लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; दुधविक्रेत आले अडचणीत!
बीड जिल्ह्या शेजारील अहमदनगर जिल्ह्यात अनेक जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यात देखील याचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आष्टी तालुक्यातील पशुधन विकास कार्यालयाने संशयित जनावरांचे पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविलेले नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तीन गावांपैकी दोन गावांतील जनावरांचे नमुने बाधित आले आहेत.
आष्टी तालुक्यात लंपी स्कीन संसर्गजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून पशुधन विभागाने शीघ्र कृती दल स्थापन केले होते. लसीकरण मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, देवळाली, इमनगांव व फत्तेवडगाव या तीन गावातील जनावरांना लागण झाल्याचा संशय होता. येथील जनावरांचे नमुने ६ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी पशुधन विभागाने पुणे येथे पाठवले होते. यातील देवळाली व इमनगांव येथील नमुने गुरूवारी पाॅझिटिव्ह आले असून एका गावातील अहवाल येणे बाकी आहे. लंपी हा संसर्गजन्य आजाराने आता संपुर्ण बीड जिल्ह्यात शिरकाव केल्याने पशुधन अडचणीत आले आहे. शिवाय हा आजार असलेल्या गायी म्हशीचे दुध प्यायला नंतर हा आजार माणसांनाही होवू शकतो अशा अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील पशुधन विभाग आता सक्रिय झाला आहे.
गायींना मोठ्या प्रमाणावर हा आजार सुरु झाल्याचे निष्पन्न झाले असून आता पशुधन विकास कार्यालय अंतर्गत त्या गावातील पाच किलोमीटर अंतरावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. जनावरे बाधित असली तरी ती ठणठणीत असल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ.मंगेश ढेरे यांनी सांगितले.
गायी आणि म्हशीमध्येच प्रादुर्भाव
लम्पी हा एक त्वचा रोग असून यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला असला तरी दूध उकळून पिल्यावर कोणताही धोका राहणार नाही.


नागरिकांनी काय काळजी घ्यावी
लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काही धोका नाही. मात्र, लम्पीग्रस्त जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासूनही काही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने दिला आहे.
▪️महाराष्ट्रात काय स्थिती?
—————————
देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात लम्पी स्कीनचा धोका कमी आहे. सर्वाधिक नुकसान हे राजस्थानातील शेतकऱ्यांचे झाले आहे. महाराष्ट्रातील नगर, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, पुणे या जिल्ह्यामध्ये फैलाव झाला आहे. तर राज्यातील 850 जनावरांना लम्पीरोग झाला होता त्यापैकी 590 जनावरे ही बरी झाली आहेत.
▪️राजस्थानात 75 हजार जनावरे
दगावली
लम्पीचा सर्वाधिक धोका हा राजस्थानात निर्माण झाला आहे. या राज्यात 75 हजार गायी-म्हशी ह्या दगावल्या आहेत. राजस्थान पाठोपाठ गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मिर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे