महाराष्ट्र

वन डे फॉर युवर सेल्फ एम्पआवरमएंट!

मागे ब-याच वर्षापुर्वी मी अशोक सराफ यांची प्रमुख भुमिका असलेला “एक दिवस उनाड” हा चित्रपट पाहिला होता. एका मोठ्या कंपनीच्या अतिशय गर्भश्रीमंत आणि करड्या शिस्तीत राहणाऱ्या कंपनी मालकाची भुमिका या चित्रपटात अशोक सराफ यांनी केली होती. ऐके दिवशी हे महाशय सर्वसामान्य माणसाला मिळणारे सुख अनुभवण्यासाठी अत्यंत साधे कपडे घालून आणि वेगळी केशभुषा बदलुन शहरातील गर्दीतील रस्त्याने पायी फिरायला निघतात आणि आज पर्यंत न अनुभवलेल्या अनेक गोष्टींची चव ते बिनधास्त घेतात. या एका दिवसाच्या अनुभवाने त्यांना जगण्यातील ख-या आनंदाची त्यांना अनुभूती मिळते आणि त्यांची चाकोरीबद्ध जीवन जगण्याची पध्दत एकदम बदलून जावून लहान लहान गोष्टीत आनंद शोधत जगण्याची सवय त्यांना जडते. जीवनाकडे सकारात्मक पध्दतीने पाहणं शिकवणारा हा चित्रपट त्याकाळी मला फार भावला होता !
काल विवेक रांदड या उच्चशिक्षित आणि ध्येयवेड्या तरुणाने औरंगाबाद जवळील पळशी या गावानजीक शामवाडी येथे अल्पावधीतच नावारुपाला आणलेल्या “चेतना हॅपी व्हिलेज” या संस्थेला सात वर्षानंतर पुन्हा एकदा भेट देण्याचा योग आला. काल सायंकाळी भेट देऊन घरी परत आल्यापासून या भेटीच्या अनुषंगाने काही तरी लिहीलं पाहीजे हा विचार मनात घोळत होता. सकाळी मॉर्निंग वॉक ला जाण्याची तयारी सुरू केली आणि मला याच अनुषंगाने अशोक सराफ यांची प्रमुख भुमिका असलेला “एक उनाड दिवस” या चित्रपटाची आठवण झाली! आणि याच चित्रपटावरून आठवलं ते “वन डे फॉर युवर सेल्फ एम्पआवरमएंट” हे शिर्षक.


आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती एवढा स्वयं केंद्रीत झाला आहे तो आपल्या आजुबाजूला चालत असलेल्या चांगल्या गोष्टींकडे अजिबात पाहणेसा झाला आहे. आपलं घर, ऑफीस, बायको,पोरं आणि वेळ मिळाला तरच घरातील इतर सदस्य यांच्या कडे पाहण्याची सवय त्याला लागत चालली आहे. पुर्वीच्या पिढीनंतर माझी पिढी, माझ्या पिढीनंतर माझ्या मुलांची पिढी दिवसेंदिवस हे अंतर, ही सवय वाढतच चालली आहे. अशा वातावरणात ही काही चांगले काम करणाऱ्या संस्थांना भेट देण्याचा योग आलाच तर ती संधी अजिबात सोडली नाही पाहिजे, हे माझे मत आहे. अशा भेटी सामान्य माणसाला “सेल्फ एम्पआवरमएंट” करण्याचं एक चांगलं माध्यम मिळू शकत.
औरंगाबाद शहराजवळ निर्माण करण्यात आलेले “चेतना हॅपी व्हिलेज” ही अशीच एक “एम्पआवरमएंट” करणारी संस्था आहे, आणि ही संस्था माझ्या गावाच्या माणसाने, मित्राने निर्माण केली याचा सार्थ अभिमान आहे!


महाविद्यालयीन शिक्षण घेताना आपल्या जवळच्या दोन तरुण मित्रांनी केलेल्या आत्महत्या हे या “चेतना हॅपी व्हिलेज” निर्माण करण्याचं प्रमुख कारण ठरल आहे. या दोन आत्महत्यामुळे अस्वस्थ झालेल्या ध्येयवेड्या तरुणाने चार पैसे कमावण्याच्या आपल्या सीए चा व्यवसायावर पाणी सोडुन तो तरुण मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, कमी करण्यासाठी काम करु लागला. आणि या कामातुनच “चेतना हॅपी व्हिलेज” चा जन्म झाला!
सीए विवेक रांदड यांनी स्थापन केलेल्या “चेतना एम्पआवरमएंट फाऊंडेशन” च्या वतीने २०१२ साली “चेतना हॅपी व्हिलेज” निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली. यापुर्वी सात वर्षांपूर्वी मी व माझ्या सहकारी मित्रांनी या परिसराला भेट दिली होती तेंव्हा शामवाडी परिसरातील डोंगरमाथ्यावर असलेल्या या प्रकल्पाच्या साडेतीन एकर जागेपैकी सर्वात शेवटी असलेल्या डोंगरमाथ्याचा भाग लेवल करुन एक छोटीखानी पण आकर्षक इमारत इथे निर्माण केली होती. मेडिटेशन हॉल, सेमिनार हॉल, कार्यालय आणि राहण्यासाठी दोन खोल्या असे स्वरुप त्याकाळी या “चेतना हॅपी व्हिलेज” च होत! आजुबाजुला संपूर्ण उजाड डोंगर माळ, दुर दुर जुन्या झाडांमुळे दिसणारी हिरवळ एवढेच! डोंगरातील पाऊलवाटा शोधत आम्ही त्यावेळी या “चेतना हॅपी व्हिलेज” परिसरातील या इमारतीवर पोहोंचलो होतो.


आज सात वर्षांनंतर पुन्हा या “चेतना हॅपी व्हिलेज” ला भेट देण्याचा योग आला. याभेटीत “चेतना हॅपी व्हिलेज” मध्ये आम्हाला सात वर्षापुर्वी सांगितलेल्या संपुर्ण गोष्टींची परीपुर्तता झाली असल्याचे दिसून आले. आज या उजाड माळरानावर २,००० वृक्षांची लागवड करुन ती जोपासली गेली आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मात्र शैक्षणिक गुणवत्ते ८५ टक्केच्या पुढे गुण घेऊन आपले उच्चशिक्षणाचे उद्दिष्ट उराशी बाळगून असणा-या ३५ गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्वल करुन त्यांना स्वतः च्या पायावर उभे करण्याचे काम, तंबाखू मुक्त शाळा, संगणक साक्षरता, मानसिक स्वास्थ बळकटीकरण, व्यसनमुक्ती जनजागरण, मानसशास्त्रीय समुपदेशन अशा वेगवेगळ्या विषयांवर ” चेतना एम्पआवरमएंट फाऊंडेशन” काम करीत आहे.
या भेटीत “चेतना हॅपी व्हिलेज” मध्ये निर्माण करण्यात आलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या ३५ विद्दार्थ्यांसाठी करण्यात आलेली निवास व्यवस्था, संगणक कक्ष, स्टडी रुम, खेळाचे मैदान, समुपदेशन हॉल, मेडिटेशन हॉल, समुपदेशनासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या व्यवस्थेसाठी सुसज्ज निवास व्यवस्था, सात्विक भोजन देणारे किचन आणि इतर सर्व बाबी यांची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.


यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे “चेतना एम्पआवरमएंट फाऊंडेशन” चे मागील ११ वर्षात केलेल्या दैदिप्यमान कामांची माहिती ही मिताली दिदी आणि विवेक यांच्या कडुन समजावून घेता आली. मागील ११ वर्षाच्या कालावधीत “चेतना एम्पआवरमएंट फाऊंडेशन” च्या वतीने शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांचे मानसिक स्वास्थ्य बळकट करण्यासाठी ७५० हुन अधिक समुपदेशनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या माध्यमातून १२,००० हुन अधिक शालेय विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य बळकटीकरणाचा लाभ मिळाला आहे.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या कओवइड साथ रोगाचा प्रादुर्भाव सहन करावा लागला. या कालावधीत ब-याच लोकांचे मानसिक आजार वाढले असल्याचे सांगितले जात होते. या कालावधीत ३२७ समुपदेशन कार्यक्रमांतर्गत २५,५४६ व्यक्तींचे मानसिक समुपदेशन केले.
अलिकडे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या बालकांपासुन ते वयोवृद्ध माणसांमध्ये स्क्रीन ऍडइक्शन चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या सर्व वयोगटातील लोकांना स्क्रीन ऍडइक्शन चे लागलेले व्यसन कमी करण्यासाठी वेगवेगळे समुपदेशन कार्यक्रम घेवून ८२,२०० नागरीकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.


“चेतना एम्पआवरमएंट फाऊंडेशन” च्या वतीने निर्माण करण्यात आलेले “चेतना हॅपी व्हिलेज” हे औरंगाबाद शहरापासून फक्त १२ किमी अंतरावर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या केंद्रातील सहवास मुळे तुमच्या मनाला एम्पावर करुन तुमच्या मनाची आंतरिक्त शक्ती वाढवण्याचं, शांत समृध्द जीवन जगण्याची एक नवी प्रेरणा, नवी शक्ती या चेतना “हॅपी व्हिलेज” च्या भेटी नंतर तुम्हाला नक्कीच मिळेल. एक दिवस निश्चित वेळ काढा…. ” वन डे फॉर युवर सेल्फ एम्पआवरमएंट!” साठी!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker