समृध्दी नंतर आता शक्तीपीठ महामार्गाचे सुरु होणार काम; अंबाजोगाई -परळी चा होणार समावेश


बीड जिल्ह्यासह १३ जिल्ह्यातुन जाणार मार्ग
राज्यातील सर्व शक्तिपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून, या महामार्गाने किनवट तालुका देशाच्या नकाशावर येणार आहे.
अंबाजोगाई -परळी चा होणार समावेश!
राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार आहे. माहूर, औंढा नागनाथ, अंबाजोगाई, परळी, तुळजापूर, पंढरपूर, नरसोबाची वाडी, कोल्हापूर या प्रमुख धार्मिक स्थळांना तो जोडला जाणार आहे. हा प्रस्तावित एक्स्प्रेस वे श्रीक्षेत्र माहूर येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए ला जोडला जाणार आहे.
या महामार्गाच्या जमीन संपादनासाठी सल्लागार समितीची स्थापना झाली आहे. हा महामार्ग श्रीक्षेत्र माहूरला जोडल्यानंतर सारखणी, मांडवी, पिंपळगाव, आदिलाबाद या आंतरराज्य रस्त्यांचे महत्त्व वाढणार आहे.
कन्याकुमारी -काश्मिर या महामार्गाला जोडणार
शिवाय भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर (क्र. ४४) या मार्गाला जोडला जाणार असल्याने किनवट तालुक्याचे महत्त्व वाढणार आहे.
पर्यटन क्षेत्रात होणार झपाट्याने वाढ
किनवट तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील टिपेश्वर आणि तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील कावल व्याघ्र रिझर्व्हमधून किनवटच्या जंगलात वाघांचा अधिवास वाढणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटन वाढणार असून, तालुक्याच्या महसुलातही वाढ होईल.