महाराष्ट्र

“खोलेश्वर”च्या प्राचार्या डॉ. प्रिती पोहेकर यांनी दिला राजीनामा

मराठवाड्यातील शिक्षण संस्थांमध्ये अग्रगण्य आणि स्वतःला शिक्षण संस्था नव्हे तर संस्कार केंद्र म्हणवून घेणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ऐतिहासिक परंपरा असलेल्या खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिती पोहेकर यांनी स्थानिक विकास समितीच्या अध्यक्षांच्या मनमानी आणि नियमबाह्य वर्तनाला कंटाळून आपल्या प्राचार्य पदाचा राजीनामा संस्थेचे कार्यवाह यांच्या कडे सुपुर्द केला असून २८ एप्रिल २०२५ रोजी आपल्याला प्राचार्य पदावरुन कार्यमुक्त करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही मराठवाड्यातील एक अग्रणी शिक्षण संस्था आहे. मराठवाड्यातील सात ही जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या संस्थेचे शाळा, महाविद्यालये आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना आपली संस्था ही शिक्षण केंद्र नसून संस्कार केंद्र आहे असा सतत गाजावाजा या संस्थेमार्फत करण्यात येतो. मात्र याच संस्कार केंद्रातील एका नावाजलेल्या महाविद्यालयाच्या स्थानिक विकास समितीच्या अध्यक्षांनी महिला प्राचार्यांवर सतत आक्षेप घेणे, परवानगी घेऊन केलेल्या कामावरही नंतर लेखी आक्षेप घेणे व मनमानी पध्दतीने महाविद्यालयाचा कारभार पाहण्यासाठी दबाब आणणे या कामाच्या पध्दतीला कंटाळून महिला प्राचार्य डॉ. प्रिती पोहेकर यांनी आपला राजीनामा संस्थेचे कार्यवाह यांच्या कडे सुपुर्द केला आहे.


या राजीनामा पत्रात प्राचार्य डॉ. प्रिती पोहेकर यांनी यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत आपण कार्यरत झाल्यापासून ते आजपर्यंत महाविद्यालयाच्या स्थानिक विकास समितीच्या अध्यक्षांनी आपल्या वर केलेल्या अन्यायाचे अनेक पाढे विचारले असून आपणास संस्थेस काम करणे अवघड होत चाललेलं असल्याचे सांगितले आहे.

या सर्व अन्यायामुळे आपण खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्या पदाचा राजीनामा देत असून २८ एप्रिल २०२५ रोजी आपल्याला संस्थेतुन मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

काय म्हणणे आहे प्राचार्य डॉ. प्रिती पोहेकर यांचे ?

मा. कार्यवाह,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई,

महोदय, नमस्कार! मी दि. ११/१०/२०२२ रोजी आपल्या संस्थेमार्फत संचलित स्वा. सावरकर महा विद्यालय, बीड येथे रुजू झाले. तिथे मी अनेक चांगले कार्यक्रम, उपक्रम, प्रकल्प राबविले. कांही उदाहरणेः (१) मी रुजू झाले तेव्हा महाविद्यालयाची शैक्षणिक स्थिती अत्यंत वाईट होती, अगदी समित्यांची रचनादेखील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार नव्हती-तिथपासून कोणत्याही नोंदी नियमित नव्हत्या, त्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्माण करण्यापासून काम सुरू केले आणि फलस्वरूप NAAC, Bengaluru कार्यालयाने केलेल्या मूल्यमापनामध्ये महावि‌द्यालयाला उत्तम गुणांकन लाभले जे संस्थेच्या महावि‌द्यालयांमध्ये सर्वाधिक आहे. (२) मा. संस्था अध्यक्ष, आपण व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालय इमारतीचा तिसरा मजला बांधला गेला, त्यात खूप पाठपुरावा करून वेळेत काम पूर्ण करून घेतले. (३) महाविद्यालयास PM-USHA योजने अंतर्गत निधी प्राप्त व्हावा यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून सतत मेहनत व पाठपुरावा केला, संस्थेच्या इतर महाविद्यालयांचा प्रस्ताव होता, मात्र रु. ४,९९,०८१२/- इतका निधी स्वा. सावरकर महावि‌द्यालयास प्राप्त होऊ शकला. (४) दिनदयाळ शोध संस्थान, बीड यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत मुली व महिलांसाठी उत्तम प्रकारे अभ्यासक्रम चालविले. मुलींसाठी Plumbing चा अभ्यासक्रम राबविला जो राबविणारे स्वा. सावरकर महावि‌द्यालय हे महाराष्ट्रातील (कदाचित देशांतीलाही) एकमेव महावि‌द्यालय होते व आहे. (५) महावि‌द्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेत महाविद्यालयात येणे, थांबणे, वेळेत काम करणे, घंटा वाजणे यात नियामितता आणली.

(६) महावि‌द्यालयामध्ये स्वच्छता आणून सुशोभीकरण केले. (७) महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. (८) वि‌द्यार्थी प्रवेश संख्या २०२२ मध्ये ९५०, २०२३ मध्ये ९०२, २०२४ मध्ये ९९२ इतकी वाढविली जी पूर्वी ६००-७०० च्या दरम्यान असे. (९) विद्यार्थी गळती २०२४ साली ४१ पर्यंत आणली जी पूर्वी ३००-१७१ इतकी असे. (१०) मी कॅनडा इथे परिषदेकरिता गेले, न्यूझीलंड येथे मला निमंत्रित करण्यात आले, पण त्याचे कौतुक न वाटता आपण मी पूर्वपरवानगी घेतली नाही असे म्हणता जेव्हा मी कॅनडा Visafile करताना मा. अध्यक्ष, महावि‌द्यालय समिती यांची पूर्वपरवानगी घेतली होती. संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेल्या परिषदेस मी निमंत्रित होते, न्यूझीलंड येथे जाण्याचा खर्च संयुक्त राष्ट्र करीत असताना आपण मात्र त्याचे महत्व समजून न घेता मला जाण्यास परवानगी देण्यास तयार नव्हतात. (११) इतर कर्मचाऱ्यांनी शोध प्रकल्प घ्यावेत यासाठी मी स्वतः एक प्रकल्प हाती घेतला, आणि तो मंजूर झाल्यानंतर सर्व शिक्षकांना वेगवेगळ्या संस्थांकडे तअसे सादर करण्यास प्रोत्साहित केले. (१२) शिक्षकांना वि‌द्यापीठ अनुदान आयोग व इतर संस्थांकडून वेगवेगळे निधी प्राप्त व्हावे याकरिता प्रोत्साहित करून ते मिळण्यासाठी पाठपुरावा केला. उदा: ICPR ची व्याख्यानमाला. (१३) मराठवाड्यात भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर चर्चासत्र आयोजित करणारे स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड हे पहिले महाविद्यालय होते. (१४) Central Tribal University of Andhra Pradesh यांच्या First Court Committee ची सदस्य म्हणून मा. राष्ट्रपती भवन यांच्याकडून माझे नामनिर्देशन झाले; मात्र मा. अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती यांनी या कारणांसाठी कर्तव्य रजा घेता येत नाही असे म्हणत अडविले. (१५) स्वा. सावरकर महाविद्यालय येथील कार्यकाळात मी प्राचार्य पदाला देय असलेल्या महिन्यांतील २ शनिवार, दिवाळी सुट्टीतील ७ दिवस आणि उन्हाळी सुट्टीतील १० दिवस सुट्ट्या कधीही उपभोगल्या नाहीत.

अशा एक न अनेक कार्य क्रिया मेहनतीने, प्रामाणिकपणे केल्या. महावि‌द्यालयाचा शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक व भौतिक विकास करण्याचा सतत विचार व प्रायत्न करीत राहिले. हे करत असताना प्रत्येक वेळी मा. अध्यक्ष, महावि‌द्यालय विकास समिती व जिथे गरज असेल आणि नियम असेल त्याप्रमाणे आपल्याशीही संपर्क साधलेला होता.

या सर्व कार्यात महाविद्यालयाची प्राचार्य या नात्याने माझा मोठा वाटा होता. असे असूनही NAAC, Bengaluru कार्यालयाच्या भेटीनंतर व PM-USHA योजना मंजूर झाल्यानंतर आपण मला सतत अपमानित करणे, विनाकारण रोष व्यक्त करणे सूरु केले. मी आपल्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करीत राहिले पण आपल्याकडून कधीही सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला नाही. आम्हाला विचारत नाही, सांगत नाही, असे आरोप करीत राहिलात, जेव्हा मी प्रत्येक निर्णय महावि‌द्यालय विकास समिती यांच्या परवानगीनंतरच घेतलेले होते. आपण संस्था देणगीची केलेली मागणीदेखील मी पूर्ण केली; आणि त्यानंतर आपण मला अधिक अपमानित करायला सुरुवात केली. त्यानंतर आपण माझी बदली केली. तेवढ्यावरच न थांबता मी आपल्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून तो विषय थेट आपल्याच अखत्यारीतील असल्यामुळे ते पत्र देण्याची विनंती केली होती आणि ते उपलब्ध करून न देता त्यावर मलाच आरोपी ठरविणारे पत्र दिले यावरून आपण माझा वेतन वाढीचा प्रस्ताव देऊ इच्छित नाही असे दिसते.

ह्या सर्व घटनाक्रमांचा विचार करता लक्षात येते की मी केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाची आपण कधीच दखल घेतली नाही. खरे तर आम्ही ‘नेतृत्व’ हा अभ्यासक्रमातील भाग शिकविताना असे सांगत असतो की चांगल्या नेत्याला आधी Appreciation जमले पाहिजे आणिमागाहून अगदी पर्यायच नसेल तेव्हा Punishment देता आली पाहिजे, मला आपल्या संस्थेत काम करताना आपल्याकडून केवळ अपमान, अवहेलना, तिरस्कार, हेटाळणी, फसवणूक आणि नकोशी असणे एवढेच अनुभव आले. कौतुकाचा एकही शब्द चुकूनही वापरण्याचा मोठेपणा संस्था पदाधीकाऱ्यांच्या ठायी दिसून आला नाही किंवा चांगल्या कार्यास पाठिंबा देण्याचा उमदेपणा माझ्या वात्यास आला नाही. एवढेच कमी म्हणून काय आपण नियुक्त केलेले महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष दैनंदिन कामकाजात प्रचंड हस्तक्षेप करतात-महाविद्यालयातील उपक्रमांमध्ये वक्ता ठरविणे, कार्यक्रमांची वेळ ठरविणे, विद्यार्थी पंगतीच्या पत्रावळी स्वतः जाऊन खरेदी करणे, हजेरी पटावरील स्वाक्षरीची वेळ ठरविणे, कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य दंड आकारून ते वसूल करण्याकरिता दबाव आणणे, तसेच काहीही विचारण्यास कॉल केले असता कमीत कमी ३ वेळा फोन लावल्याखेरीज ते न स्वीकारणे, फोनवरून परवानगी घेऊन रजा घेतलेली असूनही लेखी रजेला मान्यता न देणे, भाषणात गरज नसताना महिला कर्मचाऱ्यांचा नामोल्लेख करून उदाहरणे देणे, प्राचार्य कक्षास पुरुष शौच कुप आहे, ते बदलून दयावे असे म्हटल्यानंतर ‘जवळ घर घ्या, adjust करा, वर जात जा’ असे अप्रतिष्ठित उत्तर देऊन अडवणूक करत असतात. काम करताना प्रशासकीय प्रक्रियेत आदेशाची एकता हे तत्व प्रभावी असते जे कुठेही दिसून येत नाही. अशा स्थितीत प्राचार्याना काम करणे कठीण होऊन बसते. एका दिव्यांग महिलेस कमजोर समजून हे वर्तन जाणूनबुजून केले जात आहे, असे दिसते.

संस्थेमध्ये होणाऱ्या सततच्या त्रासाने माझी मानसिक स्थिती खालावलेली आहे, आणि काम करणे कठीण होऊन बसले आहे. आपण एका खाजगी कार्यक्रमात मी आपला नामोल्लेख केला नाही असे म्हणत मला सातत्य दिले जाणार नाही असा निरोप मा. अध्यक्ष, महाविद्यालय समिती यांच्याकरवी पाठविला होता तेव्हा आपल्या घरी आपली भेट घेऊन हे आश्वासित केलेले होते की मी सतत चुकाच करत रहाते असे आपल्याला वाटत असल्यामुळे आणि आपल्या टिपणीनुसार काहीच काम करीत नाही असे असल्यामुळे या वर्षअखेरीस आपल्या संस्थेतून निघून जाईन, आता शैक्षणिक वर्ष संपण्यास फार थोडा काळ राहिलेला आहे; तेव्हा आपल्या संस्थेतील माझे जे काहीच दिवस शिल्लक आहेत त्यात मला आपला चांगला अनुभव घेण्याची संधी द्यावी, ही विनंती.

प्रा. प्रीती पोहेकर,

प्राचार्य, खोलेश्वर महावि‌द्यालय,अंबाजोगाई.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker