संघर्ष ही तेरा जीवन है! वाढदिवसाच्या शुभेच्छा जगन!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230101_133407-753x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230101_133407-753x1024.jpg)
जगन मी पहिल्यांदा पाहील्याच आठवतंय ते किमान ३५ वर्षांपुर्वी पंचायत समिती समोरील त्या काळी बकाल असलेल्या एकपदरी डांबर रस्त्यावर..! अत्यंत सडपातळ शरीर यष्टीचा जगन. पायावर पांढरी विजार आणि छातीवर डगळा नेहरु शर्ट, डोक्यावर वाढलेले कुरळे केस आणि चेहऱ्यावर वाढलेली दाढी..! अशा गणवेशात विमनस्क अवस्थेत फिरताना..! विजार आणि नेहरू शर्ट एखाद्या काठीला लटकावलेले दिसावं अशी किरकोळ शरीरयष्टी असलेला..!
शहरातील बोधीघाट येथे रहाणारा जगन सुरूवातीला कै.देवदास भाऊ सोनवणे, भिमराव वाघचौरे, कै.प्रा.माधव मोरे, प्रा.एस.के.जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली दलित आघाडीतील एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण करू पहाणारा. याच काळात “मराठवाडा” दैनिकात वार्ताहरची जागा निघाली आणि या चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी मंगलताई खिवंसरा यांच्यामार्फत जगनला मराठवाडा दैनिकाचा वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
याकाळात मी ही तसा किरकोळ शरीरयष्टीचाच होता. पत्रकारितेत स्थिरावण्याचा प्रयत्न करीत होता. छोट्या मोठ्या दैनिकात काम करून लोकमत सारखे मोठे दैनिक हातात होते. त्यामुळे थोडा सर्व परीचित होतो, एवढाच फरक..! लोकमतच कार्यालय अंबाजोगाईत असल्याने समवयस्क पत्रकारांच्या गाठीभेटीच ते केंद्रचं बनले होते. वेगवेगळ्या दैनिकाचे प्रतिनिधी यायचे बातम्यांची काही नाविण्यपूर्ण समजलेल्या घटनांची चर्चा व्हायची आणि मग बातम्या लिहिल्या जायच्या. त्यावेळेस शहरातील ज्येष्ठ पत्रकार कै.भिकाभाऊ लाखे गुरूजी, कै.ईश्वरचंद्रजी गुप्ता, कै.वसंतरावजी देशपांडे यांची ही अधुनमधून हजेरी असायची. गप्पामधून मग पत्रकारीता कशी करायची याचे धडे ही मिळायचे..! याच काळात जगनची आणि माझी गट्टी वाढली. तो कार्यालयात येऊन बसायचा. दिवसातले किमान तीन-चार तास सोबत घालवायचा. आणि नकळत पत्रकारीतेतील बारकावे समजावून घ्यायचा..!
जगनची घरची परिस्थिती बेताची. वडील लहानपणीच गेलेले. आईच्या कष्टवर घर चालायचे. घरात खाती पोरं. आईने कष्ट करून पोरींची लग्न केली. एक पोरगा शासकीय नौकरीत लागला, धाकटा जगन..! आंदोलन चळवळीत काम करून पत्रकारितेच्या नादाला लागला. जगनच शिक्षण-वाचन तसं जेमतेम. अत्यंत हळवा-घाबरट स्वभाव. तो पत्रकारीतेत टिकेल का नाही असं सुरूवातीला वाटायचं.. कामापुरता बातम्या लिहीण्याचे कसब त्यानं आवगत केलं, आणि तो पत्रकारीतेत टिकला..!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-811682756-1672561790518-300x208.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-811682756-1672561790518-300x208.jpg)
कार्यालयाशिवाय जगन च माझ्या घरी येणं जाणं चालू झालं. मी त्यावेळी वडीलोपार्जित मोठ्या घरातील माडीवरील दोन रूमच्या खोलीत रहात होतो. बायको, दोन लहान मुलं. तसं सगळं व्यवस्थित होत. बायको सकाळी शाळेत जायची. काम असलं की, जगन सरळ घरी यायचा. मला मात्र जगनच्या बोधी घाट येथील घरी जाण्याची संधी मिळाली नाही. पुढे जगनने रमाई चौकात जागा धरली ! दहा – बारा लाकडी खांब आणून चार-पाच पत्र्याचं छत तयार केलं, चारही बाजूंनी तुराट्यांच्या काड्यांची भिंत बांधली आणि जगन या जागेत रहायला आला. सुरूवातीला एकटाच रहायचा. कामापुरती व्यवस्था झाली की, मग आईला ही घेवून आला. जगनच्या या घरात चुलीवर रटारटा शिजवलेले मटण किती तरी वेळा खाल्लेलं मला आज ही आठवतेय..! अगदी चवीसह..!
