महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांनी विकसीत केले नवे लाल सुगंधी द्राक्ष !


महाराष्ट्र राज्य द्राक्षबागाईतदार संघानं द्राक्षाचे नवीन वाण (New Grape Variety) विकसित केलं आहे.पुण्यातील मांजरीच्या (Pune Manjari) फार्म प्रयोगशाळेत हे नवे द्राक्ष वाण विकसित केले आहे. विकसीत करण्यात आलेले नवीन वाण हे सुगंधी लाल रंगाचे आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या वाणाच्या संशोधनाचं काम सुरु होतं. चालू हंगामात हा द्राक्ष वाणाचा प्लॉट काढणीला आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी (Demand in international markets) लक्षात घेऊन उत्कृष्ट रंग, उत्कृष्ट चव, वजन आणि सुवासिक द्राक्ष प्रजाती विकसित करण्यात द्राक्ष बागाईतदार संघास यश आलं आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागात, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरण परिस्थितीत या वाणाची चाचणी व्हावी, या उद्देशानं मांजरी फार्म येथील प्रयोगशाळेसोबतच बागाईतदार संघाच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी सदर वाणाची काही रोपे देण्यात आली होती. भारत शिंदे (अध्यक्ष.पुणे विभाग), अभिषेक कांचन (उरुळी कांचन) आणि अशोक गायकवाड (नाशिक) यांना चाचणी आणि अभ्यासासाठी नव्या वाणाची काही रोपे देण्यात आली होती. त्या सर्व प्लॉट्सवर या वाणाबाबत समाधानकारक अभिप्राय प्राप्त झाले आहेत. या चाचणी दरम्यान प्राप्त झालेल्या अभिप्राय आणि सूचनांचा अभ्यास करून या वाणात अजून काही सुधारणांची शक्यता तपासली जाणार आहे.
चार वर्षांपासून सुरू होती प्रक्रिया
गेल्या चार वर्षांपासून सदर द्राक्ष प्रजातीची काही रोपे आमच्या प्लॉटवर चाचणीसाठी आणली होती. या प्रजातीच्या झाडांची पूर्ण वाढ झाल्यावर फळधारणा झाली. या प्रजातीची जनुकीय चाचणी केली असता ती ‘क्रीमसन’ प्रजातीशी काही अंशी साधर्म्य साधणारी आहे. द्राक्षांचा आकार, वजन आणि रंग इतर प्रजातींपेक्षा सरस असून फळ अधिक मधुर आणि सुवासिक (अरोमॅटिक) आहे. द्राक्षाचे आवरण मजबूत असून अवकाळी पावसाचा मारा सहजपणे सहन करू शकते. सदर झाडांना वाढीसाठी आवश्यक हार्मोन्सची गरज अत्यंतमर्यादित असून महाराष्ट्राच्या सर्व भागांत या वाणाचे उत्पादन घेता येईल, अशी माहिती उरुळी कांचनचे प्रयोगशील शेतकरी अभिषेक कांचन यांनी दिली.