विधानसभा निवडणुकीनंतर संजय दौंड यांच्यावर पक्ष देणार मोठी जबाबदारी ; ना. धनंजय मुंडे
कार्यकर्त्यांनी कामाला लागावे;
संजय दौंड यांचे आवाहन
विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार संजय दौंड यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. तर कार्यकर्त्यांनी ना. धनंजय मुंडे यांना विजय मिळवून देण्यासाठी आपण आपसातील मतभेद विसरून कामाला लागावे असे आवाहन विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी केले.
परळी विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीपुर्वी संजय दौंड आणि ना. धनंजय मुंडे यांच्या मध्ये मतभेद असल्याच्या बातम्या संजय दौंड यांनी आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीनंतर समाज माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर या संदर्भात खुलासा करण्यासाठी संजय दौंड यांच्या फार्म हाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रपरीषदेत संजय दौंड आणि ना. धनंजय मुंडे यांनी आपली मत व्यक्त करतांना हा खुलासा केला.
या दोन दिवसांत त्यांनी कार्यकर्त्यांतील समज गैरसमज दुर करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. संजयभाऊ दौंड यांचे माझे , आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणे झाले आहे आणि आता परळी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी संजयभाऊ दौंड यांच्यावर टाकण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर
संजयभाऊ दौंड यांच्या वर पक्ष मोठी जबाबदारी ही देणार आहे. तेंव्हा कार्यकर्त्यांनी आणि समाज माध्यम प्रतिनिधींनींही यापूर्वी झालेली मागील सर्व चर्चेला पूर्णविराम द्यावा. पक्षातील सहका-यांनी आप आपसातील मतभेद विसरून कामाला लागावे असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी केले.
आ. धनंजय मुंडे आणि माजी आमदार संजय दौंड यांच्या बद्दलच्या संभ्रमावर पडदा पाडण्यासाठी व खरी वस्तुस्थिती माध्यमांसमोर सांगण्यासाठी या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. युतीच्या सर्व कार्यकर्त्यांत कसल्याही प्रकारचा संभ्रम ठेवे नये असे सांगत ना. धनंजय मुंडे हे राज्याचे स्टार प्रचारक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची त्यांचेवर मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी माजी आमदार संजय दौंड यांच्यावर परळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. उद्या पासून संजय दौंड हे परळी विधानसभा मतदारसंघाची प्रचार धुरा सांभाळणार असून ना. धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागासाठी मोकळे सोडणार आहेत.संजयभाऊ दौंड व ना. धनंजय मुंडे यांच्या मध्ये कसलेही मतभेद नव्हते आणि यापुढेही राहणार नाहीत. तेंव्हा कार्यकर्त्यांनी आप आपसातील समज गैरसमज दुर करुन परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ना. धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या पत्रपरिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस (अपा) गटाचे नेते दत्तात्रय (आबा) पाटील, परळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष गोविंद देशमुख, तालुका अध्यक्ष राजाभाऊ औताडे, रणजित लोमटे व इतर मान्यवर उपस्थित होते.