“वैद्यनाथ”साठी समर्थकांनी दिलेली मदत पंकजा मुंडे यांनी नाकारली !


निधी नकोय, मला फक्त आशीर्वाद तुमचे द्या!
भरून पावले..तुमच्या समर्थनाने …! मला हा निधी नकोय, मला तुमचे फक्त आशीर्वाद द्या असं भावनिक आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्यासाठी आर्थिक मदतीची महाचळवळ उभी करणाऱ्या राज्यातील समर्थकांना केलं आहे. यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी एक व्हिडिओ आपल्या यूट्युब चॅनलवर प्रसारित केला करून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
भरून पावले… तुमच्या समर्थनाने….
या व्हिडीओतून त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या कारखान्याच्या विषयामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या पध्दतीने आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण जन सामान्यांकडून ज्या पध्दतीचा सपोर्ट मला मिळतोय, मला वाटतंय जीवनामध्ये ही फार मोठी शक्ती माझ्या पाठिमागे उभी आहे. शिवशक्ती परिक्रमा यशस्वी झाली, त्याची पाठीवर थाप पडते ना पडते तोच हा प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला. अशा प्रसंगाची मलाही सवय करून घेतली पाहिजे आणि तुम्हालाही..पण या प्रत्येक प्रसंगातून आपण सर्व एक गोष्ट लक्षात घेतोय का..की आपला एकमेकांवरचा जो जीव आहे, तो अजून घट्ट होत आहे. आपण सर्व एकजीव होत आहोत हे फार महत्वाचं आहे. आपल्याला जे सामोरे जावं लागलं आहे, ते थोडं अधिकचं जावं लागलं आहे. लोकनेते मुंडे साहेबांनी तुमच्यामध्ये स्वाभिमानाचं जे बीजारोपण केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सर्व एकत्र आला आहात. आपण सर्वांनी ठरवलंय की एकत्र पैसे जमा करू आणि पंकजाताईंच्या कारखान्याचा जीएसटी भरू, पण असं करण्याची आवश्यकता नाही, त्यामध्ये नियमाने काय कार्यवाही करायची आहे, काय अपील करायचे आहे, काय पावलं उचलायची आहेत, बॅकांची काही विषय आहेत, यामध्ये मी वकील, सीए यांचे योग्य ते सल्ले घेऊन पावले उचलत आहे. तुम्ही जे सर्व पैसे जमा करत आहात ते आकडे पाहून मला भोवळ आली.


आपलं किडूकमिडूक एकत्र करून संसार करणारे आपण सर्व जणं अशा परिस्थितीत ताईसाठी तुम्ही जे आकडे गोळा करताहेत, आकड्यांवर जे शुन्य लावत आहात ते पाहून तुमच्या दिव्य शक्तीचा आभास मला आलाय. हे माझं मोठं भाग्य आहे, फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे की, अशा कुठल्याही रकमा आपण जमा करू नयेत. कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मला या कारणांसाठी करू नये. तो विषय मी मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करेलं. मला फक्त आशीर्वाद द्या की यात मला यश येईल. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ईश्वरा सारखे तुम्ही माझ्यासोबत नेहमी आहात.


तुमचे आशीर्वाद, तुम्ही दाखवलेली शक्ती माझ्या पाठिशी आहे. मी विनंती करते की कोणीही आपल्या घरात आपल्या मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी जमवलेले पैसे मला देण्याचं कारण नाही. मी देण्याच्या भूमिकेत आहे. कितीही वाईट वेळ आली तरी आई आपल्या लेकराच्या ताटातलं घेत नाही. कोणी कितीही टिका केली तरी मी तूमच्या आईच्या भूमिकेत आहे. तूम्ही २० कोटीच काय ४० कोटी सुध्दा जमवाल , पण तुमच्या संसारातलं, तुमच्या लेकरांच्या लग्नासाठी ठेवलेलं असं मला नको... फक्त साथ, प्रेम आणि आशीर्वाद द्या'. जसं श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला तसं तुम्ही करंगळी लावून हा माझ्या कर्जाचा डोंगर उचलण्याचा प्रण केला आहे, ही माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. कारखान्याच्या कर्जासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रक्कम घेणं मला प्रशस्त वाटत नाही आणि माझा स्वाभिमानी बाणा जो तुमच्यामुळे माझ्यात आहे तो मला असं करण्याची परवानगी देत नाही. स्वाभिमानी राहूनच या संघर्षाला आपण सामोरे जावू , सर्व जण मिळून यातून बाहेर पडू असा विश्वास व्यक्त करते असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.
••••