शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेची भुमिका महत्वाची; शिवप्रसाद येळकर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/image_editor_output_image897137041-1675416100654-300x257.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/image_editor_output_image897137041-1675416100654-300x257.jpg)
शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेची भुमिका महत्वाची असल्याचे मत कृषी मार्गदर्शक शिवप्रसाद येळकर यांनी कुंबेफळ येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन या विषयावर बोलताना व्यक्त केले.
‘‘शेती आधारित ग्राम संस्कृती आपल्या राष्ट्राच्या समृद्धीचा अविभाज्य घटक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शाश्वत शेती साकारत कृषी विद्यापीठासह इतर तत्सम सहयोगी संस्थांद्वारे निर्मित तंत्रज्ञान आणि शिफारशी सोप्या स्थानिक भाषेत गावकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मध्यवर्ती भूमिका बजावणे अपेक्षित आहे,’’ असे मत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी व्यक्त केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230203-WA0128-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230203-WA0128-1024x682.jpg)
स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना ‘युवकांचा ध्यास ग्राम शहर विकासासाठी विशेष शिबीर मौजे कुंबेफळ येथे आयोजित करण्यात आले. शिबिरात श्रमदान, कृषी मार्गदर्शन, बौद्धिक तसेच समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सदर शिबिरामध्ये उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना येळकर यांनी शेती मशागतीच्या कामांसाठी डिझेलचा होत असलेला वापर आणि त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन होऊन हवामानामध्ये होत असलेले बदल व हवामान बदलामुळे शेतीवर होत असलेले प्रतिकूल परिणाम यांची विस्तृतपणे माहिती देऊन शेतामधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादन वाढीसाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संरक्षित हवामान अनुकूल शेती करण्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञान कशा पद्धतीने फायदेशीर आहे याची विस्तृतपणे माहिती देऊन शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्याचे आवाहन केले. येळकर यांनी शेतामधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पाच टक्के निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यावस्थापनाच्या उपायोजनांची विस्तृतपणे माहिती दिली. शेतीशाळा प्रशिक्षक अनिकेत पोटभरे यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योग संदर्भात माहिती दिली. या वेळी सरपंच लिंगेश्वर तोडकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.गायत्री गाडेकर, डॉ. किरण चक्रे, डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे, गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.