महाराष्ट्र

सिरसाळा येथील धनंजय मुंडे यांच्या सभेस रेकॉर्डब्रेक गर्दी !

सिरसाळा एमआयडीसीत एक वर्षात दोन कंपन्या येणार; ना. धनंजय मुंडे

शिरसाळा येथे एमआयडीसी उभारण्याचा शब्द मी मागच्या निवडणुकीत दिला होता. कोरोनाच्या कठीण प्रसंगातून बाहेर आल्यानंतर, सुमारे 2200 एकर गायरान जमीन सिरसाळा एमआयडीसीसाठी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू केली. सद्यस्थितीत 78 हेक्टर जमीन एमआयडीसी म्हणून अधिगृहीत करण्यात आली असून या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती प्रस्तावित असून येत्या काही दिवसात ती प्रक्रिया पूर्ण होईल. राष्ट्रीय दर्जाच्या नामांकित दोन कंपन्यांशी माझे बोलणे झाले असून येत्या वर्षभरात शिरसाळा एमआयडीसीमध्ये दोन मोठ्या कंपन्या उभारण्यात येणार असून त्याद्वारे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे वक्तव्य कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शिरसाळा येथील सभेत बोलताना केले आहे.

माझा पिंड विकासाचा आहे शिरसाळ्यात शादीखाना, बौद्ध विहार उभारण्याचा दिलेला शब्द मी वेळेत पूर्ण केला. आज या दोनही टोलेजंग वास्तू शिरसाळा शहराची शोभा वाढवत आहेत. निवडणूक लागायच्या साधारण महिनाभर आधी कृषी विभागाच्या बंद पडलेल्या जुन्या इमारतीच्या जागी बसस्थानक बांधण्यास देखील परवानगी व निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे देखील काम येत्या काही दिवसातच पूर्ण होईल. परिसरातील वडखेल गावात आपण 53 कोटी रुपये खर्चून सीताफळ इस्टेट उभा करत आहोत. मला घाटातला नैसर्गिक गोडवा घेऊन आपल्याकडे पिकणाऱ्या सीताफळाला आता सफरचंदाची सर येईल, असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्यासह माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्या उपस्थितीत शिरसाळा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवासामुळे नाशिक वरून निघालेल्या पंकजाताई मुंडे या सभेस वेळेवर पोहोचू शकले नाहीत मात्र त्यांनी थेट फोनवरून शिरसाळावासीयांना आपले भाषण ऐकवले.

माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी यावेळी तुफान फटकेबाजी केली. आमच्या विरोधकांची सध्या अशी अवस्था झाली आहे, त्यांना पाहिलं की मला शोले पिक्चर मधील आसरानी आठवतात. ‘ हम अंग्रेज के जमाने के जेलर है, आधी लोग इधर जाओ आधे लोग उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ’ असे ते म्हणतात पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पाठीमागे कोणीही नसते असा टोला कोणाचेही नाव न घेता प्रीतम ताई मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

मुंडे कुटुंबाचा पिंड हा विकास करण्याचा असून जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही समाजकारण व राजकारण आजवर जपले आहे. सर्वसमावेशक व सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून त्याला आम्ही कधीही कमी पडणार नाही. अडचणीच्या काळातही वैद्यनाथ साखर कारखाना सुरू झाल्याने आता स्थानिकांच्या उसाचा प्रश्नही मिटणार आहे. त्यामुळे या भागातील जनता तसेच मोठा प्रमाणात विकसित होत असलेले शिरसाळा शहर संपूर्णपणे माझ्या पाठीशी उभे राहील असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे, माजी आमदार आर टी जिजा देशमुख, माजी आमदार संजय भाऊ दौंड, यशवंत सेनेचे बालासाहेब दोडतले, युवक नेते अजय मुंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, जनिमिया कुरेशी, निळकंठ चाटे, सुशांतसिंह पवार, शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे, लक्ष्मण तात्या पौळ, राजाभाऊ पौळ, चंद्रकांत कराड, माऊलीतात्या गडदे, श्रीहरी मुंडे, राम किरवले, अक्रम पठाण यांसह पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते यांसह आदी उपस्थित होते. या सभेस सिरसाळा व परिसरातील नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker