शेतमालाला भाव ठरविण्याचा अधिकार मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत


पत्रकार वसंत मुंडे यांचे मत
शेतीतून उत्पादीत केलेल्या मालाला भाव ठरविण्याचा अधिकार मिळाल्या शिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत असे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.
किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सहवेदना व्याख्यान मालेत वसंत मुंडे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संयोजक सुदर्शन रापतवार हे उपस्थित होते.


आपल्या विस्तारीत व्याख्यानात वसंत मुंडे यांनी शेतकरी आत्महत्यांच्या मुळ कारणांना हात घातला. आजचा शेती व्यवसाय हा न परवडणारा व्यवसाय ठरत असून रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कमी वेळेत अधिक उत्पादन देणाऱ्या रासायनिक खतांचे आणि औषधींचे शेतकऱ्यांना आमीष दाखवून हा व्यवसाय न परवडणारा करुन ठेवला आहे. रासायनिक खते आणि औषधांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या अधिक उत्पादन देण्याचे आमिष दाखवून महागडी खते आणि औषधी शेतकऱ्यांच्या गळी उतरवणे आहेत, या अमिषाप्रमाणे उत्पादन न मिळाल्यामुळे आणि उत्पादीत केलेल्या मालाचे भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नसल्यामुळे शेतकरी अधिक कर्जाच्या खाईत लोटला जातो असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.


रासायनिक खते आणि औषधांच्या अतिवापरामुळे शेतीतील उत्पादनाचे प्रमाण वाढले असल्यामुळे आणि प्रत्येक सिझनला एकाच पिकांचे उत्पादन घेण्याची सवय शेतकऱ्यांना लागली असल्यामुळे पिकांना भाव मिळत नाही असे त्यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कडक धोरण ठरवण्यात आजपर्यंतची सर्व सरकारे अपयशी ठरली असून आत्महत्या कमी करण्यासाठी शेतमालाला हमी भाव मिळवून देण्याचा निर्णय घेण्याऐवजी आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्येला निकष ठरवून त्याला आर्थिक मदत मिळवून देण्याचे शासनाचे धोरण अतिशय संतापजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास करणा-या समितीने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे सांगताना शेतकरी हा दारुच्या व्यसनाधिनतेमुळे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतो असे निरीक्षण नोंदवले आहे. हे जर निरीक्षण खरे असेल तर दारु पिणारा वर्ग हा शेतकऱ्यांपेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या सधन समजला जाणारा व्यवसाय उद्योगातील आणि शासकीय सेवेतील वर्ग आहे मात्र या सधन वर्गात आत्महत्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. असे सांगत सरकारचे हे निरीक्षण अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.


शेती आणि वृत्तपत्र या दोन व्यवसायाकडे पाहण्याचे शासनाचे धोरण हे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत ज्या प्रमाणे शेतीतुन उत्पादन काढणा-या पिकांचा खर्च अधिक आणि शेत मालाला भाव कमी मिळतो त्याच प्रमाणे वृत्तपत्र निर्मितीसाठी पैसे अधिक लागतात आणि वृत्तपत्र विक्रीतुन कमी पैसे मिळतात असे सांगत शेती आणि वृत्तपत्र हे दोन्ही व्यवसाय आतबट्याचे व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील आणि देशातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीतून उत्पादीत केलेल्या मालाला भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे त्याशिवाय शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होणार नाही असे त्यांनी सांगितले.


किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सहवेदना व्याख्यान मालेचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्नत्याग आंदोलनाचे संयोजक ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात सुदर्शन रापतवार यांनी अन्नत्याग आंदोलना मागणी भुमिका विषद करतांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करणे आणि शेतकरी जाचक विरोधी असणारे तीन कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी केली.


नगर परिषदेच्या दैनिक विवेक सिंधु कार्यालयात समोरील मोकळ्या जागेत आयेजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सिरसाठ यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किसान पुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते, लंगोटीयार मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.