महाराष्ट्राच्या प्रकाशन विश्वामध्ये भविष्यात आनंदपर्व निश्चितच येईल
डॉ. सौ. वृषालीताई किन्हाळकर यांचे मत
प्रा. संतोष कुलकर्णी/नांदेड
सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये मूल्यांची पडझड होत आहे. सुवर्णमुद्रा पर्वांमधून नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आनंद मोहिनी रामने त्यावर टीकाटिप्पणी न करता छोट्या काडीसमोर मोठी काडी ठेवून बिरबलाच्या वृत्तीचा वापर योग्य पद्धतीने केला आहे. सार्वत्रिक पडझड होत असताना उद्याच्या मराठवाडाने निर्मिलेल्या दिवाळी अंकातून कर्तृत्ववान व्यक्तींची स्वस्तीपद्मे वाचकांच्या समोर ठेवलेली आहेत. त्या माध्यमातून वाचकांना सिंहावलोकन करता येईल. भविष्यात महाराष्ट्राच्या प्रकाशन विश्वामध्ये समृद्ध लिखाणाच्या दिवाळी अंकाच्या निर्मितीचे ‘ आनंदपर्व ‘ निश्चितच येईल असे मत प्रख्यात स्त्रीवादी लेखिका, कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले.
नांदेड येथील दैनिक ‘ उद्याचा मराठवाडा ‘ ने काढलेल्या ‘ सुवर्णमुद्रा पर्व ‘ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ञ डॉ. सुरेश सावंत होते. दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रख्यात मानसोपचार तज्ञ, निवेदक साहित्यिक डॉ नंदकुमार मुलमुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर,फीचर एडिटर आनंद मोहिनी राम, श्रुती शेवडीकर यांची उपस्थिती होती. अंकाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या अजय बासवडेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रकाशन सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्तविकामध्ये संपादक राम शेवडीकर म्हणाले “सुवर्ण मुद्रापर्व- 2024 दिवाळी अंकातून आभाळाच्या उंची एवढ्या दिग्गज व कर्तृत्ववान व्यक्तींचा कार्यशोध घेण्यात आलेला आहे. नव्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे काम दिवाळी अंकाच्या समृद्ध परंपरेतून आम्ही करत आलेलो आहोत. महाराष्ट्राच्या मातीतील पु. ल. देशपांडे, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख,आचार्य प्र. के. अत्रे, कवी ग्रेस, नरहर कुरुंदकर, अभिनेत्री स्मिता पाटील, विदुषी दुर्गाबाई भागवत, व. पू. काळे, अनंत भालेराव, शोभा भागवत, भीष्मराज बाम, एम एफ हुसेन, रत्नाकर मतकरी, शंतनुराव किर्लोस्कर, पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके, डॉ नरेंद्र दाभोळकर, जगविख्यात पक्षी तज्ञ डॉ सलीम अली यांच्यासह ओशो यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय नव्या पिढीला व्हावा या हेतूने सुवर्ण मुद्रा पर्वाची निर्मिती झाली आहे.
