बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातल पाण्याचा विसर्ग आज अखेर मांजरा प्रकल्प धनेगाव पुर नियंत्रण कक्षाच्या वतीने थांबवण्यात आला. धरणाच्या स्थापनेपासून यावर्षी पहिल्यांदाच १६ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर असा प्रदीर्घ विसर्ग या धरणातुन सातत्याने करण्यात येत होता.
गेली अनेक वर्षांच्या तुलनेत या वर्षी मराठवाड्यातील बीड, लातुर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यात सरासरी पेक्षा दुप्पट पाऊस झाला. या विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो गावातील नदीकाठच्या जमिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर नदीकाठच्या हजारो एकर जमिनीतील उभी पीके अतिवृष्टीमुळे नष्ट झाली. या अतिवृष्टीमुळे मांजरा धरणाच्या निर्मितीनंतर कधी नव्हे तो सर्वात जास्त विसर्ग करण्यात आला. १६ ऑगस्ट रोजी पहाटे २:०० वाजता धरण ९० टक्के क्षमतेने भरल्यामुळे मांजरा प्रकल्पाचे चार वक्र दरवाजे ०.२५ मीटर ऊंचीने उघडून मांजरा नदीपात्रात ३४९४.२८ क्यूसेक्स (९८.९६ क्यूमेक्स) इतका विसर्ग सुरू करण्यात आला होता.
१६ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर अशी सलग ५७ दिवस मधील जेमतेम दहा दिवस वगळता या धरणातुन येणा-या पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन पुर नियंत्रण कक्षाने कमीअधिक प्रमाणात विसर्ग सातत्याने सुरू ठेवण्यात आला होता. मांजरा नदीतुन धरणाच्या प्रवाहात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन धरणातुन सोडण्यात येणारा पाण्याचा निश्चित करण्यात येत होता.
मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी मांजरा नदीतुन येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेत १२ ऑक्टोबर पर्यंत मांजरा धरणाच्या वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात येत होते. मात्र आता मांजरा नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने मांजरा धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या वक्र दरवाजातून पाणी सोडणे आता आजपासून बंद केले आहे. अशी माहिती मांजरा प्रकल्प धनेगाव पुर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.