जगन थोडा स्थिर होवू लागला. त्याच्या लग्नाच्या हलचाली सुरू झाल्या. लग्न जमलं ही ! जगन ने मग तुरीच्या कांड्यांच्या भिंती काढून विटांच्या भिंती बांधल्या. अजून पाच पत्र वाढवली. दोन खोल्या. एक आईला एक त्याला ! जगनचा संसार सुरू झाला ! घरात लक्ष्मी आली आणि जगनची प्रगती सुरू झाली.”पहिली बेटी तुप रोटी” या म्हणी प्रमाणे पहिली मुलगी झाली आणि जगनच्या घरी तुप रोटी सुरू झाली ! जगनचा संसार फुलला ! तीन मुली, एक मुलगा ! दोन खोल्यांच्या ऐवजी पाच खोल्या, घरात आवश्यक तेवढ्या सुविधा आल्या.
पत्रकारीते सोबतच जगन समाजातील आणि इतर लोकांची अडलेली कामे करू लागला. या कामाने त्याला “बापू” नावाची उपाधी ही मिळाली. जगन आता सर्वसामान्यांचा बापू झाला. जगन सुखी संसारात रमू लागल्याचे दिसू लागताच ऐके दिवशी जगनचा फोन आला. साहेब उद्या सकाळी ९ वाजता दवाखान्यात ऑपरेशन थिएटर मध्ये या. माझी बायोप्सी करायची आहे. माझ्या काळजाचा ठोका चुकला ! संबंधित डॉक्टरांकडे विचारणा केली. शक्यतेसह कारण, समजले. बायोप्सी झाली. गाठीचा तुकडा तपासणीसाठी लातुरला पाठविला. दोन दिवसांनी रिपोर्ट आला. डॉक्टरांनी व्यक्त केलेला अंदाज खरा निघाला ! ताबडतोब उपचार घेण्यासाठी मुंबई गाठावी लागली. पैशाची जमवाजमव, घरी किती ठेवायचे, सोबत किती घ्यायचे, किती जमले, किती सोबत घेतले. चार दिवसांत मुंबई, पुढे वर्षभर उपचार ! तबियत कमी-जास्त. परत येणार – नाही येणार. चर्चाच चर्चा!!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-2029186787-1672561919925-300x200.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-2029186787-1672561919925-300x200.jpg)
जगनला मुंबईला हलवल्यानंतर मी आणि पञकार रणजित डांगे जगनच्या घरासमोरून यशवंतराव चव्हाण चौकाकडे स्कुटर वरून जात होतो. घरासमोरील मुख्य रस्त्यालगतच्या ओट्यावर जगनची आई बसली होती. उदास चेहरा… आभाळाकडे नजर! जगनची तीव्र आठवण झाली…माझ्या पोटात गलबलुन आलं. मी गाडी थांबवली. आईकडे गेलो. आईचं माझ्याकडं लक्ष जाताच गळ्यात पडून रडली. माझ्या जगनला परत आणा ये म्हणत आईने हंबरडा फोडला. आईचं गलबलून रडण्याने मलाही रडू आले. स्वतः ला सावरत आईला धीर दिला. नक्की परत येणार असे समजावून सांगत रणजित आणि मी बराच वेळ तिथेच बसलो. काम सोडून तिथून तसेच परत..!
जगन ने हिंमतीने आजारांवर मात केली. जगन परत आला तेंव्हा केमो थेरपीमुळे डोक्यावरचे केस गळालेले, शरीरयष्टी सुरूवातीला जशी होती तशीच! एकदम सडपातळ, हातपाय क्षीण झाल्यागत, अशक्तपणा प्रत्येक हालचालीत जाणवायचा ! जगन परत आला याचाच आनंद मोठा होता. लहान लेकरं, आई, बायको यांच्या हिंमतीने जगन पुन्हा सावरला ! मोठ्या मुलीचं हिंमतीने लग्न केले. जावाई चांगला भेटला. टुणटुणीत स्मार्ट नातवाचा जगन आजोबा झाला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-1745780742-1672562001279-300x172.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-1745780742-1672562001279-300x172.jpg)
सगळं मजेत चालले असतांना जगन पुन्हा आजारी पडला. दररोज ताप यायचा, कमी व्हायचा ! खाजगी रूग्णालयात दाखवलं, उपचार घेतले. पुन्हा ताप…कमी – जास्त ! योग्य निदानासाठी मग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयातच दाखल करावे लागले. ब्लॅडर स्टोन आणि किडणीतील गाठीचं निदान निघालं ! पुन्हा एकदा मुंबई ! पुन्हा तपासण्या…पुन्हा निदान ! आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने सर्व तपासण्या आणि निदान एकदम ओके आल्या आहेत. फक्त ब्लॅडर स्टोनचे छोटसं ऑपरेशन दुर्बिणव्दारे करावे लागणार आहे. लवकरच ते पुर्ण होईल आणि जगन पुन्हा लोकांच्या सेवेत येईल !
आज जगनचा वाढदिवस ! जगन बद्दल कधी एवढं विस्ताराने मी लिहीणं असं मला ही वाटलं नव्हतं ! आज जगनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अचानक त्यांचा संघर्ष आठवला आणि लिहीता झालो. जगन तुला वाढदिवसाच्या निमित्ताने निरोगी आणि समाधानी आयुष्यासाठी खुप- खुप शुभेच्छा..!