डॉ वृषालीताई किन्हाळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या,”या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी स्व. नयन बारहाते, यांची प्रकर्षाने आठवण येते. दिवाळी अंकाला जीव ओतून कलात्मक पद्धतीने सजविण्याची हातोटी त्याच्याकडे होती. लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे बेकारी, गुन्हेगारीकरण यांसारखे अनेक ज्वलंत व गंभीर प्रश्न निर्माण होत असताना गुणवत्तेचा ऱ्हास होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या दिवाळी अंकाचे संपादकीय आनंदने अतिशय दर्जेदार पद्धतीने लिहिले आहे. हे संपादकीय नव्या पिढीने विशेषत्वाने वाचायला हवे. आजच्या घडीला आवश्यक असणारे संतुलित व समृद्ध लिखाण या दिवाळी अंकात समाविष्ट आहे. योग्य वेळी वडिलांनी आपल्या मुलाच्या हाताला योग्य काम दिल्याचे उदाहरण म्हणजे हा दिवाळी अंक आहे. याबद्दल त्यांनी संपादक राम शेवडीकर व फीचर एडिटर आनंद मोहिनी राम यांचे कौतुक केले. नव्या पिढीला दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा माहित नाही. हे साहित्य विश्वापुढे खूप मोठे आव्हान आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपल्याला आता मुलापर्यंत जावे लागणार आहे. त्यामुळे उद्याचा मराठवाडाने आजपर्यंत प्रकाशित केलेल्या समृद्ध दिवाळी अंकाचे प्रदर्शन व त्यामधील लेखांचे अभिवाचन शाळांमधून व्हावे. त्यासाठी आम्ही साहित्यिक मंडळी संवादाच्या, अभिवाचनाच्या व साहित्यिक चर्चेच्या माध्यमातून निश्चितच सहकार्य करू. चांगली पुस्तके काय आनंद देतात हे नव्या पिढीला कळणे आवश्यक आहे.
डॉ नंदकुमार मुलमुले म्हणाले,” जे जे चांगले आहे ते समष्टीला सांगण्याचा प्रयत्न साहित्यिक मंडळी करत असतात. मराठी साहित्य विश्वामध्ये दिवाळी अंकाचे स्थान खूप मोठे आहे. सध्या प्रकाशन विश्वामध्ये पुस्तकांचे व्यवहार कसे चालतात हे न उलगडणारे कोडे आहे. दिवाळी अंक काढणे हा आतबट्ट्याचा व्यवहार असतानाही रामभाऊ शेवडीकर यांनी देखणा व वाचनीय दिवाळी अंक मराठवाड्यात काढण्याचे धाडस सातत्यपूर्वक केले आहे. उत्तमतेचा आग्रह व दर्जेदारपणा हा त्यांचा स्थायीभाव त्यांच्या प्रत्येक दिवाळी अंकातून अधोरेखित झालेला आहे.महाराष्ट्रात अनेक दिवाळी अंक निघतात व खपतात परंतु लोक किती वाचतात? हा खरा प्रश्न आहे. सध्या दिवाळी अंक म्हणजे जाहिरातीच्या मध्येमध्ये येणारे लिखाण म्हणजे साहित्य असा प्रघात पडलेला असतानाही वाचकांच्या कक्षा रूंदावणारे, आशयसंपन्न लिखाण समाविष्ट करून वाचन संस्कृती जोपासण्याचा व वृद्धिंगत प्रयत्न उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकाच्या माध्यमातून सातत्याने करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. दिवाळी अंक वाचकांच्या ‘ प्रतीक्षेत असलेपणाच्या ‘ अर्थात इंतजार वृत्तीची दखल उद्याचा मराठवाडा घेत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
अध्यक्षीय समारोपात सुरेश सावंत म्हणाले,”2024 च्या सुवर्ण मुद्रा पर्वाच्या दिवाळी अंकाचे बीजारोपण 2023 मध्ये आनंदने केले होते असे सांगून कौतुक केले. उत्तम सादरीकरण करण्याची हातोटी या पिता पुत्राकडे असल्याचे एकमेव उदाहरण उद्याचा मराठवाडा असल्याचे त्यांनी सांगितले. बापाने एक मजला बांधला तर मुलाने किमान एखादा मजला तरी यावर वाढविला पाहिजे असे म्हणण्याचा प्रघात आहे. आनंद मोहिनी राम ने याही पुढे जाऊन कळस चढविण्याचे काम केले आहे याबद्दल त्यांनी कौतुक केले. राजकारण, समाजकारण साहित्य, संगीत, पत्रकारिता, बालशिक्षण, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे पुढील पिढीला उलगडायला मिळावीत यासाठी या दिवाळी अंकाच्या माध्यमातून सातत्यपूर्वक प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
काळाच्या कातळावर पाय ठेवून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाचा बोध नवीन पिढीला व्हावा. आजपर्यंत उद्याचा मराठवाडाने काढलेल्या सर्व दिवाळी अंकाचे एकत्रितपणे ग्रंथरूपात संपादन व्हावे अशी इच्छा त्यांनी यावेळी प्रकट केली. या आखीवरेखीव व नेटक्या कार्यक्रमाचे सुरेख व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रा. डॉ विश्वाधर देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्रा दत्ता भगत, डॉ शेषराव मोरे, डॉ. नितीन जोशी, डॉ विलास वैद्य, डॉ. चंद्रकांत पोतदार, भगवान अंजनीकर, डॉ जगदीश कदम, महेश मोरे, डॉ शैलजा वाडीकर, माधव चुकेवाड, मधुकर धर्मापूरीकर, रेणुकादास दीक्षित, सुधीर पुरकर, जगदीश देशमुख, जयंतराव वाकोडकर, प्राचार्य राम जाधव, डॉ शिवा कांबळे, जयंत कोकंडाकर, पत्रकार संजीव कुळकर्णी, विजय जोशी, संतोष कुलकर्णी,नाट्यकर्मी राजू किवळेकर,प्रा.राजीव देशपांडे,उद्योजक बालाजी इबीददार, गोपाळराव व्यवहारे, डॉ. श्रीकांत लव्हेकर यांची उपस्थिती होती.्
सूत्रसंचालन करताना प्रा विश्वाधर देशमुख यांनी भूतकाळाची आठवण ठेऊन, भविष्याची आखणी करताना वर्तमान सुखमय होतो हे सूत्र सांगितले. हेच कदाचित दैनिक आजचा मराठवाड्याचे संपादक रामभाऊ आणि युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारा आनंद यांना एकत्रित जोडून तयार होणाऱ्या शब्दांचे महत्त्व सांगत अक्षरांच्या सागरात आपल्याला प्रवास करायला लावणारे पितापुत्र- म्हणजेच उद्याचा मराठवाड्याचे ‘रामानंद सागर ’ अशी बिरूदावली त्यांनी जोडली. शेवडीकर कुटुंबाच्या उत्कृष्टतेच्या ध्यासाचे कौतुक केले.
उद्याचा मराठवाडा ने सुरू केलेल्या दिवाळी अंकाच्या समृद्ध परंपरेतील सुरुवातीपासूनचे आधारस्तंभ असणाऱ्या डॉ वृषालीताई किन्हाळकर यांनी अनेक दिवाळी अंकाचे सहसंपादक म्हणून दायित्व पार पाडलेल्या मराठवाड्यातील ज्येष्ठ गझलकार प्रफुल्ल कुलकर्णी (सध्या पुणे येथे स्थायिक झालेले ) यांच्याविषयीच्या दिवाळीच्या फराळाच्या हृद आठवणी सांगत नांदेडमध्ये आभाळाच्या उंचीचे व्यक्तिमत्वे असल्याचे गौरवाने सांगितले.
मराठवाड्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्या काळातील मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या, दैनिक मराठवाड्याचे संस्थापक संपादक असणाऱ्या स्व. अनंत भालेराव यांना खूप आग्रह करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर निश्चितच पुढील पिढीला दिशादर्शक व मार्मिक आहे. पत्रकारांचे काम म्हणजे जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडणे व ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आहे. लोकसभेत किंवा विधिमंडळात त्यासाठी पत्रकारांनी प्रतिनिधित्व करण्याची आवश्यकता काय ? जुन्या काळातील पत्रकारांची व संपादकांची सामाजिक प्रश्नांविषयीची नाळ जोडलेली होती. एखाद्या प्रदेशाच्या किंवा भूभागाच्या प्रश्नांविषयी पत्रकारांची निष्ठा होती असा गौरव डॉ. सुरेश सावंत यांनी कै.अनंत भालेराव यांच्या विषयी आपल्या भाषणात केला.