वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापकांच्या नवीन पदभर्तीचा प्रस्ताव दाखल


आ. नमिता मुंदडा यांनी केला होता पाठपुरावा
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचाऱ्यांची एकुण रिक्त पदे भरण्याचा नवा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांनी राज्यशासनाने नुकताच पाठवला आहे. आ. नमिता मुंदडा यांनी या रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा केला होता.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे आयुक्त डॉ. राजीव डी. नेवलकर यांनी या संदर्भात वैद्यकीय सचीव यांना पत्र क्रमांक डिएमइआर १२०१६१८/२०२२ इडीयु/१३१/२०२३ दि. १३/१०/२०२३ रोजी पाठवलेल्या या प्रस्तावात केंद्र शासनाच्या आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ईडब्ल्युएस आरक्षणा अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विषय निहाय पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे.
सदरील प्रस्तावात पुढे असे म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने लागु केलेल्या कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरीता मंजूर प्रवेश क्षमतेच्या तुलनेत प्रति महाविद्यालय ५० जागांची वाढ केल्यामुळे सध्या कार्यरत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. सदर वाढीव जागांच्या तुलनेत अध्यापकीय व परावैद्दकीय मनुष्यबळ उपलब्ध न झाल्यास उक्त महाविद्यालयांची मान्यता अबाधित ठेवण्यास संस्थांना अडचणी निर्माण होणार आहेत. भविष्यात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सदर महाविद्यालयांचे निरीक्षण हाती घेतल्यास सध्या कार्यरत विषयांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध न झाल्यास सदरील विषयातील अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सध्या उपलब्ध मनुष्यबळाचा सर्वंकष आढावा घेऊन राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाची पुर्तता करण्याच्या दृष्टीने आवश्यक अध्यापक, परावैद्दकीय व तत्सम पदे नव्याने निर्माण करण्यास शासनास प्रस्तावित करण्यात येत आहे.


सदरील प्रस्तावामध्ये बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग १ ची २ तर वर्ग २ ची २ पदे, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग १ ची १४ तर वर्ग २ ची २७ पदे, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील वर्ग १ ची १५ तर वर्ग २ ची २५ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील वर्ग १ ची १८ तर वर्ग २ ची ३४ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथील वर्ग १ ची २ तर वर्ग २ ची १ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील ्र्ग१ ची १७ तर वर्ग २ ची १३ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील वर्ग १ ची १७ तर वर्ग २ ची १२ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील वर्ग १ ची १३ तर वर्ग २ ची १४ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील वर्ग १ ची १२ तर वर्ग २ ची ३० पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील वर्ग १ ची ३ तर वर्ग २ ची ६ पदे, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील वर्ग १ ची १९ तर वर्ग २ ची ३३ पदे, श्री. भा. हि. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील वर्ग १ ची ७ तर वर्ग २ ची १ पदे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील वर्ग १ ची १६ तर वर्ग २ ची १५ पदे, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील वर्ग १ ची ३ तर वर्ग २ ची ३ पदे, आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील वर्ग १ ची १५ तर वर्ग २ ची ३१ नवीन वाढीव पदांचा समावेश आहे.
आ. नमिता मुंदडा यांनी केला होता पाठपुरावा!


अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग १ , वर्ग २ श्रेणी मधील अध्यापकांच्या व वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील रुग्ण सेवेसी निगडीत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नवीन वाढीव जागा भरण्याबाबत आ. नमिता मुंदडा यांनी सातत्याने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालनालयाकडे पाठपुरावा केला होता. सदरील पाठपुराव्यामुळे हा प्रस्ताव पाठविण्यास गती मिळाली आहे.