राष्ट्रीय विचारांवर आधारित शिक्षण पद्धती चा ध्यास विद्यापीठांनी घेतला पाहिजे; ना. नितीन गडकरी यांचे मत


संतोष कुलकर्णी, नांदेड
मूल्याधिष्ठित जीवन पद्धती व राष्ट्रीय विचारांवर आधारित शिक्षणपद्धतीचा ध्यास विद्यापीठांनी घेतला पाहिजे असे मत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
भारतीय विद्यापीठातून ज्ञानाधिष्ठित व समाजकेंद्रित संशोधन होणे गरजेचे आहे. या संशोधनामधून तळागाळातील शोषित, पीडित माणसाचा आर्थिक व सामाजिक उत्कर्ष झाला पाहिजे. त्यासाठी सामाजिक युगानुकूल शिक्षण व राष्ट्रीय विचारांच्या पद्धतीचा, कौशल्यावर आधारित शिक्षण प्रवाहाचा ध्यास विद्यापीठांनी घेतला पाहिजे असे मत भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड येथे व्यक्त केले.
स्वाराती विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभप्रसंगी नामदार नितीन गडकरी व माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना मानद डी लीट प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला अणू आयोगाचे माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर आभासी पद्धतीने सहभागी होते. विद्यापीठाची कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव जोगेंद्रसिंह बिसेन यांची यावेळी उपस्थिती होती.
ना. गडकरी व कमलकिशोर कदम यांना विद्यापीठाने दिली डॉक्टरेट पदवी!
यावेळी उपस्थितांना व दीक्षांत समारंभामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदवी व डॉक्टर प्रदान करण्यात आली त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. आपल्या राजकीय सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रातील अनेक घटनांचा परामर्श त्यांनी आपल्या भाषणांमध्ये अतिशय समर्पक पद्धतीने त्यांनी केला.स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाने मला डॉक्टरेट ही मानद पदवी बहाल केली आहे . ही डॉक्टरेट पदवी विद्यापीठाचा सन्मान म्हणून ते मी स्वीकारत आहे. यापूर्वी चार विद्यापीठांनी मला डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. पण मी कधीच माझ्या नावाच्या पाठीमागे डॉ. लावत नाही. कारण मी नेहमीच प्रश्न विचारतो की मी या पात्रतेचा आहे का? निश्चितच मी स्वतःला या पात्रतेचा समजत नसल्यामुळे मी डॉ.पदवी माझ्या नावा पाठीमागे लावत नाही.
शिक्षणाने माणूस शिक्षीत होतो; सुसंस्कृत होतोच असे नाही !
शिक्षणातून माणूस सुशिक्षित होतो. परंतु सुसंस्कृत होतोच असे नाही. चांगले शिक्षण, संस्कार यांसाठी विद्यापीठ हे ज्ञानाचे केंद्र बनले पाहिजे या विद्यापीठामधून उपक्रमशीलता व विज्ञान तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून कौशल्याच्या आधारे ज्ञानाचे रूपांतर सामाजिक संपत्ती मध्ये झाली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक संस्कार रुपी व्यावहारिक ज्ञान विद्यापीठांनी शिकविले पाहिजे. विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करून व्यक्तिगत जीवन सुखी व समृद्ध बनवावे म्हणजे सामाजिक व राष्ट्रीय जीवन समृद्ध होईल. यशस्वी होईल.
माणसांमध्ये नम्रता, शालिनीता, सहजता असणे आवश्यक आहे हे त्यांनी अमिताभ बच्चन व स्वतःच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.


विनम्रता,शालीनता हे गुण असले पाहिजेत
एकदा रोड सेफ्टी च्या जाहिराती संदर्भामध्ये एक फिल्म बनविण्यासाठी काम करत असताना गडकरी यांच्या समवेत सुपरस्टार अमिताभ बच्चन हे सुद्धा होते. त्यावेळी पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी अमिताभ बच्चन सारखा मोठा माणूस उभा राहून त्या विद्यार्थ्यांचा सन्मान व आदर व्यक्त करतो. याबद्दल विचारले असता त्यांनी हे आपण केलेच पाहिजे असे सांगितले. यावरून आपल्याकडे विनम्रता शालिनीता व सहजता हे गुण असले पाहिजेत. असे मत प्रकट केले.
तसेच उद्योगपती रतन टाटा हे औरंगाबाद येथील डॉ हेडगेवार रुग्णालयाच्या कार्यक्रम प्रसंगी स्वतः विमान चालवत आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर ब्रिफकेस होती. ती ब्रिफकेस कोणालाही देत नव्हते. यावरून असामान्य व्यक्तींकडे असणारी नम्रता, शालिनीता समाजातील प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. असे विचार व्यक्त केले. शिक्षणातून चांगला, सुसंस्कारित व चारित्र्यवान माणूस घडला पाहिजे व तो जीवनाच्या परीक्षेमध्ये चांगला माणूस म्हणून यशस्वी झाला पाहिजे.
कमलकिशोर कदम यांनी शिक्षणाचे जाळे भारतभर निर्माण केले
गांधीवादी विचारसरणीवर अढळ व नितांत श्रद्धा ठेवून माजी शिक्षण मंत्री कम किशोर कदम यांनी एम टेक असतानाही शिक्षण क्षेत्रामध्ये एखाद्या आंत्रप्रिनर (उद्यमशील व्यक्तीसारखे) सारखे काम करून तंत्रशिक्षणाचे व व्यावसायिक शिक्षणाचे जाळे सबंध भारतभर निर्माण केले. नैतिक मूल्यांची जोपासना करून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेले अतुलनीय कार्य व वाखाण्याजोगे आहे. सध्या ‘ ‘गंगा गई गंगादास, यमुना गई यमुनादास ‘ अशी उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथापरंपरा व पायंडे पाडले जात असतानाही त्यांनी आपले जीवन ध्येय शिक्षणक्षेत्र निवडून त्या अनुरूप प्रामाणिक जीवनप्रवास शिक्षण व सामाजिक क्षेत्रामध्ये केला. समाजामध्ये मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. दुसऱ्यांच्या प्रतिकूल विचारांचा सन्मान करणे हे आम्हाला लोकशाहीने शिकविले आहे. विचारांशी प्रामाणिक असणारा प्रत्येकच आपल्यासाठी खूप मोठा आहे. ज्यांना आपण मोठे समजतो त्यांच्याकडून आपल्याला फारसे काही शिकायला मिळत नाही. परंतु ज्यांना आपण लहान समजतो ते आपल्याला आयुष्यामध्ये अनेक मोठ्या गोष्टी शिकविण्यासाठी मदत करत असतात. नैतिक मूल्ये, आर्थिक विचार, पर्यावरण व परिस्थितीकी यांचे संवर्धन विद्यापीठातून होणे गरजेचे आहे.
टाकाऊ पदार्थांपासून ही संपत्ती निर्माण करता येते
ज्ञानाचे संपत्ती मध्ये रूपांतर होण्याबरोबरच टाकाऊ पदार्थांचे ही संपत्ती मध्ये आपल्याला रूपांतर करता येते. हे मी स्वतःच्या उदाहरणांमधून शिकलेले आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर आपण पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी केले पाहिजे. मलेशिया या देशांमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये जी अतुलनीय अशी प्रगती झालेली आ.हे त्याचा वापर भारतामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये करण्याचा माझा मानस आहे भारतामध्ये दोन पिलर मध्ये 35 ते 40 मीटर अंतर ठेवले जाते याउलट मलेशिया या देशांमध्ये 120 मीटर इतके अंतर व ठेवून बांधकामाचा खर्च इतर देशांच्या तुलनेने खूप पटीने अत्यंत कमी केला जातो.
संशोधनाचा सामाजिक उत्कर्षासाठी वापर करा


या बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा भारतातील विद्यापीठांनी संशोधनासाठी वापर करून या संशोधनाचा सामाजिक उत्कर्षासाठी वापर केला पाहिजे. हिमाचल प्रदेशालगत असणारा कारगिल जवळील पहाडामध्ये 12000 कोटी खर्चाच्या टनेल निर्मितीचे काम केवळ 5600 कोटींमध्ये आपण भारतातील अभियंते व तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्यामध्ये यश मिळविले. समुद्रात जाणारे पाणी शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आपल्या देशामध्ये पाण्याची कमतरता नाही फक्त पावसाचे वाया जाणारे पाणी व नद्यांचे समुद्रामध्ये मिसळणारे पाणी आपल्याला वळवता येईल का? याचा विचार संशोधनातून झाला पाहिजे व पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला जमिनीमध्ये जिरवता कशी येईल यासाठी विद्यापीठांनी संशोधन करणे गरजेचे आहे.
इलेक्ट्रॉनिक ग्रीड प्रमाणे वॉटर ग्रीड आवश्यक
ज्या पद्धतीने आपल्याकडे नॅशनल इलेक्ट्रिसिटी ग्रीड आहे त्या पद्धतीने नॅशनल वॉटर ग्रीड सुद्धा निर्माण झाला पाहिजे. समाजाच्या गरजा ओळखून विद्यापीठांनी संशोधन केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या भावाला आधारभूत किंमत मिळाली व आपल्या खेडेगावाचे रूपांतर स्मार्ट व्हिलेज मध्ये रूपांतर झाले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण ही कमी होईल. सामाजिक गरजा ओळखून व प्रादेशिक विकासासाठी आवश्यक असणारे संशोधन विद्यापीठाने निर्माण केले पाहिजे. विकासाचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विद्यापीठांनी पुढे आले पाहिजे. विद्यापीठातून नोकरी मागणारे तरुण विकसित होण्याऐवजी नोकरी देणारे उद्यमशील उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. भारत हा आयात करणारा देश होण्याऐवजी निर्यात करणारा देश झाला पाहिजे. त्यांनी यासाठी एक हिंदीमधील प्रसिद्ध कविता यावेळी सांगितली
“वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे
यही पशु प्रवृत्ती है आप आप ही चरे.”
माणूस हा आपल्या जातींनी नव्हे तर आपल्या गुणांनी मोठा होत असतो. त्यामुळे मानवतेच्या आधारावर माणसाचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे शाळा स्तरावर व विद्यापीठ स्तरावर कौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा व मूल्यांचा विकास शिक्षण पद्धतीतून घडला पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.