माजी आ. संजय दौंड परळी मधुन निवडणुक लढवण्याच्या तयारीत
मिळाली तर “तुतारी” अन्यथा वेगळा विचार करु ; संवाद मेळाव्यात घोषणा
परळी विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे माजी आ. संजय दौंड यांनी परळी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे जर तुतारी चिन्ह मिळाले तर ठीक अन्यथा अपक्ष ही लढू असा निश्चय अंबाजोगाई येथे दौंड यांच्या फार्म हाऊस मध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
माजी आ. संजय दौंड यांनी त्यांच्या फार्म हाऊस मध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित केली होती. परळी विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांची भावना ही माजी आमदार संजय दौंड यांनी निवडणूक लढवावी अशीच होती. कारण गेल्या पाच वर्षात दौंड समर्थक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात घुसमट होत असून त्या ठिकाणी दौंड यांच्या कार्यकर्त्यांना दुय्यम प्रकारची वागणूक मिळत आहे. म्हणून दौंड यांनी वेगळा मार्ग अवलंबवावा व विधानसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भावना जाणून घेऊन माजी आ. संजय दौंड यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, मला बदनाम करण्याचा कुटील डाव सुरू आहे मला विधान परिषदेची आमदारकी देण्यात प्रामुख्याने खा.शरदचंद्र पवार, अजितदादा पवार,आ.जयंत पाटील व ना. धनंजय मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. परळी विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे करीत असताना ना.धनंजय परळी विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे करत असताना ना. धनंजय मुंडे यांचे सहकार्य लाभले नव्हे तर त्यांनी भरपूर सहकार्य या ठिकाणी केले.
मात्र गेल्या सहा महिन्यापासून मतदार संघातील वातावरण गढूळ बनत चालले आहे.सामान्य कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा उद्योग सुरू आहे. मतदार संघात एकमेकांच्या अंगावर लोक पाठवले जात आहेत. ज्याचा त्रास सामान्य माणसाला बसू लागला आहे.या मतदारसंघाचे जे वातावरण होते ते वातावरण पूर्णपणे बिघडून गेले आहे. पैशाच्या व सत्तेच्या जोरावर काहीही धंदे सुरू आहेत याला थांबवण्याची गरज आहे.ना. धनंजय मुंडे यांच्या पश्चात विनाकारण माझ्यावर चिखल उडवली जात आहे. या संदर्भात मी स्वतः ना. धनंजय मुंडे यांच्याशी बोललो आहे. मी माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात स्वार्थ कधी पहिला नाही सतत सामान्य माणसाच्या व शेतकरी बांधवाच्या हितासाठी सातत्याने भूमिका घेतली.
मतदारांना ज्या पद्धतीने एकदा मतदान केले की पाच वर्ष बांधील रहावे लागते त्या प्रमाणे मी लोकसभापर्यंत सोबत राहिलो पण मला त्यांनी पहिले अडीच वर्ष व नंतरची सहा वर्ष अशी विधानपरिषदेच्या आमदारकीचा शब्द दिला होता. वारंवार त्यांना सांगून काही फरक पडत नव्हता वेळ मारून नेते होत होते. तसेच त्यांच्या बैठकीतील कार्यकर्ते माझ्याविषयी टिंगल टवाळी करीत होते. ज्या ठिकाणी सन्मान नाही त्या ठिकाणी राहायचे नाही माझ्या मनाने सांगितले आणि योग्य तो निर्णय जनता जनार्धन करेल म्हणून हा संवाद मेळावा आयोजित केला असल्याचे सांगत आता परिस्थिती पाहता आपणास योग्य विचार करण्याची वेळ आली आहे.
राजकारणात जनता ही सर्वोच्च आहे त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. याच जनतेने अनेकांना सत्तेच्या पदावर बसवले आहे तर अनेकांना खाली सुद्धा उतरविले आहे.मतदार संघात त्यांच्याविषयी चीड व संताप निर्माण झाला आहे. म्हणून येत्या दोन दिवसात तुम्हाला अपेक्षित असा निर्णय होऊ शकतो तुमच्या भावना हीच माझी भावना आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आपण तुतारी चिन्ह मागितलेले आहे. जर मिळाली तुतारी तर ठीक किंवा अन्य पर्याय आपल्यासमोर खुले असल्याचे दौंड यांनी सांगितले. या बैठकीला परळी विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.