मुरंबी सिंचन तलावाचा बुझवला डावा कालवा पुर्ववत करण्याच्या मागणीसाठी जलसमाधी करण्याचा प्रयत्न


अंबाजोगाई तालुक्यातील उजणी येथील मध्यम सिंचन प्रकल्पाच्या शेजारी असलेला डावा कालवा गावातील शेतकऱ्यांनी परस्पर बुझवला असून सदरील कालवा पुर्ववत खुला करावा या मागणीसाठी अनेक वर्षांपासून कायदेशीर मार्गाने लढणा-या संतोष स्वामी या तरुणाने आज अखेर जलसमाधी घेण्यासाठी मुरंबी तलावात प्रवेश केला आणि प्रशासनाचे धाबे दणाणले.
अंबाजोगाई तालुक्यातील मुरंबी सिंचन तलावात प्रत्येक वर्षी भरपुर पाण्याचा साठा असतो. या तलावाच्या डाव्या कालव्यातून अनेकवेळा पाणी सोडण्यात येते. तलावापासुन सावरत: दीड किमी अंतराचा हा कालवा गावातील शेतकऱ्यांनी शासनाची परवानगी न घेता अचानक बुजवून टाकला होता.


या कालव्याच्या बाजूला संतोष स्वामी यांची जमीन आहे. सदरील कालवा बुझवल्यामुळे पावसाळ्यात अतिरिक्त झालेल्या पावसाने प्रवाह बदलला व संतोष स्वामी यांच्या शेतात पाणी घुसल्यामुळे शेत जमीन वाहुन गेली व भरपुर नुकसान झाले. तेंव्हा शेतकऱ्यांनी बुझवला हा कालवा पाटबंधारे विभागाने पुन्हा पुर्ववत करावा, संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, आपली शेतजमीन वाहुन गेली त्यामुळे आपणास नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या साठी संतोष स्वामी यांची पाटबंधारे विभाग, तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार मागणी केली होती.
कालवा बुझवल्यामुळे शेत जमिनीचे झाले नुकसान!


आपल्या मागणीची दखल शासन दरबारी घेतली जात नाही हे पाहून संतोष स्वामी याने आज १ एप्रिल रोजी मुरंबी तलावात जलसमाधी घेणार असल्याचे प्रशासनाला निवेदनाद्वारे कळवले होते. त्याप्रमाणे सकाळी आठ वाजता संतोष स्वामी याने मुरंबी तलावात हातात काळा झेंडा घेवून पाटबंधारे प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत जलसमाधी घेण्यासाठी तलावात उतरला आणि प्रशासनाचे धाबे दणाणले!


प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!
आज जिल्हाधिकारी दिपा मुधोळ या एका कार्यक्रमासाठी अंबाजोगाई येथे येणार असल्यामुळे महसूल प्रशासन या बाबतीत अलर्ट होते. संतोष स्वामी जलसमाधी घेण्यासाठी तलावात उतरला असल्याची माहिती मिळतात अंबाजोगाई चे तहसीलदार बिपीन पाटील यांनी तातडीने मुरंबी तलावाकडे धाव घेत प्रशासनाच्या वतीने संतोष स्वामी यांची समजुत घालुन पाटबंधारे विभागाच्या संबंधित उपभियंत्यांना बोलावून तातडीने हा डावा कालवा पुर्ववत करण्याच्या सुचना दिल्या. सदरील सुचनेप्रमाणे कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संतोष स्वामी हा तलावाबाहेर आलाव प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.