महाराष्ट्र
स्वाराती च्या स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाचे स्वतंत्र ऑडिट करा; जिवंत बाळास मृत घोषित करणा-या डॉक्टरांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा
सामाजिक कार्यकर्ते महादेव आदमाने यांची मागणी
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुती विभागाचे स्वतंत्र ऑडिट करून जिवंत बाळास मृत घोषित करणा-या डॉक्टरांवर ३०२ दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक महादेव आदमाने यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
उपचारात हलगर्जीपणा करणे, रुग्ण स्वतः च्या खाजगी रुग्णालयात पळवणे
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा स्त्री रोग प्रसुती व निदान हा विभाग गेली अनेक वर्षांपासून या विभागात उपचारासाठी येणा-या रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणे, हलगर्जीपणा करणे, या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आपल्या स्वतः च्या मालकीच्या खाजगी रुग्णालयात पळवणे या व इतर बाबींसाठी वादग्रस्त ठरले आहे.
शैक्षणिक दृष्ट्या अपात्र असतांना विभाग प्रमुखांचा पदभार कशासाठी?
या विभागाच्या विभाग प्रमुख पदांची जबाबदारी स्विकारणारे डॉक्टर हे शैक्षणिक दृष्ट्या अपात्र असून सहायक प्राध्यापक असतांनाही केवळ काही विशिष्ट बाबी या व्यक्तीत असल्यामुळे हा विभाग प्रमुख पदाचा चार्ज हा या व्यक्ती कडे आहे. या विभाग प्रमुखांच्या मालकीचे स्वतः चेअसे भव्य स्त्री रोग व प्रसुती पश्चात रुग्णालय असून ही व्यक्ती कधीही या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण कक्षात अथवा शस्त्रक्रिया गृहात रुग्णांवर उपचार करताना आढळून येत नाहीत.
