शुभम काकडे तुझ्या कृतीचा अंबाजोगाईकरांना अभिमान!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221118_072055.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221118_072055.jpg)
मला नेहमीच एक प्रश्न असतो की लोकं प्रबोधिनीचे काम का करतात ? मी माझ्या परीने ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून त्या व्यक्तीचे दर्शन होते. ते झालेले दर्शन मी स्वतःच्या शब्दात मांडायचा प्रयत्न करतो.
प्रबोधिनीच्या सहवासात माणसे घडतात. त्यांच्यात प्रबोधिनीपण मुरते तर काही जणांच्यात ते अंगीभूत असते. कुटुंबाचा संस्कार किंवा त्यांच्यातील चांगुलपणा !!
शुभम काकडे हा असाच एक तरुण प्रबोधक. ज्ञान प्रबोधिनीच्या वस्तीवरील कामाचे तसेच विविध जिल्हापरिषद शाळेत चालणाऱ्या पूरक शिक्षणाचे आणि विवेकवाडीचे काम करतो. मी सुरुवातीला सतत त्याच्या सोबत असायचो आता तो एकटा सगळे काही करतो !! शुभमची घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे. तो इथे शिक्षण घेत प्रबोधिनीचे काम करतो. तत्परतेने सगळी कामं करतो. काही दिवसात वस्तीवरील मुलांचा तो लाडका शुभमदादा झाला. तो राहतो ज्ञान प्रबोधिनीच्या गोविंद केंद्रावर .
गोविंद केंद्राच्या समोर दर शुक्रवारी मोठा भाजी बाजार भरतो. प्रचंड गर्दी असते. मोठ्या प्रमाणात महिला भाजी घेण्यासाठी येतात. घाई गडबड खूप असते.
अशाच एका शुक्रवारी सर्व काही कामं संपवून शुभम गोविंदवर पोहनचला. बाजार संपलेला होता. सुनसान रस्त्यावर फारसे कुणी नव्हते. तो तसा रमत गंमतच चालला होता. वास्तूच्या समोरच त्याला एक लखलखीत गळ्यातले सापडे. अर्थातच ते सोन्याचे होते. चांगले वजनदार पण होते. शुभमने ते नीट निरखून पाहिले आणि उचलून घेतले. कोणी शोधत येतंय का याची वाट तो पाहत उभा होता. एक महिला तेवढ्यात रडत रडतच आली. ती अस्वस्थ नजरेने काही तरी शोधत होती. तिचे रडणे चांगलेच जोरात होते. शुभमने ते पाहिले व त्या ताईंना त्यांनी विचारले, ” काय झालं ताई ? काही हरवले आहे का ? काय शोधताय तुम्ही ? “
महिलेने आपले गळ्यातील हरवल्याचे सांगितले. शुभमने आपल्याला सापडलेला दागिना त्या महिलेला दाखवताच त्याची त्यांना ओळख पटली. त्यांना एकदम निवांत वाटले. आपल्याला हातात तो दागिना घेऊन त्या शुभमला एक हजार रुपये बक्षीस म्हणून देऊ लागल्या. शुभमने सादर ते बक्षीस स्वीकारण्यास नकार दिला.
आज बाहेरची परिस्थिती पाहता ओरबाडून घेण्याची वृत्ती वाढत आहे. तिथे शुभम सारखा तरुण घरची परिस्थिती गरीब असताना पण विनाश्रमाचे घेणार नाही असे म्हणतोय !!
शुभम मधील ह्या प्रबोधिनीपणाचे दर्शन घडल्याने त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर अजून वाढला. शुभम तुझ्या कृतीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे !!
लेखक : प्रसाद चिक्षे, ज्ञानप्रबोधिनी, अंबाजोगाई