिती केली, अनेक रागांमध्ये बंदिशींच्या रचना “गुनीजान” या नावाने प्रचलित केल्या. त्यांच्या बंदिशमध्ये गुरुभक्ती आणि अध्यात्म याचे दर्शन होते. अनेक गायक गायिका घराण्याची चौकट पार करून त्यांच्या रचना गातात. त्यांच्या सृजनशील कर्तुत्वाला मानवंदना म्हणून आपल्या जन्मगावी प्रति वर्ष दोन दिवसाचा संगीत समारोह आयोजित करण्याचा आग्रह त्यांनी पंचम निषाद” चे सर्वेसर्वा शशीजी व्यास यांच्याकडे धरला आणि तो गुनीजान संगीत समारोह द्वारे सिद्धीस नेला. सदर समारोह प्रति वर्ष] जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील शनिवार आणि रविवारी होणार असल्याचे पण त्यांनी सांगितले आहे.