परळी विधानसभेची निवडणूक लागल्यापासून परळी गुंडशाही व दादागिरीचे राजकारण चालते असे म्हणून परळीच्या लोकांची बदनामी करणारे शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हेच स्वतः आज मतदानाच्या दिवशी गुंडशाही माजवताना दिसून आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यांच्या गुंडशाहीस जनतेने थारा दिला नसून, विजय आमचाच होईल, असा विश्वासही मुंडेंनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सहा पैकी किमान 5 जागा महायुती जिंकेल असा दावाही मुंडेंनी केला आहे.
मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा केला प्रयत्न
मतदारसंघातील घाटनांदुर, जवळगाव, मुरंबी, धायगुडा पिंपळा, सायगाव यांसह अनेक गावात बूथ ताब्यात घेण्याचे प्रयत्न राजेसाहेब देशमुख व त्यांच्या समर्थकांनी तसेच बाहेरून आणलेल्या गुंडांनी केले असून ज्या ठिकाणी बूथ ताब्यात घेता आले नाही त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचे समर्थक, मान्यवर नेते, पदाधिकारी, स्वीय सहाय्यक यांच्यावर लाठ्या काठ्या व दगड घेऊन थेट हल्ले चढवले.
व्हिव्हीपॅट म्हशींची केली तोडफोड
घाटनांदुर, जवळगाव, मुरंबी आदी ठिकाणी तर अक्षरशः मतदान केंद्रांवरही हल्ले करून पोलिंग मशीन व्हीव्हीपॅट मशीन तोडफोड करून काही तासांसाठी मतदान बंद पाडले.
लाठी-काठ्या घेवून केला हल्ला
उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा मुलगा त्याचबरोबर शंभू संजय देशमुख, संजय देशमुख, गणेश अवताडे यांसह 100 पेक्षा जास्त लोकांच्या समूहाने हातात लाठ्या-काठ्या व दगड घेऊन घाटनांदुर च्या मतदान केंद्रावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते तथा मजूर संस्थेचे जिल्हाध्यक्ष बन्सी अण्णा शिरसाठ यांच्या गाडीवर हल्ला केला, या हल्ल्यात बन्सी अण्णा शिरसाट बालमबाल बचावले.
कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवून केली शिवीगाळ
याच जमावाने नवाबवाडी येथील बुथवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकवटलेल्या ग्रामस्थांनी त्यांना हुसकावून लावले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर आबा चव्हाण, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, बापूसाहेब देशमुख, अंबाजोगाई तालुक्याचे अध्यक्ष राजाभाऊ औताडे यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे यांची गाडी सातेफळ फाटा येथे अडवून संजय देशमुख, शंभू देशमुख यांसह काही जणांनी शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. धायगुडा पिंपळा येथील खाजा पटेल यांना देखील शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न झाला.
परळी मतदारसंघाची केली बदनामी!
दरम्यान अगदी पहिल्या दिवसापासून शांततेच्या स्वरूपात सुरू असलेली निवडणूक अखेरच्या टप्प्यात शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मात्र हिंसा करून अखेर परळीची बदनामी साधलीच. आपण अगदी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हे गुंडगिरी व दादागिरी च्या नावाखाली परळीची बदनामी करत असून इथल्या लोकांचाही अपमान करत आहेत. मात्र परळीची बदनामी करणारे खरे गुंड कोण आहेत हे आता जनतेसमोर आले आहे.
६६ टक्के पेक्षा अधिक मतदान; विजय आमचाच!
दरम्यान सायंकाळ पर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार सुमारे 66 टक्के पेक्षा अधिक मतदान परळी विधानसभा मतदारसंघात झाले असून आपला विजय निश्चित असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत धनंजय मुंडे हे आज दिवसभरात हल्ले झालेल्या आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी धायगुडा पिंपळा, अंबाजोगाई, घाटनांदुर, जवळगाव, आदी ठिकाणी भेटी देण्यासाठी गेले होते.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.