महाराष्ट्र

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त “योगेश्वरी”त २ दिवस भरगच्च कार्यक्रम!


मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने १६ आणि १७ सप्टेंबर रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची सन्मान यात्रा, हुतात्मा स्मारकाला अभिवादन, स्वातंत्र्य सैनिकांचा आणि त्यांच्या वारसांचा सन्मान यासह विविध कार्यक्रमांना शहरातील नागरिकांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला.

१६ व १७ सप्टेंबर रोजी भरगच्च कार्यक्रम


मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने १६ आणि १७ सप्टेंबर रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. आज १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून या सर्व कार्यक्रमांची सुरुवात झाली. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या विविध विभागांत कार्यरत असलेले शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व संचालक मंडळ गेली अनेक दिवसांपासून परिश्रम घेत आहेत.

सन्मान यात्रेत स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा मोठा सहभाग


१६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या प्रांगणातील महात्मा जोतिबा फुले वसतिगृहातील जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान यात्रेस प्रारंभ झाला. या सन्मान यात्रेत बीड जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि त्यांच्या वारसांनी सहभागी व्हावे म्हणून संस्थेच्या वतीने नियोजन पुर्वक प्रयत्न करण्यात आले होते.

विविध विभागांच्या कलापथकांचा सहभाग

या सन्मान यात्रेत सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची आणि त्यांच्या वारसांची फुलांनी सजवलेल्या चार चाकी वाहनातून भव्य सन्मान यात्रा काढण्यात आली. या सन्मान यात्रेत योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या विविध विभागांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कला पथके, लेझीम पथके, मराठवाडा मुक्ती संग्रामातील विविध प्रसंगावर आधारित नाटिका सादर करणारी पथके, शाळांचे वाद्दवृंद, एनसीपी, राष्ट्रसेवादल विभागाचे विद्दार्थी शिक्षक, प्राध्यापकांच्या नियोजन बद्ध कार्यक्रम सादरीकरणाने या शोभायात्रेची उंची वाढवली.

महात्मा जोतिबा फुले, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांना पुष्पांजली!


स्वामी रामानंद तीर्थ कला व व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणालगत असलेल्या महात्मा जोतिबा फुले वसतिगृहातुन निघालेली ही सन्मान यात्रा योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या विविध प्रभागांची पहाणी करीत योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कार्यालय परिसरातील स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांच्या अर्धाकृती पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण करून याच परिसरात निर्माण करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या १३० स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीनिमित्त बांधण्यात आलेल्या या हुतात्मा स्मारकाला २१ तोफांची सलामी देवून या हुतात्मा स्मारकाला मानवंदना देवून या सन्मान यात्रेचा समारोप करण्यात आला.

स्वातंत्र्य सैनिकांचा व वारसांचा केला गौरव


या सन्मान यात्रेनंतर योगेश्वरी महाविद्यालयाचे प्रांगणातील “त्र्यंबक पार्वती” सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या सन्मान यात्रेत सहभागी झालेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारसांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास नुतन विद्दालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया (सेलु), पर्यावरण व विज्ञान लेखक एल के कुलकर्णी (नांदेड), गरुड महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशमुख (शेंदुर्णी), लेखक व इतिहास संशोधक भाऊसाहेब उमाटे (लातुर), ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. न.गो. राजुरकर (हैद्राबाद), ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भगवानराव देशपांडे (औरंगाबाद) यांच्यासह लक्ष्मणराव मारोतीराव बोंदर, सौ. पार्वतीबाई लक्ष्मण बोंदर, महानंदाताई गंगाधर अप्पा बुरांडे, प्रतिभाताई वामनराव ठाकुर प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी वरील मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

योगेश्वरीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती


यावेळी व्यासपीठावर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले, सचीव गणपत व्यास, उपाध्यक्ष ऍड. शिवाजीराव कराड, प्रा. माणिक लोमटे संचालक ऍड. व्ही. के. चौसाळकर, डॉ. शैलेश वैद्द व इतर मान्यवर उपस्थित होते.

१७ सप्टेंबर ला होणार स्मृती स्थळाचे उद्घाटन

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने सुमारे १ कोटी रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेल्या ” पू. स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळ” याचे उद्घाटन आज १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मणराव मारोतीराव बोंदर, सौ. पार्वतीबाई बोंदर, महानंदाताई गंगाधर अप्पा बुरांडे, प्रतिभाताई वामनराव ठाकुर यांच्या हस्ते आणि माजी खासदार तथा ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

मुक्ती संग्रामावरील तीन पुस्तकांचे होणार प्रकाशन


या उद्घाटनानंतर “त्र्यंबक पार्वती सभागृहात” आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे लिखीत “हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्याचे अंतरंग” , डॉ. प्रभाकर देव लिखीत “हैद्राबाद मुक्ती संग्राम – संघर्ष शेवटच्या राज्यसत्ते विरुद्धचा” आणि डॉ. प्रशांत देशमुख लिखीत ” हैद्राबाद मुक्ती संग्रामातील मराठी वृत्तपत्रांची भूमिका” या तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रभाकर देव आणि डॉ. प्रशांत देशमुख व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.

शहरातील मान्यवरांचा सहभाग

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने १६ व १७ सप्टेंबर रोजी संस्था परिसरात आयोजित केलेल्या भरगच्च कार्यक्रमास शहरातील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण केली. तसेच सुमारे १ कोटी रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेल्या पू. स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्ती स्मृती स्थळाची पाहणी केली.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker