महाराष्ट्र
“वंचित” च्या उमेदवाराचा भाजपाला पाठिंबा; तोंडाला काळे फासून चाबकाने केली मारहाण !
केज विधानसभा मतदारसंघातील घटना
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या मतदारसंघात बहुजण विकास वंचित आघाडीचे उमेदवार सचीन चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा न करता भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्यामुळे संतप्त झालेल्या वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वंचित चे उमेदवार सचीन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासून चाबकाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तोंडाला काळे फासून केली चाबकाने मारहाण
महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचत आहेत. सर्वच मतदारसंघातील प्रचार आता अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. अशा परिस्थितीत केज विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत वंचित आघाडीचे उमेदवार सचीन चव्हाण यांनी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा न करताच आपला पाठिंबा भाजपा व मित्र पक्षाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ही माहिती वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांना समजातच त्यांनी वंचित आघाडीचे कार्यकर्ते सोबत घेऊन सचीन चव्हाण यांना बोलावून घेत त्यांच्या तोंडाला काळे फासले एवढेच नव्हे तर त्यांना चाबकाने मारहाण ही केली आहे. या संबंधीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून या संबंधीची बातमी एबीपी माझा या वाहिनीवर दाखवण्यात ही आली आहे.
