अंबाजोगाई येथे २५, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी सुरु असलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह निमित्ताने आनंदवन येथील प्रल्हाद चिंधुजी ठक यांनी स्व रक्तातुन काढलेल्या भावचित्र व धान्यापासून काढलेली रांगोळी प्रदर्शनीस पाहण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
वेगवेगळ्या कला जोपासत स्वतःची नवी ओळख निर्माण करणाच्या अनेक व्यक्ती समाजात वावरत असतात, त्यापैकी अनेकांना ठळक प्रसिद्धी मिळते, अनेकांना ती मिळत नाही. कांही जण प्रयत्नपूर्वक अशी प्रसिध्दी मिळवतात. स्वतःच्या रक्तापासून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यास हातभार लावणाऱ्या व देशाचे नाव अजरामर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापुरुषांची चित्र काढण्याचा संकल्प आनंदवन (बदोरा) जि. चंद्रपुर येथील कलाशिक्षक प्रल्हाद चिंधुजी ठक या कला शिक्षकाने केला. आजपर्यंत प्रल्हाद ठक यांनी १६७ महापुरुषांची भावचित्रे काढली आहेत. हे भावचित्रे काढण्याचे त्यांचे काम अजूनही सुरूच आहे.
प्रल्हाद चिंधुजी ठक हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी (बुटी) या गावचे. घरची परिस्थिती अगदी जेमतेम. वडीलांचा व्यवसाय शेती. शेतीतून मिळेल त्या उत्पन्नातून घर खर्च भागवणे आणि मुलांचे शिक्षण करणे ही वडीलांची भुमिका. वडिलांवर गाडगे महाराजांचे संस्कार आणि त्या संस्कारातून प्रल्हाद यांच्यामध्ये समाजसेवेची आवड लहानपणापासून निर्माण झाली.
प्रल्हाद चिंधुजी ठक शालेय महाविद्यालयीन शिक्षणानंतर आनंदवन येथील बाबा आमटे यांच्या ‘आनंद मुक बधीर विद्यालयात’ कला शिक्षक म्हणून नौकरीस लागले. ११ ऑगस्ट १९९५ हा त्यांच्या या सेवेचा पहिला दिवस! उपजत समाज संस्काराचे धडे आणि बाबा आमटे यांच्या संस्थेतील नौकरी यामुळे त्यांच्या विचाराला अधिक बळ, अधिक गती मिळाली.
२००६ साली भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा झाला. सायंकाळी प्रल्हाद ठक हे घराबाहेर फिरण्यासाठी निघाले तेंव्हा ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी वा नंतर लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेले व विक्रीस खुलेआम परवानगी असलेले प्लॅस्टीकचे ध्वज रस्त्यालगतच्या घाणीत पडलेले त्यांनी पाहिले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवले त्या महापुरुषांची त्यांना प्रकर्षाने आठवण झाली. त्यांच्या मनात या महापुरुषांप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी स्व रक्ताने त्यांची भावचित्रे काढण्याची कल्पना निर्माण झाली. २००६ सालापासूनच त्यांनी स्व रक्ताने महापुरुषांची भावचित्रे काढण्याचा संकल्प सुरु केला. आजपर्यंत प्रल्हाद ठक यांनी १६३ महापुरुषांची भावचित्रे स्व रक्ताने काढली आहेत. महापुरुषांची भावचित्रे काढण्याचा त्यांचा हा संकल्प अजून ही सुरुच आहे.
स्व रक्ताने महापुरुषांची चित्रे काढण्याच्या कलेसंबंधी प्रल्हाद ठक यांच्याशी चर्चा केली असता साधारणपणे १/४ आकाराच्या कागदावर ठळक पद्धतीने दिसणारे महापुरुषांचे चित्र काढण्यासाठी १५ ते २० एम.एल. रक्त लागते असे ते सांगतात. आजपर्यंत त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या- ज्या महापुरुषांनी योगदान दिले अशा १६७ महापुरुषांची भावचित्रे त्यांनी काढली आहेत. ही १६३ भावचित्रे काढण्यासाठी त्यांना आजपर्यंत २.५४५ एम.एल. रक्त लागले आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने त्यांनी ही भावचित्रे साकारली आहेत.
प्रल्हाद ठक हे केवळ स्व रक्ताच्या माध्यमातून भावचित्रे काढूनच थांबतात असे नाही. या कलेशिवाय वेगवेगळ्या धान्यांच्या माध्यमातुन महापुरुषांची भावचित्रे काढण्यातही त्यांचा हातखंडा आहे. येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या निमित्ताने त्यांनी १७ धान्यांचा वापर करुन महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण व यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे जणक स्व भगवानराव लोमटे यांची भावचित्रे अत्यंत उत्तम पद्धतीने काढली आहेत. प्रल्हाद ठक यांनी आपला हा छंद जोपासतांना २००८ साली चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानातील ११ एकर जमीनीवर विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी १३ ट्रॅक्टर धान्यांचा वापर करुन सलग ६३ तासांत महारांगोळी काढण्याचा विक्रम केला होता. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डर घेवून त्यांना गौरवलेही आहे. अशी जागतिक विक्रमाची नोंद करणारा हा कलंदर कलावंत. मात्र आजपर्यंत राज्य आणि केंद्र शासनाला गौरव पुरस्कार देण्यासाठी आपल्या नजरेत सापडला नाही.
प्रल्हाद ठक यांनी २००७ साली स्व रक्ताने बाबा आमटे यांचे भावचित्र काढून त्यांना दाखवले तेंव्हा बाबा आमटे यांना प्रल्हाद ठक यांच्या या आगळ्या वेगळ्या कलेची माहिती झाली. बाबांनी या भावचित्रांची प्रशंसा केली तेंव्हा प्रल्हाद ठक यांनी बाबांना आपल्या या आगळ्या वेगळ्या छंदाची माहिती त्यांना दिली. बाबांनी ही सर्व भावचित्रे पाहून प्रल्हाद ठक यांना ही भावचित्रे काढून नुसती घरात ठेवू नको, तर संपूर्ण महाराष्ट्रात या भावचित्रांची प्रदर्शनी भरव असा सल्ला दिला. तेंव्हा प्रल्हाद ठक यांनी २००७ साली आनंदवनातच महापुरुषांच्या स्व रक्ताने काढलेल्या भावचित्रांची प्रदर्शनी भरवली आणि त्यांचे उद्घाटनही साधनाताईंच्या हस्तेच केले. तेंव्हापासून ते स्व रक्तांनी काढलेल्या भावचित्रांची प्रदर्शनी भरवण्यासाठी बोलावणे येईल तेथेच जातात.
प्रल्हाद ठक हे आनंदवन येथील बाबा आमटे यांच्या निवासी मुक बधीर विद्यालयातील कला शिक्षक आहेत, म्हणून या भावचित्रांची प्रदर्शनी भरवण्यात त्यांना बऱ्याच आर्थिक आडचणी येतात. जगावेगळी नाविण्यपूर्ण आणि देशाच्या अस्मितेची जपवणूक करणाऱ्या या आगळ्या-वेगळ्या भावचित्र प्रदर्शनीची दखल आजपर्यंत राज्य शासनाने घेतली का ? असा प्रश्न त्यांना विचारला तेंव्हा त्यांनी स्पष्ट ‘नाही’ हे उत्तर दिले आणि ते उत्तरअपेक्षीतही होते !
स्व-रक्ताने १६७ महापुरुषांच्या भावचित्रांची प्रदर्शनी पाहतांना किती लोकांनी एखाद्या महापुरुषाचे चित्र माझ्या रक्तातून काढा अशी विनंती आपल्याला केली आहे असा प्रश्न विचारला असता प्रल्हाद ठक यांनी सर्वप्रथम आपली मुले चर्चित आणि मानसी यांचा उल्लेख केला. त्यांनी आपणास आपल्या स्वतःच्या रक्तातून ही महापुरुषांची चित्रे काढा असा आग्रह धरला होता, या शिवाय नागपूर येथे भरवण्यात आलेल्या एका भावचित्र प्रदर्शनीतही एका महिलेने आपणास अशी विनंती केली होती असे त्यांनी सांगितले. मात्र याचवेळी मी स्वतः त्यांना माझ्या रक्तातुनही अशाच एका महापुरुषांच्या भावचित्रांचे रेखाटन करता का अशी विनंती प्रल्हाद ठक यांना केली तेंव्हा त्यांनी ही विनंती आनंदाने मान्य केली.
प्रल्हाद ठक यांच्याशी विस्ताराने बोलतांना या कलेसंबंधी अनेक प्रकारच्या आठवणी आणि संदर्भ त्यांनी सांगितले. या प्रदर्शनातील सर्व महापुरुषांच्या भावचित्रांचे कायमस्वरुपी प्रदर्शन राज्य शासन किंवा केंद्र शासन यांनी पुढाकार घेवून एखाद्या संग्रहालयात भरवावे अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य किंवा केंद्र शासनाने या प्रस्तावाचा विचार करुन प्रल्हाद ठक यांनी स्व-रक्ताने काढलेल्या महापुरुषाच्या भावचित्रांच्या प्रदर्शनीचे कायमस्वरुपी प्रदर्शन एखाद्या संग्रहालयात भरवण्यासाठी सकारात्मक विचार करावा. केंद्र शासनाने देशातील अशा दुर्मिळ कलांच्या जपवणूकीसाठी अब्जावधी रूपये खर्च करुन ललीत कला अकादमीची स्थापना केली आहे. या ललित कला अकादमी नवी दिल्ली या संस्थेने प्रल्हाद ठक यांनी स्व रक्ताने काढलेल्या १६७ व पुढे काढण्यात येणाऱ्या भावचित्रांचे संकलन करुन जगावेगळी ही कला जोपासावी व या कलेमागील निःस्वार्थ राष्ट्रप्रेम नवीन पिढीसमोर आदर्श स्वरुपात ठेवावे अशी माफक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.