संकलेश्वर मंदिर परीसरातील ११८ मुर्ती तेर येथे हलवण्याच्या हालचाली सुरू
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230324_173619-1024x934.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230324_173619-1024x934.jpg)
अंबाजोगाई शहरालगत ११व्या शतकातील संकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या २०१७ साली केलेल्या खोदकामात सापडलेल्या ११८ मुर्ती तेर येथील शासकीय ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात हलविण्याच्या हालचालीस प्रारंभ झाला असून पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी या संदर्भात नुकतीच संकलेश्वर (बाराखांबी) मंदीर परीसरात जावून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या मुर्त्यांची पहाणी केली. येत्या ३० मार्च अखेर पर्यंत या सर्व मुर्ती हलवण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
अंबाजोगाई शहरालगत ११ व्या शतकातील चालुक्य कालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले हे ऐतिहासिक संकलेश्वर मंदीर आहे. वास्तुशास्त्राची एक उत्तम कलाकृती म्हणून ही या मंदीराकडे पाहिल्या जाते. अतिशय कोरीव बारा दगडी खांबावर उभारलेले हे शिव मंदीर असून या बारा खांबांची मोजणी सुरु केली तर त्यांची संख्या ११ किंवा १३ च भरते अशी चर्चा पुरातन काळापासून या मंदीरा संदर्भात करण्यात येते. बारा खांबावर उभ्या असलेल्या या नक्षीदार खांबावर अत्यंत कोरीव रेखीव देखण्या मुर्ती साकारण्यात आल्या आहेत. बारा खांबावर उभे असलेल्या या मंदीराच्या छतावर विस्तीर्ण आणि आकर्षक असे गावाक्ष आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230324_173544-1024x570.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230324_173544-1024x570.jpg)
या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत २०१७ मध्ये स्वच्छतेचे काम स्थानिक नागरिकांनी हाती घेतले असता याठिकाणी अर्धवट तुटलेल्या व काही चांगल्या अशा जवळपास ११८ मुर्ती आढळून आल्या होत्या. याबाबतची माहिती औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक कार्यालयास मिळाल्यानंतर तत्कालीन सहायक संचालक अजित खंदारे यांच्या नेतृत्वाखालील सहा जणांच्या टीम ने या संकलेश्वर मंदीर परीसराची आणि या सर्व मुर्तीची पाणी केली होती. मात्र या मुर्तीच्या संरक्षणाची कसलीही व्यवस्था न करता ही टीम हात हलवत परत गेली होती. या नंतर स्थानिक लोकांनी पुढाकार घेत या मंदीर परीसरात एक पत्र्याचे मोठे शेड करुन यामध्ये या मुर्ती ठेवल्या होत्या.
संकलेश्वर परीसरात पाच मंदीराची साखळी
या ऐतिहासिक संकलेश्वर (बाराखांबी) मंदीर परीसरात २०१७ नंतर पुरातत्व विभागाचे वतीने संशोधनाचे काम काही काळ मयुरेश खांडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले होते. यावेळी या मंदीर परीसरात पाच मंदीराची साखळी असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यावेळी मंदीर परीसरात करण्यात आलेल्या संशोधनात या पाच मंदीरांच्या बांधकामांची शृंखला ही हाती लागली होती. मात्र हे संशोधनाचे काम पुढे पुरातत्व विभागाने बंद केले होते.
आठ वर्षांनंतर आली जाग!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230324_190316-1024x637.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230324_190316-1024x637.jpg)
आता तब्बल आठ वर्षांनंतर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी या संकलेश्वर मंदीर परीसरास भेट देवून वरीष्ठ कार्यालयाच्या आदेशाने या सर्व ११८ मुर्ती उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील शासकीय ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात हलवण्यात येणार असल्याचे सांगितले. येत्या मार्च अखेर पर्यंत या मुर्ती तेर येथील पुरातत्व वास्तुसंग्रहालयात हलवण्यात येतील अशी माहिती आहे.
माजी आमदार संजय दौंड यांनी दर्शवला विरोध
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या संकलेश्वर मंदीर परीसरातील ११८ मुर्ती हलवण्याची कारवाई करण्यासाठी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे हे अंबाजोगाई शहरात आले असल्याची माहिती मिळताच विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी सहाय्यक संचालक अमोल गोटे यांना आपल्या निवासस्थानी बोलावून शहरातील प्रमुख लोकांसोबत अमोल गोटे यांच्याशी चर्चा करून या मुर्ती हलवण्यास विरोध दर्शवला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230324_173601-1024x558.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230324_173601-1024x558.jpg)
वरीष्ठांना कळवून निर्णय घेवू; सहा. संचालक गोटे
या वेळी सहाय्यक संचालक अमोल गोटे यांना संजय दौंड यांनी खडे बोल सुनावले. यापुर्वीच मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे करण्याऐवजी ते रिध्दपुर येथे हलवले व आता येथील ऐतिहासिक मुर्ती तेर येथे हलविण्यात येणार असल्याच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी अमोल गोटे यांनी माजी आमदार संजय दौंड यांना आपले मत वरीष्ठांना कळवून निर्णय घेवू असे सांगितले.