ठळक बातम्या

“स्वाराती”त सांधा प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी!

स्वारातीच्या अस्थी रोग विभागाने टाकली कात!

कमरेतील सांधा प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी !

रुग्णांनी मोफत सुविधेचा लाभ घ्यावा
डॉ. दिपक लामतुरे


अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थीरोग विभागाने आता आपली काय टाकली असून अत्यंत अवघड समजल्या जाणा-या शस्त्रक्रिया आता या रुग्णालयात सहज शक्य होवू लागल्या आहेत. अलिकडेच कंबरेतील सांधा बदलण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.
अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा अस्थी रोग विभाग हा गेली काही वर्षांपासून दुर्लक्षित विभाग समजला जात होता. या विभागात पदव्युत्तर शिक्षण नसल्यामुळे पुरेसा स्टाफ या विभागाला मिळत नव्हता व स्टाफ नसल्यामुळे उपचारांसाठी येणा-या रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या कडुन उपचार ही मिळत नव्हते.
अलिकडे या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉ. भास्कर खैरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनेक विभागांचे अपग्रेडेशन करुन घेवून अनेक विभागात पदव्युत्तर शिक्षणाच्या संख्या वाढवून दिल्या तर अनेक विभागात पदव्युत्तर शिक्षण सुरु केले.
याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थीरोग विभागात पदव्युत्तर शिक्षण सुरु करण्यासाठी केंद्र शासनाच्या एमसीआय (अखील भारतीय आयुर्विज्ञान आयोग) कडुन नव्याने तपासणी करवून घेण्यात आली आणि या विभागाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मान्यता मिळाली.
एमसीआयच्या तपासणी पार्श्वभूमीवर या विभागात तज्ञ सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आणि राज्य शासनानाकडुन या डॉ. दिपक लामतुरे यांच्या सारखा तज्ञ प्रोफेसर ही अधिकृतपणे नियुक्त करण्यात आला. आता या अस्थी रोग विभागाने आपली कात टाकली असून या विभागात सांधा प्रत्यारोपणा सारख्या अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रिया अत्यंत सहजपणे होवू लागल्या आहेत.
मागील वर्षी कोवीड काळात सुरुवातीला रुग्णांच्या जीवीतासाठी स्टेरॉईड या इंजेक्शनचा अतिवापर झाला आणि आता दोन वर्षांनंतर कोवीड झालेल्या अनेक रुग्णांवर या इंजेक्शनचे परीणाम दिसून येवू लागले आहेत. यात प्रामुख्याने गुडघा आणि कंबरेतील सांधा कमकुवत होवून चालण्याची गती मंदावणे अथवा चालता न येणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळुन लागले आहेत. रुग्णालयाच्या ओपीडीत अशा प्रकारचे रुग्ण उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे.
अंबाजोगाई शहरातील मोची गल्ली विभागात राहणारा ६० वर्षीय मेघराज चौधरी हे अशाच प्रकारच्या आजाराने गेली वर्षभर त्रस्त होते. त्यांनी या उपचारासाठी हैदराबाद, पुणे, मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार घेतले, सर्व डॉक्टरांनी यावर अंतीम विलाज हा शस्त्रक्रियाच आहे असे सांगितले. व या शस्त्रक्रियेसाठी किमान ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असेल असे ही सांगितले. मेघराज चौधरी यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून मग त्यांनी शेवटी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थी रोग विभाग प्रमुख डॉ. दिपक लामतुरे यांच्या सल्ला घेत याच रुग्णालयात कंबरेतील सांध्याचे प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादिनी अस्थी रोग विभागाचे प्रमुख डॉ. दिपक लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक विभाग प्रमुख डॉ. नामदेव जुने, डॉ. गणेश सुरवसे, डॉ. आदित्य, डॉ. सर्वेश आणि अस्थिरोग, भुलशास्त्र विभागातील इतर तज्ञ डॉक्टरांनी आणि परिचारीकांनी या शस्त्रक्रियेत सहभाग नोंदवला.
मेघराज चौधरी यांच्यावर कंबरेतील सांध्याचे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुर्ण करण्यात आल्या नंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी रुग्णास वॉकरच्या सहाय्याने चालवण्यासही सुरुवात करण्यात आली होती. मेघराज चौधरी यांच्या वरील सर्व उपचार पुर्ण झाल्यानंतर त्यास २३ ऑगस्ट रोजी रुग्णालयातुन सुट्टी ही देण्यात आली आहे. आता मेघराज चौधरी हे आपल्या घरी वॉकरच्या साहाय्याने व्यवस्थित व सहजपणे चालु लागले आहेत. येत्या काही दिवसांत मेघराज हे वॉकर अथवा इतर कसलाही आधार न घेता सहजपणे चालु शकतील असा विश्वास डॉ. दिपक लामतुरे व पथकप्रमुख डॉ. नामदेव जुने यांनी व्यक्त केला आहे.

▪️मोफत सेवेचा लाभ घ्यावा; डॉ
दिपक लामतुरे यांचे आवाहन
——————————–
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थी रोग विभाग आता तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत झाली असून पदव्युत्तर शिक्षण सुरु झाल्यामुळे रुग्णसेवा ही अधिक सक्षम झाली आहे. या विभागात आता हाडांच्या सांध्यांचे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सहजपणे केली जावू शकते, तेंव्हा सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी सर्वसामान्य रुग्णांनी खाजगी रुग्णालयात जावून भरमसाठ पैसे खर्च न करता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थी रोग विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. दिपक लामतुरे यांनी केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker