साहेब… तुम होते तो ऐसा होता तुम होते तो वैसा होता!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/gopinath-munde_AFP-1024x768.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/gopinath-munde_AFP-1024x768.jpg)
३ जुन ! सामान्य माणसाच्या काळजाचा ठाव घेणारी ही तारीख. बघता बघता साहेबांचा ९ वा स्मृतिदीन साजरा करण्याची वेळ नियतिने आपणा सर्वांवर आणून ठेवली आहे.
आजच्या स्मृती दिनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा अख्खा जीवनपट माझ्या पिढीतील अनेकांच्या डोळ्यासमोर निश्चित उभा रहात असणार! कसलाही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वावर एक सामान्य कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्री आणि थेट केंद्रीयमंत्री इथपर्यंतची झेप घेवून आपले कर्तृत्व सिद्ध करणारा परळी तालुक्यातील एका खेड्यात जन्मलेल्या हा रांगडा गडी, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लोकांच्या कायम स्मरणात राहिला.
राजकारणाचा कसलाही वारसा नसताना भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्त्यापासुन गोपीनाथराव मुंडे यांनी सुरु केलेल्या प्रवासाचा साक्षीदार होण्याचे भाग्य माझ्या पिढीतील अनेकांना लाभले आहे. पक्षाच्या प्रचारासाठी सायकलला पक्षाचा झेंडा परळी शहर आणि पुर्वी अंबाजोगाई तालुक्यात असणा-या परळी, रेणापुर आणि अंबाजोगाई तालुक्यातील असंख्य गावागावात भाजपची माणसं उभा करणारे, सायकल रिक्षाला माईक लावून सायकल रिक्षा मध्ये बसून पक्षाचा प्रचार करणारे, आपल्या एझ डी मोटार सायकलला पक्षाचा भलामोठा झेंडा लावून अख्खा जिल्हाभर वेड्यासारखे फिरत प्रत्येक गावात भाजपची फळी उभी करण्यासाठी सतत प्रयत्न करणारा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकाच्या माध्यमातून स्वतः चे कर्तृत्व सिद्ध करीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते लोकसभेत केंद्रीय मंत्री पदांची शपथ घेण्यापर्यंत चा गोपीनाथराव मुंडे साहेबांचा प्रवास अगदी थक्क करुन सोडणारा आहे.
आज साहेबांचा ९ वा स्मृतिदीन साजरा करतांना साहेबांच्या अनेक आठवणींचा कल्लोळ मनात उमटत असतांनाच आज साहेब असते तर काय काय झाले असते या विचारांची ही गर्दी मनात सतत गर्दी करीत आहे. साहेब असते तर हे झाले असते, साहेब असते तर ते झाले असते असे असंख्य प्रश्न मनात आज गर्दी करीत आहेत. आज साहेब असते तर पंकजा यांना एवढा राजकीय संघर्ष करावा लागला असता का? हा प्रश्न माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनात पडत आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230602_132857-1024x950.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230602_132857-1024x950.jpg)
आज साहेबांचा ९ वा स्मृतीदिन साजरा करतांना साहेबां सोबतची ९ वर्षा पुर्वीची ही आठवण आहे. माझ्या मनात खोलवर रुजलेली! कायम स्मरणात राहणारी!! १८ एप्रिल २०१२ रोजी मध्यरात्री अंबाजोगाईची ग्राम देवता आणि कोकणस्थांची कुलदेवता माता योगेश्वरी हिच्या अंगावरील ३१ तोळे सोने आणि ३ किलो चांदीच्या दागीण्यांच्या चोरीने संपुर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.
अंबाजोगाईच्या डॉ. सौ. विमल मुंदडा या त्यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री पद आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदावर कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन चांगले होते. पण याहीपेक्षा अधिक दरारा होता तो सत्तांतरामुळे उपमुख्यमंत्री पदावरुन पायउतार झालेल्या साहेबांचा! गोपीनाथराव मुंडे यांचा!
योगेश्वरी मातेच्या अंगावरील दागीने चोरीला गेल्याचे भांडवल त्यावर्षी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी केले. यात अपवाद होते फक्त साहेब! साहेब हे तसे योगेश्वरीमातेचे निस्सिम भक्त. दस-याचा नवरात्रोत्सव असो मार्गशीर्ष महिन्यातील नवरात्र उत्सव असो, आपल्या हातावरची सर्व कामे बाजुला ठेवून साहेब सहकुटुंब मातेच्या दर्शनासाठी येणार आणि मातेला एखादा दागीना अर्पण करणार हा जणु सिरस्ताच झाला होता. या चोरी गेलेल्या दागिन्यात साहेबांनी अर्पण केलेल्या अनेक दागीन्यांचा समावेश असल्यामुळे साहेबांची एक भावनिक गुंतागुंत या प्रकरणात निर्माण झाली होती. या चोरीनंतर साहेबांनी मंदीर परीसरात येवून पहाणी केली, अनेक प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. चोरीच्या तपासाची दिशा, संशयितांची नांवे, त्यांना अभय देणारे लोकप्रतिनिधी आणि एकेकाळी ग्रहमंत्री पद हातळले असल्यामुळे आणि सत्ता हातात नसल्यामुळे या प्रकरणात हतबल झालेले साहेब यावेळी जवळून पाहता आले.
साहेबांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करुनही चोरीला गेलेले दागीन्यांचा तपास करण्यात पोलीस अयशस्वी ठरत असल्याचे पाहून जेवढे दागीने चोरीला गेले तेवढे दागिने पुन्हा देवीला अर्पण करण्याचा त्यांनी निश्चय जाहीर केला. यावेळी साहेबांनी शासनाच्या निष्क्रियतेच्या वीरोधात “परडी” मोर्चा काढून लोकांकडून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला. या परडी मोर्चाच्या यासर्व प्रक्रियेत साहेबांसोबत सतत काम करण्याची संधी मिळाली. हा परडी मोर्चा निघू नये म्हणून शासनाने अंबाजोगाई शहरात भादविचे १४४ कलम लागु करुन जमावबंदीचे आदेश दिले. साहेबांनी परडी मोर्चा काढण्याच्या निर्णयात काडीचाही बदल केला नाही!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230602_132840-1024x641.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230602_132840-1024x641.jpg)
परडी मोर्चा निघण्यापुर्वी साहेबांसोबत आम्ही सर्व जण पत्रकार राम कुलकर्णी यांच्या घरी जमलो होतो. तेथे अनौपचारिक चर्चा झाली आणि शिवाजी चौकातुन निघणाऱ्या परडी मार्चाकडे जाण्यापुर्वी साहेबांनी थेट जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन लावला, “मी परडी मोर्चाकडे निघालो आहे, ठरल्याप्रमाणे मोर्चा निघणार आहे, हिंमत असेल तर अटक करुन दाखवा!” असे म्हणत नेहमीच्या स्टाईल प्रमाणे फोन आदळुन ठेवून साहेब निघाले!
साहेबांचा ताफा गाड्याकडे निघाला. नेहमीप्रमाणे साहेबांचे बगलबच्चे साहेबांच्या गाडीत घुसले. समोरच्या सीटवर बसताच मागे वळून पहात साहेब म्हणाले, “रापतवारजी बसले का?” साहेबांना मी खालुनच म्हणालो, “नाही साहेब, मी मागच्या गाडीतुन येतो!” साहेबांनी गाडी थांबवत त्यांच्या एका बगलबच्च्याला खाली उतरवले आणि म्हणाले, रापतवारजी तुम्ही बस्सा! गाडीत बसल्यानंतर साहेब हसले आणि म्हणाले, “आम्हाला हेडगेवार चालतात, रापतवार का नाही चालणार!” गाडी निघाली, आणि मी साहेबांसोबत अभिमानाने परडी मोर्चात सहभागी झालो!
लहान माणसाला मोठं करणारे साहेब!
साहेब अकाली गेल्यामुळे अनेकांचा आधारच गेला! आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या मोठ्या मनाच्या माणसाच्या अशा किती तरी छोट्या छोट्या गोष्टी माझ्या सारख्या लहान माणसाच्या मनात घरं करुन आहेत!
साहेब खुप कमी वयात तुम्ही आम्हाला पोरकं करुन गेलात. आज तुम्ही नसतांना तुम्ही असतांनाच या आठवणी आम्हाला संघर्षमय जीवन जगण्याची शक्ती देतात. तुम्ही असतांना आम्हाला मिळालेला सन्मान अजूनही आमच्या मनात कायम आहे. आज तुम्ही नसतांना साहेब… तुम होता तो ऐ होता, तुम होता तो वो होता ! असे म्हणत जगण्याची वेळ आली आहे.
आज तुमच्या ९ व्या स्मृती दिनानिमित्त
विनम्र अभिवादन..!!