महाराष्ट्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला मिळणार नवसंजीवनी !

डॉ.शार्दुल भणगे-धामणगांवकर

२०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या कक्षाची गरीब गरजू रुग्णांना किती आणि कशाप्रकारे गरज आहे हे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. अखेर राज्यकर्ता रयतेचे हित साधणारा असेल तर समाजातील सद्गुणांची आणि सद्विचारांची पारख देखील त्या व्यक्तीला निश्चीतच असते. याच भावनेने तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजींनी मार्च २०१५ मध्ये या कक्षाला मान्यता दिली. सध्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.भारती पवार यांचे सहसचिव असलेले ओमप्रकाश शेटे हे त्यावेळी या कक्षाचे प्रमुख होते.

त्यांच्या कार्यतत्परतेने तेंव्हा जवळपास पन्नास हजार गोरगरीब रुग्णांसाठी ५०० कोटींहून अधिकची मदत या कक्षाद्वारे झाली. यामध्ये महाआरोग्य शिबीरे, गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रिया, अपघातस्थळी तात्काळ मदत व रुग्ण पुर्णपणे बरा होईपर्यंत लागणारा खर्च, लहान मुलांच्या, महिलांच्या आरोग्याची काळजी, अपंगांना आधारासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा या सर्वच गोष्टींचा समावेश प्रामुख्याने होता. मविआ सरकारच्या काळात संबंधीत कक्षाचे काम काही कारणास्तव ठप्प झाले होते. वास्तविक कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थीतीमध्ये अशाप्रकारे आरोग्यसुविधा पुरवणाऱ्या कक्षाचे काम ठप्प होणे निश्चितच योग्य नव्हते. सुदैवाने मविआ सरकारमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार असलेले ना.शिंदे हे संवेदनशील मनाचे व्यक्ती प्रमुख मंत्री म्हणून कार्यरत होते. म्हणून त्यांच्या प्रेरणेतून आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली.

आरोग्यदूत मंगेश चिवटेंच्या संकल्पनेतून ठाण्यामध्ये या कक्षाची वॉररुम देखील बनवण्यात आली. यामध्ये कोरोनामध्ये सर्वाधिक गरज असलेल्या बेडसाठी, रेमडिसीवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी, आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर बेडसाठी, म्युकरमायकोसिससाठी हे व यासमान अन्य काही महत्वपूर्ण बाबींकरीता स्वतंत्र विभाग स्थापन केले गेले. संबंधीत विभागात २४×७ स्वयंसेवक उपलब्ध होते. यामुळे राज्यातील बहुतांश गरजूंना आधार मिळाला. एखाद्या नेतृत्वाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणिव ठेवत एवढे मोठे काम आपली जबाबदारी समजून खांद्यावर घेण्याचे उदाहरण ना.एकनाथभाईंच्या रुपाने महाराष्ट्राने अनुभवले.

आता नुकतेच राज्यात नवीन सरकार स्थापन होवून जेमतेम पंधरा दिवस झाले असतील तोच मंगेश चिवटे यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करत देवेंद्रनाथांच्या सरकारने पुन्हा एकदा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षास नवसंजीवनी दिली आहे. मंगेश चिवटे यांनी सुरुवातीचा काही काळ पत्रकारिता देखील केली आहे. कालांतराने त्यांनी समाजकार्याची आवड असल्यामुळे या कामात झोकून दिले. माध्यमांशी संवाद साधत असताना हे ईश्वरीय कार्य आहे, माझ्या संपूर्ण समूहाच्या सहकार्याने हे पूर्णत्वास जात असून भविष्यात देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाने हा कक्ष गतीमान होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असे अभिवचन मंगेश चिवटे यांनी दिले.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button