लोकसभेतील “एमएमडी” फॉर्म्युलात मोठ्या प्रमाणात विभागणीची शक्यता
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रुढ झालेल्या “एमएमडी” (मराठा-मुस्लीम-दलीत)फॉर्म्युल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र आता या निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हा “एमएमडी” फॉर्म्युला तेवढा परिणामकारक असणार नाही असे दिसून येत आहे.
▪️मोदी-शहा यांची भुमिका होती अडचणीची
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देशभरात सर्वसामान्य मतदारांचे लक्ष्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या वर होते. त्यामुळे देशभरात विशेषतः एमएमडी (मराठा-मुस्लीम-दलित) समाजातील मोठी मते भाजपा सरकारच्या विरोधात पडली. भाजपाचे राजकारण हे मुस्लिम आणि दलित समाजावर अन्याय करणारे आहे असे त्या समाजातील नेत्यांनी सातत्याने समाजमनावर बिंबविल्या मुळे व महाराष्ट्रात मराठा समाजास आरक्षण मिळू न देण्यास देवेंद्र आणि शिंदे सरकारच जबाबदार असल्याची भुमिका आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी घेतली असल्यामुळे हा “एमएमडी” फॅक्टर महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात उभा राहिला. या तीन ही समाजातील जवळपास ८० टक्के मतदान हे महायुतीच्या विरोधात गेले असल्यामुळे महाराष्ट्रात भाजपा सरकारला जबर धक्का सहन करावा लागला.
▪️काय आहेत कारणे
येत्या २० नोव्हेंबर रोजी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हा “एमएमडी” फॅक्टर लोकसभा निवडणुकी एवढा महाराष्ट्रात प्रभावी राहील असे वाटत नाही . हे सांगत असताना त्याची वेगवेगळी कारणे ही सांगितली पाहीजेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सार्वभौम देशाच्या हिताचा विचार न करता केलेल्या आक्रमक भाषणांमुळे मुस्लिम आणि दलित समाजाची मते भाजपा विरोधात गेली तर मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्यास भाजपा चा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचा विरोध होता म्हणून मराठा समाजाची मत भाजपाच्या विरोधात गेली. या संयुक्त मोहिमेचा फटका मोठ्या प्रमाणात भाजपा ला बसला असे त्यांचे म्हणणे आहे आणि त्यात तथ्य ही असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या आता पुन्हा याच मुद्द्यावर लढवल्या जातील मात्र या निवडणुकीत हा “एमएमडी” फॅक्टर तेवढा प्रभाव टाकू शकणार नाही. हे समजून घेताना मुस्लिम समाजातील सद्द परिस्थितीचे विश्लेषण करावे लागेल.
▪️११.५४ टक्के मुस्लिम समाज
२०११ च्या जणगणनेनुसार मुस्लिम मतदारांची संख्या ११.५४ टक्के एवढी आहे. इतर समाजाचा विचार केला तर हिंदु ७९.८३%, बुध्दिष्ठ ५.८१%, जैन १.२५%, क्रिश्चन ०.९६%, शिख ०.२%, इतर ०.४१% अशी वर्गवारी दिसून येते.
महाराष्ट्राच्या राजकारणापुरता यांचा विचार आपण सद्द स्थितीत केला तर लोकसभेसाठी असलेल्या ४८ जागांपैकी एकाही (०) जागेवर मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी विजयी होवू शकला नसल्याचे दिसून येते आहे. धर्मनिरपेक्षतेचा दावा करणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उबाठा या पक्षांनीही आपली राजकीय शक्ती या निवडणुकीत मुस्लिम समाजातील उमेदवाराच्या मागे उभी केलेली दिसली नाही.
▪️४० विधानसभा मतदारसंघावर मुस्लिम समाजाचा प्रभाव
सध्या राज्यातील २८८ जागांसाठी विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या २८८ जागांपैकी ४० विधानसभा जागांवर मुस्लिम समाजाचा प्रभाव आहे. या ४० विधानसभा मतदारसंघात धर्मनिरपेक्ष व इतर मित्र पक्षाने मनापासून सहकार्य केले तर मुस्लिम समाजाचे ४० प्रतिनिधी सहज निवडून येऊ शकतात असा दावा या समाजाचे नेते करतात. याशिवाय राज्यातील ४ विधानसभा मतदारसंघात २१ ते ३० टक्के, ७ विधानसभा मतदारसंघात ११ ते २५ टक्के, ११ मतदार संघात ११ ते १५ टक्के तर इतर मतदार संघात ५ ते १० टक्के मुस्लिम मतदारांची संख्या आहे.
असे असतानाही मुस्लिम समाज ज्या धर्मनिरपेक्ष पक्षासोबत राहुन त्यांना आपली मते देतो आहे ती पक्ष मुस्लिम समाजाला उमेदवारी देत नाहीत अथवा राजकारणात फारसे प्रतिनिधित्व देत नसल्याचे दिसून येते.
▪️ महाराष्ट्रातुन लोकसभेत एकही मुस्लिम खासदार नाही?
महाराष्ट्राच्या राजकारणातील ही स्थिती पाहिली तर मुस्लिम समाजाला या धर्मनिरपेक्ष पक्षांनी ४० जागांवर उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र फक्त ९ जागांवर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पध्दतीने ४८ खासदारांपैकी एकही खासदार मुस्लिम समाजाचा निवडून येवू दिला नाही, त्याच पध्दतीचे राजकारण याही निवडणुकीत करण्यात येत असल्याचे दिसून येते आहे. धर्मनिरपेक्षतेचा दावा करणाऱ्या पक्षांसह सर्व पक्ष या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मुक्त या विधानसभा करण्याचे नियोजन करीत आहेत अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
▪️समाजाकडे सक्षम नेतृत्वाच नाही?
एकुणच देशाचे आणि राज्याचे राजकारण पाहीले तर देशपातळीवर आणि राज्यपातळीवर ही आता मुस्लिम समाजाचे सक्षम नेतृत्व राहीले नाही. मुस्लिम समाजातील नेत्यांनी धर्मनिरपेक्ष राजकारण ही भुमिका सोडून धर्मांध राजकारण सुरु केल्यामुळे ही ही परिस्थिती निर्माण झाली असेल. अशा परिस्थितीत मुस्लिम समाजाने धर्मनिरपेक्ष पक्षासोबत का रहावे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
▪️”एमएमडी” फॉर्म्युला प्रभावहीन
वरील सर्व परिस्थितीचा अभ्यास केला तर लोकसभा निवडणुकीत ज्या पध्दतीने आणि प्रभावाने एमएमडी फॅक्टर चा प्रभाव देशात वा महाराष्ट्रात पडला त्या पध्दतीचा प्रभाव या विधानसभा निवडणुकीत पडणार नसल्याचे जाणवते. वर्षानुवर्षे ज्या धर्मनिरपेक्ष पक्षाच्या मागे उभे राहुन ही जर हे धर्मनिरपेक्ष पक्ष आपल्या समाजाला विधानसभा व लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळवून देत नसतील तर त्या धर्मनिरपेक्ष पक्षाच्या मागे किती काळ उभे राहायचे याचा विचार आता मुस्लिम समाज करु लागला असल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत “एमएमडी” हा फॅक्टर प्रभावहीन राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.