वाढदिवस विशेष…! महाराष्ट्राच्या राजकारणातील चमकता धृवतारा; ना. धनंजय मुंडे!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223809-1024x652.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223809-1024x652.jpg)
महाराष्ट्राच्या राजकारणातील चमकता धृवतारा व विद्दमान कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस! सर्वप्रथम ना. धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!
ना. धनंजय मुंडे यांचा ४८ वा वाढदिवस साजरा करीत असतांना त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न इथे मी करणार आहे. धनंजय मुंडे यांच्या लहानपणापासून ते आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चमकता धृवतारा या त्यांच्या यशामागे लपलेले रहस्य उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न असणार आहे.
ना. धनंजय मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ चा. भारतातील अराजकता थांबवण्यासाठी आणि विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली हे कारण दाखवत तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी संपुर्ण देशात आणीबाणी घोषित केली तो काळ. १९७५ ते १९७७ या वर्षातील सलग २१ वर्षे भारतात आणिबाणी होती त्या काळातील ना. धनंजय यांचा जन्म!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223444-1024x633.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223444-1024x633.jpg)
जन्मापासूनच ना. धनंजय मुंडे यांना संघर्ष पहायला मिळाला तो त्यांचे काका स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनाच्या संघर्षातुन! आणिबाणी घोषीत झाली आणि संपुर्ण देशातील कॉंग्रेस पक्षाच्या विरोधातील कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करुन त्यांना अटक करुन कारागृहात डांबण्यात आले. ना.धनंजय मुंडे यांचे काका गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे मित्र प्रमोद महाजन हे त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते. आणिबाणी घोषीत झाल्यानंतर मराठवाड्यात प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, डॉ. व्दारकादास लोहिया, अमर हबीब, अशोक गुंजाळ व इतर लोकांना पकडून त्यांची रवानगी नाशिक च्या कारागृहात करण्यात आली. २१ महिन्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणिबाणी हटवण्याचा निर्णय घेतला आणि स्थानबद्ध केलेल्या हजारो कार्यकर्त्यांची सुटका झाली.
ना. धनंजय मुंडे यांचे काका गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष या सुटकेनंतर अधिक प्रगल्भतेने आणि एक वैचारिक अधिष्ठान घेऊन आणिबाणी नंतर सुरु झाला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223721-1024x428.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223721-1024x428.jpg)
या संघर्षातून तावून सुलाखून निघालेल्या गोपीनाथ मुंडे यांना पुढे राजकारणात संधी मिळाली. आमदार, विधानसभाचा विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री, लोकसभेत खासदार, भारतीय जनता पक्षाचा उपनेता आणि पुढे केंद्रीय मंत्री अशा चढत्या कमानीवर गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रवास झाला.
आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्या यासर्व राजकीय प्रवासातील डोळस साक्षीदार म्हणून ना. धनंजय मुंडे यांना काम करता आले. विशेषतः गोपीनाथराव मुंडे सर्वप्रथम आमदार झाल्या नंतर उपमुख्यमंत्री असे पर्यंतचा कालावधीत तर ना. धनंजय मुंडे सतत गोपीनाथरावांच्या सोबत सावली सारखेच असायचे. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये राजकीय प्रगल्भता ना. धनंजय मुंडे यांच्या मध्ये निर्माण झाली.
गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत भारतीय जनता पक्षात काम करतांना साधारणतः १९९४ ते २००९ या कालावधीत ना. धनंजय मुंडे यांना भारतीय जनता पक्षात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. अत्यंत कमी वयात भाजपा विद्यार्थी आघाडी प्रमुख, भाजयुमो चे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना भारतीय जनता पक्षातील वैचारिक अधिष्ठान असलेल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींसाबत काम करतांना ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या स्वतःमध्ये संभाषण कौशल्य, अभ्यासु आणि आक्रमक भाषण करण्याची हातोटी, सभाधीटपणा या गोष्टी आत्मसात करुन आपली स्वतः ची एक स्वतंत्र ओळख महाराष्ट्रभर निर्माण केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223853-1024x674.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223853-1024x674.jpg)
हे सर्व होत असताना २००९ च्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि परळी विधानसभा मतदारसंघातून ना. धनंजय मुंडे यांना उमेदवारी घोषित होण्याऐवजी पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली.
पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मुंडे यांच्या घरात राजकीय ठिणगी पडली! विधानसभा मतदारसंघ सांभाळण्यासाठी आपण सक्षम असतांना केवळ अपत्य प्रेमापोटी गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची ऐनवेळी जाहीर केलेली उमेदवारी ना. धनंजय मुंडे यांच्या सोबत परळी मतदार संघातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात एक चर्चेचा विषय ठरली. एका सक्षम कार्यकत्याला डावलल्याची भावना मतदार संघातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली. धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीत आण्णा मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर नाराजी दर्शवत भाजपा मधुन बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला! हजारो कार्यकर्त्यांसह धनंजय मुंडे, पंडीत आण्णा मुंडे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत परळी शहरातील भव्य कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २००९ सालीच प्रवेश केला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223407-1024x817.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223407-1024x817.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशानंतर धनंजय मुंडे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गळ्यातील ताईत झाले. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना विधान परिषदेत बिनविरोध निवडून देत आमदार केले. विधानपरीषदेतील त्यांचा आक्रमक परफॉर्मन्स पासुन त्यांना विधान परिषदेत विरोधीपक्ष नेता म्हणून काम करण्याची संधी दिली. यानंतर राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस सरकार मध्ये त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कालावधीत सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून राज्यभर आणि बीड जिल्ह्याचा पालकमंत्री मंत्री म्हणून ना. धनंजय मुंडे यांनी केलेले काम विशेष दखलपात्र ठरले. याच कालावधीत कोवीड सारख्या महामारीत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांसाठी दिलेल्या भरीव निधीमुळे हजारो लोकांचे प्राण निश्चित पणाने वाचले! उपमुख्यमंत्री म्हणून ना. गोपीनाथराव मुंडे यांनी अंबाजोगाई शहरासाठी जेवढा निधी उपलब्ध करून दिला नाही त्यांच्या कितीतरी पट जास्तीचा निधी ना. धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई शहरासाठी उपलब्ध करून दिला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223520-1024x623.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223520-1024x623.jpg)
धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशानंतरचे त्यांचे संघर्षमय आपण सर्वच जण जवळुन पहात आहोत. राजकारणात ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली त्या काकांसोबतचा राजकीय संघर्ष, ज्या लहान बहिणीसोबत आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी गुंफल्या गेल्या आहेत तिच्या सोबतचे राजकीय वैतुष्ठ , कौटुंबिक कलह यासर्व गोष्टींचे आपण साक्षीदार आहोत. “ज्यांना आपल्या आयुष्यात सर्वोच्च आदराचे स्थान असलेल्या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराला आपल्याला उपस्थित राहता आले नाही, ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत आहे” असे धनंजय मुंडे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
कौटुंबिक कलहाच्या, सुखदुःखाच्या अशा कितीतरी आठवणी सांगता येतील. अगदी कालपरवा ना. धनंजय मुंडे परळी येथील एका अपघात जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबई येथे तातडीने नेवून रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची घेतलेली भेट आणि असे इतर किती तरी प्रसंग!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223749-1024x741.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223749-1024x741.jpg)
यासर्व सुख दुःखाच्या प्रसंगात आनंदाची आणि समाधानाची बाब एकच आहे ती म्हणजे या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपले वैयक्तिक संबंध जपण्याचा केलेला प्रयत्न! या प्रयत्नांचा अनेकवेळा साक्षीदार होण्याचे भाग्य मला भाग्य मिळाले आहे. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अनेक कार्यक्रमात गोपीनाथराव मुंडे साहेब आणि धनंजय मुंडे यांना एकत्र उपस्थित रहावे लागायचे. यावेळी बोलणे बंद असले तरी जेंव्हा साहेब समोर यायचे तेंव्हा धनंजय मुंडे आपल्या काकांना वडिलकीच्या मान देऊन त्यांना चरणस्पर्श केल्याशिवाय पुढे जायचे नाहीत हे अनेकांनी पाहीलेले आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण भावांमध्ये प्रचंड राजकीय वितुष्ट असतांनाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना ना. धनंजय मुंडे यांना दैनिक लोकमतच्या वतीने “पॉवरफुल राजकारणी पुरस्कार ” वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या तत्कालीन ग्राम विकास मंत्री ना. पंकजा मुंडे या आपल्या बहिणीची हजारो लोकांसमोर व्यासपीठावर घेतलेली गळाभेट!
प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या मुंबई येथील हॉस्पिटल च्या उद्घाटन कार्यक्रमात शरद पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण करण्यापुर्वी डायस कडे जाताना बहिण बहिण ना. पंकजा मुंडे यांच्या डोक्यावर टोपली मारुन केलेले खुमासदार भाषण या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223828-1024x753.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230714_223828-1024x753.jpg)
अलिकडे या बहीण भावाच्या नात्यातील ताण बराच सैल झाला असल्याचे जाणवते आहे. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी हा ताण कमी व्हावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी भुमिका वठवतांना आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांवर मात करीत जनतेसमोर सतत हसरे राहणे हे खुप अवघड काम आहे. मला वाटतं धनंजय मुंडे यांना हे काम आयुष्याच्या अत्यंत कमी वयापासून करावे लागत आहे. हे सर्व सांभाळत बीड जिल्ह्याच्या, मराठवाड्याच्या प्रमुख राजकीय नेत्यांशी स्पर्धा करीत आपला क्रमांक पहिल्या स्थानावर नेण्यात ना. धनंजय मुंडे यांना आज बरेचसे यश आले आहे.
ना. धनंजय मुंडे यांचा एकुण राजकीय संघर्ष आणि त्यांची दमदार राजकीय वाटचाल पहाता ना. धनंजय मुंडे हे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चमकता धृव तारा बनले आहेत.
महाराष्ट्राचा हा चमकता धृवतारा यापुढे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक वर्षे सतत असाच चमकत राहावो, राजकारणातील सर्वोच्च खुर्चीवर या धृवता-याला बसण्याची संधी मिळाली हे पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभो याच वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🌹