संगीत शंकर दरबार महोत्सवाचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230218_170951-300x140.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230218_170951-300x140.jpg)
बेला शेंडा, राहुल देशपांडे,पं. नयन घोष,सावनी शेंडे, पद्मश्री विजय घाटे आदि मान्यवरांची हजेरी
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बेला शेंडे, राहुल देशपांडे पं. नयन घोष, सावनी शेंडे, पद्मश्री विजय घाटेअसे दिग्गज कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे..
मागील अठरा वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या संगीत महोत्सवाचे हे एकोणिसावे वर्ष असून यावर्षी २५ फेब्रुवारी (शनिवार) रोजी सायंकाळी ६:०० वाजता पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्या कु. सुजया अशोकराव चव्हाण आणि श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ‘नटरंग’, ‘मी शिवाजीराजे भोसले ‘बोलतोय’, ‘जोधा अकबर’ अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या मराठी, हिंदी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या पार्श्वगायिका बेला शेंडे यांचा ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ हा कार्यक्रम होणार असून यामध्ये स्व. लता मंगेशकर यांना स्वरांजली आणि बेला शेंडे यांच्या गाजलेल्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230218_171043-1024x283.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230218_171043-1024x283.jpg)
२६ फेब्रुवारी (रविवार) रोजी सायंकाळी ५:३० वाजता कल्याण अपार (पुणे) यांचे शहनाई वादन होईल. सायंकाळी ६:०० वाजता पं. नयन घोष यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण हे असणार आहेत. उद्घाटनानंतर पं. नयन घोष (मुंबई) यांचे सतारवादन होणार असून पं. अरविंद आझाद हे तबला साथ करणार आहेत. त्यानंतर सावनी शेंडे (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाने या दिवशीच्या कार्यक्रमांचा समारोप होणार आहे.
२७ फेब्रुवारी (सोमवार) रोजी सकाळी ६:०० वाजता पहिल्या सत्रात मराठी दिनानिमित्त ‘मराठी पहाट’ या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे (मुंबई) आणि संच यांचा ‘पहाट शब्द सुरांची’ हा खास कार्यक्रम होणार आहे. श्रीकांत उमरीकर (औरंगाबाद) हे कार्यक्रमाचे निवेदन करतील.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230218_171101-1024x445.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230218_171101-1024x445.jpg)
२७ तारखेला सायंकाळी ६:०० वाजता श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते दुसऱ्या सत्राचे उद्घाटन होईल त्यानंतर मानस कुमार (मुंबई) यांचे व्हायोलीन वादन, ख्यातकीर्त तबलावादक पद्मश्री विजय घाटे व संच (पुणे) यांचा गायन, वादन आणि नृत्याचा रंगतदार आविष्कार दर्शविणारा ‘त्रिधा’ हा अनोखा कार्यक्रम होईल. त्यानंतर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाने या संगीत महोत्सवाचा समारोप होणार आहे.
तीन दिवस होणारे सर्व कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर उभारण्यात येणाऱ्या मुख्य मंचावर संपन्न होणार आहेत.
तरी रसिकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या या महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा असे आवाहन शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा सौ. अमिता चव्हाण, सचिव डी. पी. सावंत, सहसचिव उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर आणि अन्य सर्व पदाधिकारी तसेच संयोजन समितीतील संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, अपर्णा नेरलकर, हृषीकेश नेरलकर, गिरीश देशमुख व विश्वाधार देशमुख यांनी केले आहे.
सीताभाभी राममोहन राव यांचा होणार गौरव
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दरवर्षी संगीत शंकर ‘दरबार जीवन गौरव पुरस्कार’ दिला जातो. यावर्षीचा संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार श्रीमती सीताभाभी राममोहन राव यांना २६ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.