१९ मार्च रोजी एक दिवस ; अन्नदात्यासाठी अन्नत्याग !


आत्महत्या केलेल्या शेतक-यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतक-यांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी १९ मार्च रोजी देशभरातील किसान पुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार आहेत.
या ही वर्षी देशाच्या भिन्न राज्यात तसेच जगातील भिन्न देशातही एक दिवस उपवास केला जाणार आहे.
१९ मार्च १९८६ या दिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असहय्य झाल्यामुळे आपली चार लहान मुल आणि पत्नी सह आत्महत्या केली होती. साहेबराव करपे हे चिल गव्हाण (यवतमाळ) येथील राहणारे. संगीताचे जाणकार होते. ११५ एकर जमीन चे मालक, गावच्या सरपंच पदाची धुरा त्यांनी सलग ११ वर्षे सांभाळली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी शेतक-यांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सरकारने लक्ष दिले नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सुरू झालेले हे सत्र आजही थांबले नाही. सुमारे साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चाळीस ते पन्नास शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. सरकारे बदलली पण शेतक-यांचे हाल थांबले नाहीत.


▪️आपण काय करू शकतो?
आपण सरकार नाहीत. आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात क्रुर कायदे बदलण्याचे अधिकार नाहीत. मी साधा विचार केला. आपल्या घरात अशी घटना घडली तर आपण काय करतो? किमान एक दिवस आपल्याला घास जाणार नाही. बस हाच विचार १९ मार्चच्या उपवासाच्या मागे आहे.
ज्यांना शक्य असेल ते सामुहिक रित्या एके ठिकाणी बसून उपवास करू शकतात, पण ज्यांना बसणे शक्य होणार नाही, त्यांनी आपापले काम करीत उपवास करावा. हवे तर उपवास सोडण्यासाठी एकत्र जमावे. तेही शक्य नसेल तर सोशल मीडियावर जाहीर करावे.
हा उपवास कोणा एका पक्षाचा किंवा संघटनेचा नाही. प्रत्येक संवेदनशील व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकतो. अगदी सरकारी कर्मचारी देखील १९ मार्चला उपवास करू शकतात.


▪️उपवास करायचा उपवास?
आपण हा उपवास का करायलाच हवा कारण अन्नदात्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आज तो संकटात सापडला आहे. हा उपवास करून आपण अन्नदात्याला दिलासा द्यायचा आहे. शेतक-यांची मुलं-मुली आज शहरात गेली असली तरी ती शेतकऱ्याला विसरलेली नाहीत, याची जाणीव करून द्यायची आहे. शेतक-यांप्रती आपली प्रतिबद्धता बळकट करायची आहे.
हा उपवास कोणत्या मागणी साठी नाही पण शेतकरी आत्महत्या का करत आहेत? शेतक-यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत?
त्या थांबाव्यात या साठी काय केले पाहिजे? त्यासाठी मी काय करू शकतो? याचा विचार करण्यासाठी एक दिवसाचा हा उपवास आहे.


होय, एक दिवस उपवास केल्याने प्रश्न सुटणार नाही हे खरे, पण प्रश्न सुटण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल यात शंका नाही.
आपण जेथे आहात तेथे हा एक दिवसाचा अन्नत्याग करता येईल. तुम्ही कोण्या पक्षाचे, संघटनेचे असा, कोणत्याही विचारसरणीचे असा, व्यावसाय किंवा नोकरी करणारे असा, 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करा! असे नम्र आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने आम्ही करीत आहोत.
अमर हबीब
8411909909
सुदर्शन रापतवार
7218309333