महाराष्ट्र
१९ मार्च ला विशेष अधिवेशन बोलवा; किसानपुत्र आंदोलनाची मागणी

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची मागणी
19 मार्च (शेतकरी सहवेदना दिवस) रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना निश्चित कराव्यात. अशी मागणी किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केली आहे.सभापती, विधानसभा, महाराष्ट्र यांना आज किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे यांच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या दुर्दैवी घटनेला आज 39 वर्षे होत आहेत. या घटनेने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यानंतर सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. अत्यंत खेदजनक बाब अशी की, देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात होत आहेत. असे घडतांना देखील, महाराष्ट्र विधानसभेने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त केली नाही. दोन मिनिटे मौन पाळून साधी श्रद्धांजली देखील अर्पण केली नाही.

आमचे असे निरीक्षण आहे की, आज शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 10 ते 15 टक्के राहिली आहे. जेंव्हा 50 ते 60 टक्के संख्या होती तेंव्हा महाराष्ट्रात रोज 7 शेतकरी आत्महत्या करीत होते. आज शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली तरी तेवढ्याच आत्महत्या रोज होताना दिसतात. याचा अर्थ एवढाच की, शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवरील संकट वाढले आहे. येथे हेही लक्षात घ्यावे की, एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ९५ टक्के आत्महत्या शेती शिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नसणाऱ्या कुटुंबात झाल्या आहेत.

