मोठी बातमी; राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ७५ प्राध्यापकांच्या बदल्यांचे आदेश


महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ७५ प्राध्यापकांच्या बदल्यांचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयाने १० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा काढले असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. या बदली आदेशामुळे राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रुग्णसेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चर्चा राज्यभर होत आहे.
वैद्यकीय प्राध्यापकांमध्ये खळबळ
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयाने १० ऑगस्ट रोजी राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या बदल्यांचे काढलेले आदेश रात्री ८ वाजे नंतर एकापाठोपाठ समाज माध्यमांद्वारे वैद्यकीय शिक्षकांच्या ग्रुप वर येवून आदळु लागले. सदरील आदेशामुळे राज्यभरातील शासकीय वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वैद्यकीय शिक्षकांना शिस्त लावण्याचे केले काम


महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या प्राध्यापकांच्या बदल्यांचा घाट वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयात गेली अनेक महिन्यांपासून घटत होता. या विभागाच्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अश्विनी जोशी यांनी गतवर्षी या विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी मोठे निर्णय घेतले. राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक वर्ग कार्यरत असतांनाही मुख्यालयी न रहाता व वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवेत सहभाग न घेता भलामोठा पगार दरमहा उचलतात हे लक्षात आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेक्रेटरी डॉ. अश्विनी जोशी यांनी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व इतर कर्मचा-यांना बायोमेट्रिक सिस्टीम बंधन कारक केली. ज्या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांचे बायोमेट्रिक होते त्यांचाच पगार काढण्यात यावा असे सक्त आदेश ही त्यांनी दिले. या आदेशामुळे ऊंटावरुन शेळ्या हाकणा-या प्राध्यापकांची चांगलीच पंचायत झाली. पगार हवा असेल तर काम करा या नियमाचा बराच फरक पडला आणि दांडीबहाद्दर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांना पगारासाठी बायोमेट्रिक करण्यासाठी मुख्यालयीच थांबण्याची वेळ आली.
१० वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या प्राध्यापकांच्याच केल्या बदल्या
या कठोर निर्णयानंतर सेक्रेटरी डॉ. अश्विनी जोशी यांनी गेली अनेक महिन्यांपासून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या आणि १० वर्षांच्या पुर्वीपासून एकाच जागेवर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या बदल्या करण्याची व्युहरचना आखत होत्या. या व्युह रचनेत राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ९३ प्राध्यापकांच्या बदल्यांचा प्रस्ताव त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे समोर ठेवला. या ९३ प्रस्तावांपैकी ७५ बदल्यांचे प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयाने मान्य केले असून या विभागाचे अव्वर सचीव मनोहर बंदपट्टे यांच्या स्वाक्षरीने हे सर्व ७५ आदेश १० ऑगस्ट रोजी काढले.


७५ बदल्यांचे आदेशाचा धाडसी निर्णय
महाराष्ट्र राज्य शासनाच्या आज पर्यंतच्या वैद्यकीय शिक्षण विभागात प्राध्यापकांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी बदली आदेश काढण्यात आल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयाने काढलेल्या या बदली आदेशात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांचा समावेश आहे. यात मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, नाककानघसा विभागाचे प्रमुख डॉ.प्रशांत देशपांडे, फिजिऑलॉजी विभागप्रमुख डॉ. सुनिता हंडरगुळे (बिराजदार), भुल शास्त्र विभागाचे डॉ. अभिमन्यु तरकसे आणि पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. मुकुंद मोगरेकर यांचा समावेश आहे.
कोण आहेत डॉ.अश्विनी जोशी?


वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अश्विनी जोशी या चिपळूण येथील रहिवासी असून डॉक्टर कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. त्या दंत चिकित्सक आहेत. २००६ साली घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत त्या १३ वा रॅंक मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. मुंबई येथे विकास आयुक्त (असंघटित कामगार) कार्यरत असतांना त्यांची बदली वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव म्हणून बदली करण्यात आली.
विस्कटलेली आरोग्य व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी डॉ.अश्विनी जोशी यांची नियुक्ती
राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ७४ प्राध्यापकांच्या एकाच दिवशी बदल्या करणा-या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सेक्रेटरी डॉ. अश्विनी जोशी यांची महाराष्ट्र शासनाने कोवीडचा दुसरा पेज संपल्यानंतर या विभागाचे सेक्रेटरी म्हणून अतिरिक्त पदभार दिला. कोवीड काळात झालेल्या अतिरिक्त खरेदी, अनाठायी खर्च आणि विस्कटलेली आरोग्य व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनात असंघटित कामगार विभागाच्या आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी यांची ही विशेष नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते.


सेवेत दिरंगाई करणा-या कर्मचाऱ्यांच्या कर्दनकाळ
डॉ. अश्विनी जोशी या शासकीय सेवेत कर्तव्यात कसूर करणा-यांचा कर्दनकाळ, भ्रष्टाचारापासून शेकडोकोस दुर आणि मंत्र्यांसंत्र्यांच्या दबावाला बळी न पडणा-या एक कणखर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
ना. नितीन गडकरी यांनी केली होती तक्रार!
डॉ. अश्विनी जोशी यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयाच्या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एक पत्र लिहून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणल्याबद्दल डॉ. अश्विनी जोशी यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली होती. कॉलेज ऑफ फिजिशिएन ऍण्ड सर्जन संलग्न (CPS) व्दारे ऑफर केलेल्या अभ्यासक्रमाशी संबंधित १,१०० वैद्यकीय प्रवेश रोखल्या बध्दलचा आरोप या पत्रात करण्यात आला होता.
निर्णय चुक की बरोबर काळच ठरवणार!
महाराष्ट्रातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ७५ प्राध्यापकांच्या बदलीचा धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय आता राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्ण सेवा अधिक परिणामकारक करणारा ठरु शकतो की रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम करणारा ठरु शकतो हे आता काळच ठरवणार आहे.