मांजरा धरण ८६ टक्के भरले..! धरणक्षेत्रात पाण्याचा येवा वाढला


प्रति सेकंदाला ७३.६५ घनमीटर पाण्याची आवक
मांजरा प्रकल्प क्षेत्रात या आठवड्यातसुरु झालेल्या परतीच्या पावसाने धरणातील जीवंत पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून १३ ऑक्टोबर रोजी दुपारी पर्यंत धरणात८६.७६ टक्के जीवंत पाणीसाठा जमा झाला होता. १४ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत हाहाकार ८८ टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. धरणात येणा-या पाण्याची आवक पहाता आता धरण लवकरच भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीड लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील शेकडो गावातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न मांजरा धरणावर अवलंबून असल्यामुळे या धरणाच्या पाणी पातळी कडे या तीन जिल्ह्यांतील लोकांचे सतत लक्ष लागुन असते. गेली अनेक वर्षांपासून मांजरा धरण हे सतत परतीच्या पावसाने भरत असल्याचा अनुभव आहे. यावर्षी मुख्य पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी फार समाधान देण्याइतपत वाढली नव्हती. मात्र परतीच्या पावसात ही पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली आणि धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली.
मांजरा धरणात गेल्या आठवड्यात ८० टक्के पाणीसाठा जमा झाल्यानंतर धरणावर नियंत्रण ठेवणा-या लातुर येथील लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या वतीने मांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. आता धरणाची पाणी पातळी ही ८० टक्क्यावरुन ९० टक्क्यांकडे झेपावत आहे. सध्या मोठा पावुस झालेला नसला तरी नदी प्रवाहातुन दर सेकंदाला मांजरा धरणात ७३.६५ घनमीटर पाण्याची आवक होत आहे, ही आवक जरी कायम राहिली तरी धरणाचे दरवाजे उघडावे लागतील अशी परिस्थिती सहज निर्माण होवू शकते. याही परिस्थितीत जर मांजरा धरणक्षेत्रात मोठा पाऊस झाला आणि नदीच्या प्रवाहातुन येणाऱ्या पाण्याची आवक वाढली तर धरणाचे दरवाजे केंव्हाही उघडले जावु शकतात. नदीच्या पात्रातुन पाण्याचा येणारा येवा (आवक) लक्षात घेऊन धरणाचे किती दरवाजे किती उंचीपर्यंत उघडावयाचे याचा निर्णय धरणावर नियंत्रण ठेवणा-या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला घ्यावा लागतो.
मांजरा धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी एवढी असुन १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत धरणात २००.६६४ दलघमी पाणी साठा जमा झाला होता. मांजरा धरणाची पाणी पातळी ही ६४२.३७ मीटर एवढी आहे तर याच वेळी धरणातील पाणी पातळी ही ६४१.८४ मीटर इतकी होती. मांजरा धरणात जीवंत पाणी साठवण क्षमता ही १७६.९६३ दलघमी एवढी आहे तर याच वेळी धरणात १५३.५३४ दलघमी जीवंत पाणी साठा जमा झाला आहे.
मांजरा धरणात सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठी आणि नदी प्रवाहातुन येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता मांजरा धरणाचे दरवाजे उघडावे लागतील अशी परिस्थिती केंव्हाही निर्माण होवू शकते. मात्र ही वेळ धरणक्षेत्रात पडणा-या पावसावर अवलंबून असणार आहे, अणि त्यांचा निर्णय मांजरा धरणाच्या प्रत्येक स्थितीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले लातुर येथील लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय घेणार आहे.