शेतकरी सहवेदनेसाठी १३ ते १९ मार्च किनगाव-धुळे निघणार निर्धार पदयात्रा


शेतकरी सहवेदना आणि निर्धार पदयात्रा यंदा किनगाव (जळगाव) ते धुळे अशी 13 ते 19 मार्च या कालावधीत निघणार आहे. हे अंतर जवळपास 110 किलो मीटर आहे. रस्त्यात चोपडा आणि अंमळनेर ही तालुक्याची गावे येतात. डॉ राजीव बसर्गेकर (नवी मुंबई) हे यात्रेचे मुख्य संयोजक आहेत व सुभाष कच्छवे (परभणी) हे त्यांना सहकार्य करीत आहेत.
११ किसान पुत्रांचा राहणार सहभाग!


या यात्रेत खालील शेतकरी आणि किसानपुत्र पूर्णवेळ सहभागी होणार आहेत.
1) रामकिशन अप्पा रुद्राक्ष, 2) निळकंठ डांगे (हिंगोली), 3) बालाजी आबादार 4) विठ्ठलराव डांगे (नांदेड), 5) कालिदास आपेट 6) चौधरी सर (बीड), 7) सतीश गलांडे (परभणी), 8) हृतगंधा देशमुख (जळगाव), 9) शामराव धावडे (अमरावती) 10) राजीव बसर्गेकर (नवी मुंबई), 11) सुभाष कच्छवे (परभणी)
शिवाय या गावावरून त्या गावापर्यंत सहभागी होणारे वेगळे राहतील.


निर्धार पदयात्रेचे हे तिसरे वर्षे
2021 मध्ये औंढा नागनाथ ते चिलगव्हाण (दिवंगत साहेबराव करपे यांचे गाव) अशी सुमारे 225 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. 2022 मध्ये पानगाव (हुतात्मा रमेश मुगे यांचे गाव) ते आंबाजोगाई अशी 35 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. या वर्षी किनगाव (दिवंगत सहकारी कडू आप्पा पाटील यांचे गाव) ते धुळे (दिवंगत रवी देवांग यांची कर्मभूमी) अशी पदयात्रा निघणार आहे. पहिली पदयात्रा मराठवाड्यातून निघून विदर्भात गेली होती. दुसरी मराठवाड्यात निघाली. तिसरी खान्देशात निघणार आहे. कडू आप्पा पाटील हे शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते, किसानपुत्र आंदोलनात सक्रिय होते. त्यांनी जळगाव येथे शिबीर घेतले होते. शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे अशी त्यांना तळमळ होती. रवी देवांग हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱयांचा गळफास ठरलेल्या कायद्यांचे सुरक्षा कवच बनलेल्या परिशिष्ट नऊची जाहीर होळी केली होती. त्यात त्यांच्या सोबत कडू आप्पाही होते. त्या बद्दल त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शेवटी न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले होते. शेतकरीविरोधी कायद्यांच्या लढाईला तीव्र करणारे हे दोघे असल्यामुळे किनगाव ते धुळे अशी पदयात्रा काढली जात आहे.
पदयात्रेचा कार्यक्रम


असा आहे पदयात्रेचा मार्ग
पदयात्रा 13 तारखेला सकाळी 9 वाजता कडू आप्पा यांना श्रद्धांजलीची सभा घेऊन प्रारंभ होईल. धानोरा करीत अडावदला मुक्काम करेल. 14 ला बारडी वरून चोपड्याला जाईल. 15 ला निमगव्हाण करून पाटोंदा येथे रात्रीचा मुक्काम करेल. 16 तारखेला गडखांब मार्गे अंमलनेरला पोहचेल. 17 मार्चला दुपारी जानवे करून रात्री नवलनगर येथे मुक्काम करेल. 18 ला वणी बु. करीत फागणे येथे मुक्काम करेल. शेवटचा टप्पा 19 मार्चला फागणे ते धुळे हा राहील. धुळ्यात या यात्रेचा समारोप होईल.
पदयात्रेत सभाबैठकांचे आयोजन
पदयात्रेत सभा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिक शेतकरी, नागरिक आणि किसानपुत्रानी व्यवस्था केली आहे.