मालवणच्या सागरी जलतरण स्पर्धेतवरवटी येथील ८ वर्षीय दिव्यांग जलतरणपटूने पटकावले ब्राँझ पदक

मालवण येथे नुकत्याच झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील आठ वर्षीय दिव्यांग जलतरणपटू स्वरा चाटे हिने ऐतिहासिक कामगिरी केली असून १ किमी शर्यतीत ब्रॉन्झ पदक मिळवले आहे. सदरील यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे सिंधुदुर्ग जलतरण संघटना व महाराष्ट्र जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १३ व १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या भव्य स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामांकित जलतरणपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
पहिल्याच स्पर्धेत राज्यपातळीवर पदक पटकावत स्वरा चाटे हिने आपली गुणवत्ता, जिद्द व आत्मविश्वास सिद्ध केला. तिच्या या यशामुळे बीड जिल्हा तसेच अंबाजोगाई तालुक्याचा नावलौकिक राज्यभर वाढला आहे. खुल्या सागरातील कठीण परिस्थिती, उंच लाटा व मोठे अंतर असूनही स्वरा हिने दाखवलेली चिकाटी, धैर्य आणि आत्मविश्वास उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गावची अवघी आठ वर्षांची दिव्यांग जलतरणपटू कु. स्वरा लक्ष्मीकांत चाटे हिने १ किलोमीटर खुल्या सागर जलतरण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत ब्रॉन्झ पदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. स्वरा ही ब्रह्मदेव केरबा चाटे यांची नात असून, तिची ही पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती.
कु. स्वरा चाटे हिच्या या घवघवीत यशाबद्दल वरवटी गावचे सरपंच सुधीर चाटे, समस्त ग्रामस्थ, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भविष्यात स्वरा चाटे ही राज्य व राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव उज्वल करेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे.