राष्ट्रीय

मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेस अध्यक्षपदाचे धनुष्य पेलवेल का?

कॉंग्रेस पक्षाला नवं संजिवनी देण्यासाठी एकीकडे राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा त्याग करीत कन्याकुमारी ते काश्मीर अशी सलग ३,७५१ किमी अंतराची ऐतिहासिक भारत जोडो पदयात्रा सुरु केली आहे तर दुसरीकडे वयोवृध्द असलेले ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात गांधी घराणे यशस्वी झाले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतांनाच त्याच जोमाने काम करणारा नव्या फॉर्म मधला तरुण अध्यक्ष कॉंग्रेस पक्षाला मिळाला असता तर पक्षाला अधिक बळकटी मिळाली असती. वृध्दत्वाकडे झुकलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे पण या जबाबदारीचे धनुष्य त्यांना पेलवेल का हा खरा प्रश्न आहे.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अकस्मितपणे राजकारणात आलेल्या उच्च शिक्षीत राजीव गांधी यांनी राजकारणात उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. राजकारणापासुन शेकडो कोस दुर असणा-या अनेक उच्चशिक्षित तरुणांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून त्यांना राजकीय प्रवाहात समाविष्ट करुन घेतले. राजकारण आणि संगणक शास्त्राचा आधार घेत त्यांनी सामाजिक, राजकीय आणि संगणकीय क्षेत्रात त्यांनी अमुलाग्र परीवर्तन घडवत देशाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. या सर्व संदर्भाचा आधार घेत मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवडीकडे पाहीले तर त्यांची निवड योग्य की आयोग्य याचा निष्कर्ष लावणे सोपे जाईल.

१९४२ चा जन्म; ८० वर्षाचे वय!


२१ जूलै १९४२ रोजी जन्मलेल्या आणि बी.ए. एल एलबी ही पदवी संपादन केलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही गांधी परिवाराच्या बाहेरील आहे, हीच या पक्षाच्या दृष्टीने मोठी घटना आहे. खरगे यांच्या विजयामुळे १३७ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या कॉंग्रेस पक्षाला पू्र्णवेळ अध्यक्ष मिळाला. देशात नरेंद्र मोदी यांची लाट निर्माण झाल्यापासून गेली आठ वर्षापासुन काँग्रेसची सतत घसरण चालू असताना पक्षाला एक कायमस्वरूपी अध्यक्ष मिळाला हे ही चांगले झाले. यापुर्वी पक्षाध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेंव्हापासून सोनिया गांधी या प्रभारी पक्षाध्यक्ष म्हणून कॉंग्रेसची जबाबदारी सांभाळत होत्या. आता हेच राहुल गांधी हे पक्षाला बळकटी देण्यासाठी गेल्या साठ दिवसांपासून भारत जोडो पदयात्रेत गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत पक्षाचा जनाधार वेगाने वाढत चालला असताना पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा मुकुट परिधान करणे हे खरगे यांना मोठे आवाहन आहे.
ऐंशी वर्षांच्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या साठ वर्षांच्या सार्वजनिक, सामाजिक आणि राजकीय जीवनातील सर्वात मोठा कसोटीचा काळ आता सुरू झाला आहे. वास्तविक पाहता कॉंग्रेस पक्षात के. कामराज यांच्यापासून सीताराम केसरी यांच्यापर्यंत नेहरू-गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्षांना पदावरून अपमानीत होवून कसे पायउतार व्हावे लागले, हा सर्व विचित्र अनुभव आहे. मल्लिकार्जुन खरगे हे गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू आणि आज्ञाधारक कार्यकर्ते आहेत, शिवाय ते मागासवर्गीय ही आहेत. अध्यक्ष पदाचा उमेदवार निवडताना सोनिया गांधी यांनी हा विचार निश्चितच केला असणार आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (वाड्रा) यांच्या रिमोटवरच त्यांना पक्षाचे काम पहावे लागणार आहे.

१३७ वर्षात फक्त ६ निवडणुका!


काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाल्यानंतर गेल्या १३७ वर्षांत पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी केवळ सहा वेळाच निवडणुका झाल्या. इतर वेळी सर्व संमतीने अध्यक्षांची निवड झाली. ज्या सहा वेळा निवडणुका झाल्या, त्यात पाच वेळा निवडणूक जिंकणारे नेहरू-गांधी परिवाराच्या बाहेरील नेते होते. १९३९ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पट्टाभी सीतारामय्या यांना पराभूत केले. १९५० मध्ये पुरुषोत्तमदास टंडन यांनी आचार्य कृपलानी यांना निवडणुकीत हरवले. १९७७ मध्ये के. ब्रह्मानंद रेड्डी यांनी सिद्धार्थ शंकर रे आणि करण सिंह यांचा पराभव केला. १९९७ मध्ये सीताराम केसरी यांनी शरद पवार व राजेश पायलट यांना हरवले. सन २००० मध्ये सोनिया गांधी यांनी जितेंद्र प्रसाद यांचा पराभव केला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसचे १७ अध्यक्ष झाले, त्यात गांधी परिवारातील ५ जण होते. बाकी बारा अध्यक्ष हे गांधी परिवाराबाहेरील होते. गेल्या पंचाहत्तर वर्षांपैकी ४२ वर्षे काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची सूत्रे गांधी परिवाराच्या हाती राहिली. तेहतीस वर्षे गांधी परिवाराच्या बाहेरील नेत्यांकडे अध्यक्षपदाची खुर्ची राहिली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पट्टाभी सीतारामय्या १९४८-४९, पुरुषोत्तमदास टंडन १९५०, जवाहरलाल नेहरू १९५१-५४, यूएन ढेबर १९५५-५९, नीलम संजीव रेड्डी १९६०-६३, के. कामराज १९६४-६७, एस. निजलिंगप्पा १९६८-६९, बाबू जगजीवनराम १९७०-७१, डॉ. शंकर दयाळ शर्मा १९७२-७४, देवकांत बारूआ १९७५-७७, इंदिरा गांधी १९५९, १९७८-८४, राजीव गांधी १९८५-९१, पी. व्ही. नरसिंह राव १९९२-९५, सीताराम केसरी १९९६-९८, सोनिया गांधी १९९८-२०१७, राहुल गांधी २०१७-१९. नंतर मल्लिकार्जुन खरगे यांची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काम पाहिले. गेली २२ वर्षे सोनिया गांधी याच अध्यक्ष म्हणून काम पहात होत्या.

सोनिया गांधी यांच्या निवडीचा रंजक इतिहास!


१९९८ मध्ये सोनिया गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या ख-या. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड होण्याचा त्यांचा किस्सा मोठा रंजक आहे. सोनिया गांधींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून आल्या नव्हत्या. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या स्टार प्रचारक अशी त्यांची भुमिका होती. मात्र त्यावेळी पक्षांचे अनेक नेते सीताराम केसरी यांनी सोनिया गांधींसाठी अध्यक्षपदाची खुर्ची खाली करावी म्हणून दबाव आणत होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यामुळे ऐंशी वर्षे वयाच्या केसरी यांनी अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे या मोहिमेला जोर चढला. पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेतून आपण अध्यक्ष म्हणून निवडून आलो आहोत, त्यामुळे आपल्याला आपली मुदत संपेपर्यंत कोणी अध्यक्षपदावरून हटवू शकत नाही, असा तर्क सीताराम केसरी मांडत होते. केवळ अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) त्यांच्या भविष्याविषयी निर्णय घेऊ शकते याची त्यांना कल्पना होती. एआयसीसी त्यांना अध्यक्षपदावरून हटविणार नाही, अशा ते समजुतीत ते शेवटपर्यंत होते.
दरम्यान सिताराम केसरी यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक बोलावली गेली. कार्यकारिणीचे काही वरिष्ठ सदस्य अगोदरच स्वतंत्रपणे एकत्र बसले व त्यांनी तयार केलेले दोन प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आले. पहिल्या प्रस्तावात सीताराम केसरी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असे म्हटले होते व दुसऱ्या प्रस्तावात सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावे, अशी आग्रही विनंती केली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सिताराम केसरी पोहोचले तेव्हा केसरी यांनी पक्षाध्यक्ष म्हणून केलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार व्यक्त करणारा प्रस्ताव प्रणव मुखर्जी वाचू लागले. आपल्या विरोधात फार मोठे कारस्थान रचले गेले आहे हे केसरी यांच्या लक्षात आले. पण त्या क्षणाला ते काहीच करू शकले नाहीत. मात्र त्यांनी स्वत:च्या अधिकारात कार्यकारिणीची बैठक त्वरित स्थगित केली व त्या खोलीतून ते बाहेर पडले.
सीताराम केसरी हे बाथरूमध्ये गेले असताना त्यांना तेथेच कार्यकर्त्यांनी कोंडून ठेवले, असे वृत्त त्यावेळी दिल्लीच्या काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले होते. एवढेच नव्हे तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्कीही केली. दरम्यान पक्षाच्या उपाध्यक्षांनी कार्यकारिणीची बैठक पुन्हा बोलावली व दुसरीकडे सोनिया गांधी यांना दहा जनपथवरून काही ज्येष्ठ नेत्यांनी २४ अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयात बोलावून आणले. सोनिया गांधींच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या गेल्या, फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटली गेली, सोनिया गांधी यांना नव्या अध्यक्षा म्हणून शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. जेव्हा सिताराम केसरी हे बंद खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांचे त्यांच्या कार्यालयावरील नावही काढून टाकले होते, त्या जागेवर “सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष” अशी नवी पाटी ही झळकत होती. १९९८ पासून २०१७ पर्यंत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. नंतर लगेचच राहुल गांधी अध्यक्ष झाले.२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा दारुण परभव झाल्यानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सोनियांकडे हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे सोपविण्यात आली. आणि आता तब्बल २४ वर्षांनी गांधी परिवाराच्या बाहेरील नेत्याची काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे.

खरगे यांना अध्यक्षपदाचे धनुष्य पेलवेल?


१३७ वर्षांच्या कॉंग्रेस पक्षाच्या इतिहासात ऐंशी वर्षांच्या मल्लिकार्जुन खरगे यांची निवड ही निश्चितच दखलपात्र ठरणार आहे, मात्र मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसला नवी संजीवनी देऊ शकतील का? मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कारभाराला गती मिळू शकेल का? खरगे यांना मनासारखे काम करण्यास स्वातंत्र्य मिळेल का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ऐंशी वर्षे वयाच्या मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसचे धनुष्य पेलवेल का? हा खरा प्रश्न आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker