Uncategorizedमहाराष्ट्र

“मार्गशीर्ष पौर्णिमा” योगेश्वरी मातेचा प्रगटदिन

जगतजननी, जगनमाता, त्रिपुरासुंदरी योगेश्वरी मातेचा मार्गशीर्ष महोत्सव १४ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहाने सुरु होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा हा योगेश्वरी मातेचा प्रगटदिन असल्यामुळे या महोत्सवास अनादिकालापासून विशेष महत्व आहे.
आदिमाता श्री जगदंबेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी अंबाजोगाई येथील योगेश्वरी माता हे एक शक्तीपीठ आहे. आदिमाता जगदंबा ही येथे योगेश्वरी मातेच्या रुपाने अनादिकाला पासून वास्तव्यास आहे.
योगेश्वरी माता ही अंबाजोगाई पंचक्रोशीतील लोकांची ग्रामदेवता आहे तर कोकणवासीयांची कुलदेवता आहे. या मंदीराचे बांधकाम हेमाडपंथी असून मंदीरावरील शिखर हे पाच मजली आहे. या शिखराची ऊंची सत्तर फुट आहे. शिखराच्या पहिल्या मजल्यावर चारही बाजूंनी रामायण महाभारतातील निवडक प्रसंग असून दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर योगेश्वरी देवीचे व्दादश अवतार कोरलेले आहेत. चौथ्या मजल्यावर नवग्रह आणि पाचव्या मजल्यावर सप्तऋषी विराजमान झालेले आहेत.
असे हे वैशिष्ट्यपुर्ण शिल्पांनी चित्तारलेले आणि अप्रतिम कलाकुसर असलेले हे शिखर आहे.


अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. या शहरात उपलब्ध असलेल्या जैन, वैष्णव आणि शैव लेण्या व त्यावरील शिलालेखावरुन हे शहर सुमारे दीड हजार वर्षापुर्वी अस्तित्वात आले असावे असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. या शहरात वास्तव्यास असलेल्या योगेश्वरी माता व योगेश्वरी माता मंदिराच्या संदर्भात हे मंदिर केंव्हा आणि कोणी बांधले याच्या नोंदी पुराणग्रंथात उपलब्ध नाहीत. मात्र योगेश्वरी माते संदर्भातील अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे दंतकथेत उल्लेख करण्यात आलेल्या अनेक घटनांचे तपशील आज ही या शहरात उपलब्ध आहेत.
योगेश्वरी माता मंदीराचा स्पष्ट उल्लेख असलेली पहिली नोंद “आनंद रामायणातील यात्राकांड” या ग्रंथात (सर्ग ७ वा) मध्ये केली आहे. या ग्रंथात श्रीरामाची दक्षीणयात्रा वर्णन केलेली आहे. यामध्ये योगेश्वरी देवी व अंबाजोगाई शहराचा उल्लेख आला आहे. लंका विजयानंतर सीतेसह राम पुष्पक विमानातुन आयोध्या नगरीस परत जात असतांना प्रभु श्रीरामाने सीतामातेस पुष्पक विमानातुन हे मंदीर व शहर दाखवले असा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. या ग्रंथात


