लोकनेत्या डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या राजकीय झंझावाताची २२ वर्षे !


२२ मार्च पुण्यतिथी विशेष; भावपुर्ण आदरांजली !
केज विधानसभा मतदारसंघाला तसे महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पुर्वीपासुनचा इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपुर्वी मराठवाड्याचा हा विभाग निझाम राजवटीत येत असल्यामुळे या राजवटीत मोमिनाबाद या नावाने हा स्वतंत्र मतदार संघ अस्तित्वात होता. या मोमिनाबाद मतदार संघाचे १९५२ ते १९५७ या कालावधीत प्रतिनिधीत्व करण्याची संधी अंबाजोगाईचे व्दारकाप्रसाद चौधरी आणि बीडचे अँड. रामलिंग स्वामी यांना मिळाली. यावेळी निजाम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बी. रामकृष्ण राव तर आरोग्यमंत्री म्हणून फुलचंद गांधी हे काम पहात होते. आ. व्दारकाप्रसाद चौधरी यांच्या कार्यकाळात मोमिनाबाद येथे सुरु करण्यात आलेल्या टी. बी. मेमोरियल हाँस्पिटलचे उदघाटन फुलचंद गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते. १९५७ नंतर निजाम राजवट संपुष्टात आली आणि १९५७ साली महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत अनुसुचित जाती प्रवर्गातून गोविंदराव गायकवाड यांना काम करण्याची संधी मिळाली.


महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम विधान सभेसाठी १९५७ साली मतदान झाले. १९५७ साली सुरु झालेल्या या प्रक्रियेला आता ६७ वर्षे पुर्ण झाली असून या ६७ वर्षाच्या कालावधीत सुरुवातीची फक्त १० वर्षेच या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना मिळाली. सर्वप्रथम १९५७ आणि १९६२ या निवडणुकीत हा मतदार संघ अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित राहिला. या नंतर १९६७ आणि १९७२ यावर्षी हा मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी सुटला. या नंतर १९७८ साली हा मतदार संघ पुन्हा अनुसूचित जाती उमेदवारांसाठी आरक्षित राहिला. यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकी पुर्वी राज्यातील सर्वच मतदारसंघाची पुर्नरचना करण्यात आली आणि कांही नवीन विधानसभा मतदारसंघाची निर्मिती ही करण्यात आली. यानंतर मतदार संघातील अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या लक्षात घेता हा मतदार संघ पुन्हा पंचेवीस वर्षसाठी (२०२८ पर्यंत) अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे.


त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघाला आजपर्यंतच्या ७२ वर्षातील फक्त १० वर्षे सर्वसाधारण उमेदवारांना तर ५२ वर्षे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यापुढे २०२८ पर्यंत या मतदार संघाचे हे राखीव आरक्षण कायम राहणार आहे.
केज विधानसभा मतदारसंघात पहिल्या विधानसभेसाठी १९५७ साली मतदान झाले आणि अनुसूचित जाती या प्रवर्गातुन गोविंदराव गायकवाड यांना या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या नंतर १९६२ साली निवडणुका झाल्या. या निवडणुकीत ही गोविंदराव गायकवाड च निवडून आले आणि सर्वप्रथम सलग दहा वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी गोविंदराव गायकवाड यांना मिळाली.
१९६७ साली हा मतदार संघ सर्वसाधारण उमेदवारांसाठी मोकळा झाला. यावेळी झालेल्या निवडणुकीत माजलगाव येथील सुंदरराव सोळुंके हे माजलगाव विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे केज विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आले आणि विजयी ही झाले. यावेळी सर्वप्रथम या मतदारसंघाला राज्य मंत्रिमंडळात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या काळात राज्याचे मंत्री म्हणून सुंदरराव सोळुंके यांना काम पाहीले. या काळात सुंदरराव सोळंके यांनी मंत्री पदाचा उपयोग करून घेत केज विधानसभा मतदार संघात लक्षणीय विकास कामे केली. यानंतर १९७२ साली झालेल्या निवडणुकीत बाबुरावजी आडसकर हे विजयी झाले. या निवडणुकीत उच्च शिक्षीत अभ्यासु आणि सुसंस्कृत अशी प्रतिमा असलेले अँड. बापुसाहेब काळदाते हे बाबुराव आडसकर यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार होते. या निवडणुकीत बाबुराव आडसकर यांनी डॉ. बापुसाहेब काळदाते यांचा सरळ लढतीत पराभव केला. या निवडणुकीच्या निकालाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीतील विजयानंतर बाबुराव आडसकर हे चांगलेच चर्चेत आले होते.


१९७२ नंतर विधानसभा मतदार संघाची पुर्नरचना झाली आणि हा मतदारसंघ पुन्हा एकदा अनुसूचित जाती साठी आरक्षित झाला. पुढे १९७८ साली मध्यावधी निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत बी.एन. सातपुते हे विजयी झाले. त्यानंतर १९८० साली झालेल्या निवडणुकीत गंगाधर स्वामी यांना या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. विधानसभे साठी १९८५ साली झालेल्या निवडणुकीत परत बी. एन. सातपुते यांना या मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. जी. एन. स्वामी आणि बी. एन. सातपुते यांना १९७८ ते १९९० अशी सलग बारा वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र या दोघांनाही या राखीव मतदार संघात फार काही काम करुन आपला ठसा उमटवता आला नाही.
१९९० साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने डॉ. सौ. विमल मुंदडा सारख्या उच्च पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या नवख्या उमेदवारांला संधी दिली. आणि या संधीचे सोने करीत डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी पहिला विजय मिळवला. या पहिल्या निवडणुकीत बी.एन. सातपुते यांच्या विरोधात असलेल्या नकारात्मक मतांचा फायदा डॉ. सौ. विमल मुंदडा यांना झाला. या पहिल्या विजयानंतर १९९५ साली २००० साली २००५ साली आणि २००९ साली आणि २०१२ साली झालेल्या सलग पाच विधानसभा निवडणुकीत डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी सतत चढ्या मतांनी विक्रमी विजय संपादन केला. या मतदारसंघाचे सलग बावीस वर्षे प्रतिनिधित्व करण्याची संधी डॉ. सौ. विमल मुंदडा यांना संधी मिळाली. या बावीस वर्षाच्या काळात डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्री, कँबिनेट मंत्री असा चढता प्रवास केला. राज्य मंत्रीमंडळातील पाचव्या क्रमांकाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्री पदावर आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम करण्याचीही संधी मिळाली. या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी मतदार संघात ठळकपणे दिसणारी आणि लक्षात राहणारी अनेक विकास कामे केली. अंबाजोगाई जिल्हा व्हावा याचे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी निर्माण करुन ठेवले. जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असलेली अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उपजिल्हाधिकारी भु संपादनाची अनेक कार्यालये या कालावधीत त्यांनी येथे आणली.


याच काळात कँन्सर सारख्या असाध्यरोगाची सुक्ष्म लागण त्यांना झाली. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांच्या प्रकृतीची दखल घेत त्यांना २०१२ साली आवजड उद्दोग मंत्री विभागाचा कार्यभार सोपवला. अवजड उद्योग मंत्री म्हणून कार्यरत असतांनाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
केज विधानसभा मतदारसंघातील ६८ वर्षाच्या कालावधीतील डॉ. सौ. विमल मुंदडा याचा २२ वर्षाचा कार्यकाळ या मतदारसंघातील लोकांना राज्याच्या राजधानीत आणि राज्यात सन्मान मिळवून देणारा ठरला.
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्या. या पुर्नरचनेत केज विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक परीसीमा बदलल्या. या नव्या भौगोलिक परिस्थितीत तयार झालेला केज विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत डॉ. सौ. विमल मुंदडा या आजारी असतांनाही मतदारांनी त्यांना ४० हजाराच्या प्रचंड मताधिक्याने निवडुन दिले. ही पाच वर्षाची टर्म पुर्ण होण्याच्या आतच डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी जगाचा निरोप घेतला.


डॉ. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर रीक्त झालेल्या जागेवर पोट निवडणुकीत डॉ. विमलताई मुंदडा यांचे खंदे समर्थक पृथ्वीराज साठे विजयी झाले. यानंतर २०१४ च्या निवडणुकीत डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा सौ. नमिता मुंदडा, सौ. संगिता ठोंबरे यांच्या मधील सरळ लढतीत सौ. संगिता ठोंबरे यांचा विजय झाला. सौ. नमिता मुंदडा यांच्या पराभवाने खचुन न जाता नंदकिशोर मुंदडा, सौ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा सलग पाच वर्षे केज विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्येकाच्या सुखदुःखाची माहिती घेत त्यांनीही संपर्क कायमच ठेवला नाही तर वाढवला ही. या वाढत्या संपर्काचा फायदा सौ. नमिता मुंदडा यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झाला. भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर सौ. नमिता मुंदडा या पृथ्वीराज साठे यांचा पराभव करीत विजयी झाल्या.


केज विधानसभा मतदारसंघ हा २०२८ पर्यंत राखीव मतदारसंघ म्हणून राहणार आहे. आ. नमिता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांचा आजचा मतदारसंघातील संपर्क आणि आ. सौ. नमिता मुंदडा यांचा विधानसभेत काम करण्याचा परफॉर्मन्स लक्षात घेता आ. नमिता मुंदडा या २०२८ पर्यंत केज विधानसभा मतदारसंघावरील आपली पकड ढिली होवू देतील असे वाटत नाही. विद्यमान आ. नमिता मुंदडा यांनी आपल्या पहिल्याच टर्म मध्ये केज विधानसभा मतदार संघातील ग्रामीण आणि शहरी विभागाचे रुप पालटून टाकण्यात मोठा पुढाकार घेतला आहे. मतदार संघातील अंबाजोगाई आणि केज या प्रमुख शहरातील अंतर्गत रस्त्यांची करण्यात आलेली दर्जेदार कामे राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. मतदार संघातील पुरातण ऐतिहासिक मंदिरांच्या जतन आणि विस्तारीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी ही मागील ७२ वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच मिळाला आहे.
वास्तविक पहाता आज आपल्या सुनबाईचा विधानसभेतील परफॉर्मन्स पहायला डॉ. विमल मुंदडा या असायला हव्या होत्या. पण शेवटी इश्वरी इच्छेपुढे सर्वांनाच हात टेकावे लागतात.
स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व २००९ ते २०१२ अशी सलग २२ वर्षे केले. स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांना जावून आज जवळपास १५ वर्षाचा कालावधी उलटला आहे तरी डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांची लोकप्रियता अजून तुसभरही कमी झाली नाही हे विशेष. स्व. डॉ. विमल मुंदडा यांना आज पुण्यतिथी निमित्ताने भावपुर्ण आदरांजली..!