सकलेश्वर मंदिराच्या उत्खननास सुरुवात
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_1708498229539958095076240-1024x930.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_1708498229539958095076240-1024x930.jpg)
दोन मंदिरांचा पाया सापडला
येथील ऐतिहासिक ठेवा असलेल्या पुरातन सकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील उत्खननास सुरवात झाली आहे. या ठिकाणी आणखी दोन मंदिरांच्या पायांचा अवशेष आढळला असून, पाच नव्हे तर आणखी काही मंदिरांचे समूह या ठिकाणी असण्याचा अंदाज आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_1709303516669006872648604-1024x864.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_1709303516669006872648604-1024x864.jpg)
राज्याच्या पुरातत्त्व (छत्रपती संभाजीनगर) विभागाने याचे काम सुरू केले आहे. या उत्खननाचे काम पूर्ण झाल्यानंतर सकलेश्वर मंदिराचे पुनर्निर्माणही केले जाणार आहे. सकलेश्वर मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा प्रस्तावही यापूर्वी (२०२३) पुरातत्त्व ब्व वस्तुसंग्रहालय विभागाने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागास पाठविलेला आहे. सकलेश्वर मंदिराचे दुसऱ्या टप्प्यातील उत्खनन करण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यासाठी ३४ लाख ७३ हजारांच्या निधीलाही मान्यता मिळाली आहे. याच निधीतून हे उत्खनन करण्यात येत आहे. १५ मार्च २०२४ पासूनच या कामाला सुरवात झाली असली, तरी मुख्य काम शुक्रवार (ता. २३) पासून सुरू झाले आहे. जेवढे काम करावयाचे, तेवढ्या सीमारेषा (१० बाय १०) आखून याचे काम सुरू केले. पुरातत्त्व विभागाचे १० जण, त्यात तांत्रिक व आकाश ऑर्किओलॉजी यांचाही समावेश आहे. याबरोबरच ५० मजूरही कार्यरत असल्याचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी सांगितले.
राज्य संरक्षित स्मारक
सकलेश्वर मंदिराचे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेता हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे, असा संचालनालयाचा अभिप्राय आहे. म्हणून हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे, अशी शासकीय स्तरावर मान्यता मिळावी, असा प्रस्ताव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला पाठविलेला आहे.
पाच मंदिरांचा समुह असण्याची शक्यता
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_1709027710968603424250167-885x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_1709027710968603424250167-885x1024.jpg)
पुरातत्त्वीय उत्खननानुसार हे काम सुरू झाले असून, मागील दोन दिवसांत या ठिकाणी आणखी दोन मंदिरांच्या पायाचे अवशेष आढळले आहेत. शिखराला असणाऱ्या कोरीव विटांचे तुकडे, शिल्पावशेष, मूर्तीच्या हाताचे भाग असे अवशेष आढळत आहेत.
यादव कालीन मंदिर
सकलेश्वर (बाराखांबी) मंदिर हे यादवकालीन स्थापत्य शैलीचा सुंदर नमुना आहे. या मंदिराचा सभामंडप १२स्तंभावर उभा असल्याने याला बाराखांबी हे नाव रूढ झालेले आहे. या स्तंभावरील शिल्पे कलात्मक अतिशय असून, काही स्तंभावर स्त्री शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. यादवकालीन एका शिलालेखावर असलेल्या उल्लेखानुसार, या मंदिराचे बांधकाम १२२८ मध्ये केलेले असावे. या मंदिराचा सभोवताल व पुरातन अवशेष पाहता, याठिकाणी पाच मंदिरांचा समूह असावा, कारण पहिल्या टप्प्यातील उत्खननात काही मंदिरांचा पाया (बेसमेंट) आढळून आलेले आहे.
महिनाभर उत्खननाचे काम चालणार !
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_171003592938536266568249-1024x725.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_171003592938536266568249-1024x725.jpg)
पुरातन दृष्टिकोनातून या भागाला महत्त्व असून, या ठिकाणी विविध मंदिरांचा समूह असण्याची शक्यता आहे. हे काम पुढील महिना ते दीड महिना सुरू राहणार असून, या उत्खननातून संशोधन व रचनात्मक काम करण्याचा हेतू आहे.
▪️अमोल गोटे,
सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग.