वर्णी महापुजा ने योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवास प्रारंभ
मंदिरात आराध बसण्यासाठी महिलांची मोठी गर्दी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)– महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. आज बुधवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या वर्णी महापूजेने या महोत्सवाची सुरूवात झाली.
मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास ४ हजार महिला बसल्याची माहिती देवल कमिटीच्या वतीने देण्यात आली. बुधवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. शहर वासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या. या वेळी झालेल्या महापूजेला अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी विधिवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विपीन पाटील,सचिव अँड शरद लोमटे,उपाध्यक्ष गिरीधारीलाल भराडीया, मंदिराचे मुख्यपुजारी सारंग पुजारी, विश्वस्त भगवानराव शिंदे,राजकिशोर मोदी,अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ.संध्या जाधव, पूजा कुलकर्णी, गौरी जोशी यांच्यासह देवीचे पुरोहित, मानकरी व भक्त उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. महोत्सवाच्या कालावधीत सलग नऊ दिवस विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच आराध बसलेल्या सर्व महिलांच्या निवासाची, पाण्याची व त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी देवल कमिटीच्या वतीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष विपीन पाटील,सचिव अँड.शरद लोमटे यांनी दिली.