संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत उत्स्फुर्त स्वागत!


संत श्रेष्ठ श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखी शेगावहून २६ मे रोजी टाळकरी, वारकरी, पताकाधारी यांच्यासह मजल मजल दरमजल करत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या पालखीचे अंबाजोगाई शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.
नगर परिषदेच्या सीमेवरच प्रथेप्रमाणे जोरदार स्वागत!
शेगाव येथून पंढरीच्या विठोबांच्या दर्शनासाठी निघालेली गजानन महाराजांची ही पालखी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई नगर परिषदेच्या हद्दीत पोहंचली. प्रथेप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या पालखीचे जोरदार स्वागत संत भगवानबाबा चौकाजवळ करण्यात आले. यावेळी संत भगवानबाबा चौक परिसरातील चौतर्फा भागातील विविध वसाहतीमधील भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.


पालखी मार्गावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी!
संत भगवान बाबा चौकातुन मार्गस्थ झालेली ही पालखी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, कुत्तरविहीर, पाटील चौक, मंडीबाजार मार्गे योगेश्वरी मंदीरात कांही वेळ आसनस्थ होईल. योगेश्वरी मंदीर परिसरात स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या सहकार्याने पालखीत सहभागी झालेल्या वारक-यांची प्रतिवर्षी भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र आज एकादशी असल्यामुळे सर्व वारक-यांच्या यथेच्छ फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. फराळ आणि चहापाणी झाल्यानंतर ही पालखी गुरुवार पेठ, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोंढा रोड, शासकीय विश्रामगृह मार्गे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात मुक्कामी राहणार आहे. यावेळी पालखीतील सहभागी वारक-यांची भजन किर्तन व इतर धार्मिक पुजा विधी व रात्री आरती झाल्यानंतर पालखी आराम करुन १५ जून रोजी सकाळी महाअभिषेक व महाप्रसाद घेऊन पालखी कळंबमआर्गए पंढरपूर कडे मार्गस्थ होईल.
रमेश कापसे करताहेत ३८ वर्षांपासून पालखीची सेवा!
अंबाजोगाई शहरातील व्यावसायिक रमेश कापसे हे गजानन महाराजांच्या पालखीची गेली ३८ वर्षांपासून सातत्याने सेवा करीत आहेत. ३८ वर्षापुर्वी गजानन महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचे नियोजनापासुन ते मुक्कामी असणा-या पालखीची व वारक-यांची सर्व व्यवस्था करणे, पहाटे साडेतीन वाजता गजानन महाराजांचा महाअभिषेक करुन सकाळी सहा वाजता वारक-यांना महाप्रसादाची व्यवस्था करणे, महाप्रसाद झाल्यानंतर पालखी मार्गस्थ होईपर्यंत ची सर्व व्यवस्था रमेश कापसे हे वैयक्तिक पातळीवर करतात. यासर्व नियोजनात ते इतर कोणाकडूनही कसलीही आर्थिक मदत स्विकारत नाहीत. मात्र इतर नियोजनात त्यांचे अनेक मित्र त्यांना सहकार्य करतात.


यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला आले जत्रेचे स्वरूप!
यावर्षी पालखीचा मुक्काम दत्त मंदिर परिसर ऐवजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या सर्व परिसराला आज सकाळपासूनच जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून ते यशवंतराव चव्हाण चौकापर्यंत रस्त्यावर पुजेचे साहित्य, खेळणी, देवदेवतांच्या, धार्मिक माहिती असलेल्या पुस्तकांची दुकाने, शेगावीचा सुप्रसिद्ध असलेल्या कचोरी ची व विविध खाद्द पदार्थांच्या दुकानांनी येथे मोठी गर्दी केली होती.
गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईशी आहे भावनिक नाते !


शेगावीचा राजा श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा अंबाजोगाई मार्ग गेली अनेक वर्षांपासून कायम आहे. या पालखी निघण्याच्या सुरुवातीच्या काळापासून ही पालखी अंबाजोगाई शहरातुन मार्गस्थ होत असल्यामुळे या पालखीशी शहराचे एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. ज्या दिवशी शहरातुन पालखी मार्गस्थ होणार आहे त्यादिवशी एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे सात्विक वातावरण शहरांमध्ये निर्माण झालेले असते. पालखी मार्गावरील सर्व रस्ते सडा रांगोळी ने सजलेले असतात यक्ष ठिकठिकाणी पाणी, चहा, फळांचे मोफत वाटप केले जाते. पालखी मार्गावरील मांस विक्री करणारे दुकाने बंद ठेवण्यात येतात. एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे हा दिवस साजरा करण्यात येतो.


१५ जून; महाप्रसादा नंतर पालखी होणार मार्गस्थ!
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात पालखीचा मुक्काम झाल्यानंतर १५ जून रोजी पहाटे ३:३० वाजता गजानन महाराजांचा महा अभिषेक पुजा सुरु करण्यात येणार असून महापुजा आणि आरती झाली की महाप्रसादाचे नैवद्य गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करून सर्व वारक-यांनी महाप्रसाद घेतल्यानंतर सकाळी सात वाजणेचे सुमारास पालखी पंढरपूरला जाण्यासाठी मार्गस्थ होणार आहे.