मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा अशोक गुंजाळ यांचा दावा


मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावेत या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली येथे मोहन जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी नंतर या उपोषणाला महाराष्ट्र कुणबी मराठा समाज संघटनेचे सचीव अशोक गुंजाळ यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला असून मराठा हे कुणबी असल्याचे सर्व पुरावे आपल्या जवळ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तीस वर्षापुर्वी महाराष्ट्रात मराठा कुणबी समाजाची चळवळ सुरु करुन मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी मराठा कुणबी समाजाचे सचीव अशोक गुंजाळ यांनी तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्या काळात मराठा कुणबी समाजाचे अनेक मेळावे संपुर्ण महाराष्ट्रात घेण्यात आले होते. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने १ जून २००४ रोजी स्वतंत्र शासन निर्णय क्रमांक सीबीसी१४/२०२१/प्र.क्र.२३२/मावक-५ अन्वये मराठा कुणबी व कुणबी मराठा समाजाचा इतर मागासवर्गीय समाजाच्या सवलतीत समावेश करण्यात आल्याचा दावा ही अशोक गुंजाळ यांनी केला आहे.


मराठा आरक्षणा संदर्भात जालना जिल्ह्यातील आंतरवाली येथे मोहन जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपुर्वी उपोषण कर्तव्यावर झालेल्या लाठीमारानंतर हा संपुर्ण विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर आंतरवाली हे गाव संपुर्ण देशाच्या नकाशावर आले असून गेली दोन दिवसांपासून या गावाकडे महाराष्ट्रातील सर्वच पुढा-यांनी आपला मोर्चा वळवला आहे.
या संदर्भातच मराठा समाजाचा समावेश कुणबी समाजात करुन त्यांना इतर मागासवर्गीय समाजाच्या सवलती देण्याबाबतची मागणी पुढे आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील महसुली विभागीय आयुक्त कार्यालयात या संदर्भात मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याच्या महसुली नोंदी व इतर पुराव्यांची शोधाशोध सुरु केली आहे. महसुल आयुक्तांनी या संदर्भातील माहिती मागवली असल्याची चर्चा आहे. काल ३ सप्टेंबर रोजी रविवार असुनही महसुल आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या आठ ही जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपली कार्यालये उघडुन या नोंदी उपलब्ध आहेत का याचा शोध घेत होते.


या संदर्भात मराठा कुणबी समाजाचे सचीव अशोक गुंजाळ यांनी “माध्यम” न्यूज नेटवर्क शी स्वतः संपर्क साधत मराठा हे कुणबी असल्याचे सर्व पुरावे आपल्या कडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
▪️५ सप्टेंबर ला जरांगे सोबत चर्चा
हे सर्व पुरावे घेऊन अशोक गुंजाळ हे ५ सप्टेंबर रोजी आंतरवाली येथे जाऊन उपोषण कर्ते मोहन जरांगे यांच्या सोबत चर्चा करणार आहेत.
या संदर्भात मराठा कुणबी समाजाचे सचीव अशोक गुंजाळ यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट टाकली असून यामध्ये त्यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला असून अशोक गुंजाळ यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, मोहन जरांगे आपल्या मागणीला महाराष्ट्र कुणबी मराठा समाज संघटनेचा पाठिंबा.
सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण करित असलेल्या जरांगे यांना महाराष्ट्र कुणबी मराठा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा संघटना सचिव अशोक गुंजाळ यांनी जाहिर केला आहे. आमची संघटना गेली पंचवीस वर्षे या मागणीसाठी शासनाच्या पातळीवर प्रयत्न करीत आहे.त्यात बरेच यश संघटनेला प्राप्त झाले आहे.


दि. १ जून २००४ च्या महाराष्ट्र शासनाच्या जीआर क्र.सीबीसी १४/२००१/प्र.क्र.२३२/मावक-५
महाराष्ट्रातील ईतर मागासवर्गीय यादीत अनु.क्र.८३ नुसार मराठा कुणबी व कुणबी मराठा समाजाचा ईतर मागासवर्गीय समाजाच्या सवलतीत समावेश करण्यात आला आहे. आरक्षण द्यावे असा उल्लेख करण्यात आला आहे. वरील जीआर प्रमाणे मराठवाड्यातल्या समाजाला कुणबी मराठा, मराठा कुणबी ही मागणी लागू झाली आहे.
परंतू ज्या आधारे ही मागणी पदरात पडणार आहे तोच मूळ पुरावा कुणब्यांकडे नाही. म्हणून मराठवाड्यात कुणबी मराठा समाज राहतो असे परिपत्रक शासनाने काढावे , अशी आमची मागणी शासन दरबारी पडून आहे. जरांगे यांनी हीच मागणी शासनाकडे उचलून धरली आहे.
जरांगे यांनी मागणी केलेल्या वरील दोनही मागण्यांस महाराष्ट्र कुणबी समाज संघटनेचा जाहिर पाठिंबा आम्ही व्यक्त करित आहोत.
या मागणीसाठी सर्व कुणबी एकजूटीने आपल्या पाठीशी आहेत असे ही अशोक गुंजाळ यांनी म्हटले आहे.