योगेश्वरी वरामंबां।
दृष्टवा ह्यंबापुरस्थितम्।।
असे वर्णन करण्यात आले आहे.
याशिवाय पुराण काळात देवीचा अवतार निर्माण झाला तेंव्हा देखील हे शहर अस्तित्वात असल्याचा उल्लेख योगेश्वरी महात्म्यात आहे. योगेश्वरी देवीचा अवतार येथील ऋषी मुनींच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी झाला होता असे पुराणात सांगण्यात आले आहे. त्यामुळेच योगेश्वरी देवीच्या अवतार काळापुर्वी देखील येथे लोकवस्ती होती असे म्हणण्यास हरकत नाही.
या आदिशक्तीची पुजा केंव्हापासुन सुरु झाली ते पहावयाचे झाल्यास ऋग्वेद कालाइतके मागे जावे लागेल. हा काळ म्हणजे शैव, शाक्त, वैष्णव, इत्यादी पंथातील उपास्य देवतांची समन्वय घडवून आणणारी पंचायतन पुजा सुरु झाली तो काळ आसावा. ही पंचायतन पुजा गुप्त्तोत्तर काळात म्हणजेच सुमारे दीड हजार वर्षापुर्वी सुरु झाली असे अनुमान इतिहासकारांनी काढलेले आहे.
एकदा कांही ऋषीमुनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अंबानगरीत आले. योगेश्वरी देवीची पुजा व स्तुती केल्यानंतर ते देवलऋषी़च्या आश्रमात आले. देवलाने त्यांचा आदरसत्कार केला. येथील पवित्र व रमणीय वातावरण पाहुन सर्व ऋषींनी येथे यज्ञ करण्याचे ठरवले. पण यज्ञासाठी पाणी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. देवलाने व सर्व ऋषींनी देवीची प्रार्थना केली. भक्तांची हाक ऐकून देवी गरुडावर आरुढ होवून तेथे अवतीर्ण झाली. देवीच्या प्रत्यक्ष दर्शनाने ऋषी धन्य झाले. नंतर देवलमुनी देवीला म्हणाले, “जगन्माते, तुझ्या भक्तांना येथे यज्ञ करण्याची इच्छा आहे पण यज्ञासाठी पाणी उपलब्ध नाही.” देवीने भक्ताचे मनोरथ पुर्ण करण्यासाठी गरुडाला गंगेचे पाणी आणण्याची आज्ञा केली. गरुडाने आपल्या चोचीने पाषाणाला भेद केला व पाताळ लोकातून गंगेचे पवीत्रपाणी यज्ञासाठी बाहेर आणले. असा उल्लेख “योगेश्वरी महात्म्य” या पुराणग्रंथात आढळून येतो.
“योगेश्वरी महात्म्य” या संस्कृत हस्तलिखित ग्रंथातील श्लोकबध्द कथेत असे सांगण्यात आले आहे की, “त्रिपुरसुंदरी योगेश्वरी चे बालपण कोकणात गेले. पुढे ती वयात आल्यानंतर तीचा विवाह परळी येथील वैजनाथांशी ठरला. परंतु तिला त्याच्याशी लग्न न करता आपल्या पुर्व जन्मीच्या एका घटनेचा बदला काढायचा होता. “राम अवतार” या ग्रंथात सीता हरणानंतर शोकाकुल अवस्थेत झाडांना मिठ्या मारत सीतेच्या नावाने हाका मारत फिरणारा राम एवढा खुळा कसा? तो सर्वज्ञ व श्रेष्ठ असेल तर अंतर्ज्ञानाने सीता कोठे आहे हे त्याला का कळू नये? अशा रामाचे स्मरण तुम्ही का करता? असे पार्वतीने शंकराला विचारले होते. यावेळी शंकराने “राम मनुष्य अवस्थेत असल्यामुळे या मानवी लिला घडत आहेत, वास्तविक तो सर्वज्ञ श्रेष्ठ आहेच” असे उत्तर दिले होते.


मात्र पार्वतीला हे उत्तर न पटले नाही. व पहा मी त्याची कशी गंमत करते असे सांगून पार्वतीने सीतेचे रुप घेतले.व ती रामाच्या वाटेत थांबली. तेंव्हा रामाने अंतर्ज्ञानाने सीतेचे रुप घेतलेल्या पार्वतीला ओळखून “माता आपण हे कष्ट कशासाठी घेतलेत?” असा प्रश्न केला. तेंव्हा ही सीता खजील होवून शंकराकडे परतली. तेंव्हा शंकराने पार्वतीला सीतेच्या रुपात आपल्या आराध्य दैवतेच्या पत्नीच्या मायावी रुपात पाहिल्याने पार्वती कडे पत्नी म्हणून लक्ष देणे सोडून दिले होते. या घटनेचा बदला घेण्यासाठी पार्वतीने योगेश्वरी चा आवतार घेतला व ती वैद्यनाथांशी लग्न ठरुनही गप्पच राहिली. या लग्नाचा मुहूर्त सुर्योदयापुर्वी ठरला होता. योगेश्वरी चे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडवात वधू कडील मंडळी धामधुमीत होती. सुर्योदयापुर्वी परळीचे वैद्यनाथ भुयारी मार्गे मांडवात आले. परंतु योगेश्वरी मुद्दाम उशीरा उठली व साजशृंगाराचा बहाणा करीत लग्न मुहूर्त टाळावा म्हणून वेळ काढीत राहिली. आणि घडलेही तसेच. प्रातकाळी कोंबडा आरवला आणि लग्नाचा मुहूर्त टळून गेल्याने लग्न रद्द झाले. तेंव्हा आपला
अपमान झाल्याने वैद्यनाथाने आपल्या जटा पिंजारुन क्रोधाने थरथरत शापवाणी उच्चारली की, “वधू पक्षाची मंडळी पाषाण होवून पडतील.” आणि झाले ही तसेच. संपुर्ण व-हाडी दगड होवून पडले. आणि योगेश्वरी कुमारी देवताच राहिली. अंबाजोगाईच्या जोगाईचे माहेर (हत्तीखाना) आज ही योगेश्वरी व वैद्यनाथांच्या लग्नाची साक्ष देत उभा आहे.
योगेश्वरी माता ही कोकणस्थांची कुलदेवता कशी? असा प्रश्न अनेकांना पडतो. यासंदर्भाशी निगडीत ही एक दंतकथा सांगितली जाते. “कोकणात समुद्र किनारी भगवान परशुराम वास्तव्य करीत असतांना एकदा चौदा जणांची प्रेते समुद्राच्या भरतीच्या लाटेबरोबर समुद्र किनाऱ्यावर आली. परशुरामाने त्यांना आपल्या योगसामर्थ्याने पुन्हा सजीव केले. परंतु ते मेले व त्यांना भंडाग्नी दिल्याची वार्ता तो पर्यंत त्या विभागात पसरली होती. त्यामुळे परत जीवंत करण्यात आलेल्या त्या चित्तपावनांचे विवाह होईनात. तेंव्हा ते परशुरामासोबत वधु शोधत शोधत थेट अंबानगरीत पोहंचले. बोलाचाली झाल्या तेंव्हा अंबावाशियांनी त्यांना एक अट घातली की, “आम्ही आमच्या मुलींचे विवाह तुमच्या सोबत करण्यासाठी परवानगी देतो, मात्र या दांपत्याने व पुढे त्यांच्या वंशजांनी योगेश्वरी ला आपली कुलदेवता मानावे.” ही अट मान्य झाल्याने त्या चौदा चित्तपावनांचे विवाह होवून ते कोकणात परतले. तेंव्हापासून कोकणातल्या चित्तपावनांची योगेश्वरी ही कुलदेवता झाली.

मार्गशीर्ष पौर्णिमा; योगेश्वरी मातेचा प्रगटदिन


मार्गशीर्ष पौर्णिमा हा योगेश्वरी देवीचा प्रगटनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या बरोब्बर दहा दिवस अगोदर योगेश्वरी मंदिरात मार्गशीर्ष महोत्सवात मोठ्या उत्साहाने देवीची महापुजा करुन सुरुवात करण्यात येते. या दहा दिवसाच्या कालावधीत योगेश्वरी मातेवर नितांत श्रध्दा असलेले हजारो लोक आपल्या इच्छित मनोकामनेच्या पुर्ततेसाठी दहा, सात, पाच, तीन दिवस, दीड दिवस, एक दिवसचा निवास मंदिर परीसरातील ओव-यांमध्ये करुन योगेश्वरी मातेची मनोभावे आराधना करतात. गतवर्षी मंदिर परीसरात सुमारे साडेसहा हजार भक्तगण मंदिर परीसरात निवासास होते अशी नोंद देवल कमेटीकडे आहे. या कालावधीत जागर, गोंधळ, भजन, आराधी गाणे यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन योगेश्वरी देवल कमेटीच्या वतीने करण्यात येते.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी रात्री योगेश्वरी मातेची पालखी मिरवणुक संपुर्ण शहरातुन काढली जाते. मिरवणुकीत देवीपुढे व मिरवणुकी नंतर मंदीराशेजारील जयवंती नदीच्या किनारी शोभिवंत दारु उडवून योगेश्वरी मातेचा हा प्रगटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पारंपरिक पध्दत आहे.


नित्यपुजा
रोज पहाटे पाचला योगेश्वरीच्या प्रात:पूजनास मंगल सनई चौघड्यांच्या आवाजात प्रारंभ होतो. दुपारी पुर्न जेवनाचा नेवेद्य दाखवला जातो. देवीला कुटलेल्या पानांचा विडा (तांबुल) दिला जातो. याचा प्रसाद भक्तांना देण्यात येतो. संध्याकाळी ही पुजा नैवैद्द होतो. रात्री ९ चे सुमारास शेजारती होते.


नैमित्तिक पुजा
मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे खास विशेष दिवस. या दिवशी रोजच्या प्रमाणे त्रिकाल पुजा होतातच. शुक्रवारी मंदीर परीसरात देवीचा छबीना काढण्यात येतो. त्यात महिलावर्गाचा विशेष सहभाग असतो. या सोबतच मार्गशीर्ष आणि माघ महिन्याच्या पौर्णिमेस ही योगेश्वरी चा छबीना काढण्यात येतो.


अलंकार पुजा
योगेश्वरी देवी ही योग उपासक आहे. ती योगिनी आहे. त्यामुळे तिला खरे तर दागदागिने, अलंकार याची होस नाही. परंतु भक्तांना मात्र आपल्या देवीला नानाविध अलंकार देण्यात, तिला नटवण्यात, सजवण्यात विशेष आनंद होत असल्याने देवी भक्तांनी दिलेले असे अलंकार हे देवीच्या अंगावर मुद्दाम चढवले जातात. त्यालाच अलंकार पुजा असे म्हणतात. प्रामुख्याने अशी ही सर्वअलंकार पुजा ही गुढीपाडवा, दिपावली, नवरात्र महोत्सव व मार्गशीर्ष महिन्यातील विशेष उत्सवाच्या वेळी केली जाते.

🙏

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker