प्रादेशिक बातम्या

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षात लोकांच्या संवादातून मांजरा नदी पूर्ववत प्रदूषण मुक्त होईल – जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

हृदयाला रक्त पूरविणाऱ्या धमन्या थांबल्या तर जसे बायपास करतो तसे आता नद्यांचे बायपास करणे काळाची गरज – पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे

 

लातूर प्रतिनिधी:- मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षात लोकांच्या संवादातून मांजरा नदी पूर्ववत प्रदूषण मुक्त होईल असे प्रतिपादन जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी थेट बद्रीनाथ येथील गंगा नदीच्या तटावरून दूरदृश्य प्रणालीद्वारे  ( ऑनलाईन ) केले. तर हृदयाला रक्त पूरविणाऱ्या धमन्या थांबल्या, तर जसे बायपास करतो तसे, आता नद्यांचे बायपास करणे काळाची गरज असल्याची भावना पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील 72 नद्याच्या उगमापासून ते शेवट पर्यंत “चला जाणूया नदीला” हा उपक्रम 15 ऑक्टोबर पासून राबविला जात असून त्यात मांजरा नदीचा समावेश आहे. त्याची सुरुवात आज पाटोदा तालुक्यातील गोकडी पासून झाली. तिथून आणलेल्या जल कलशाचे पूजन आणि हस्तांतर समारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांच्या शुभ हस्ते झाला.त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, मांजरा जलसंवाद यात्रेचे मुख्य समन्व्यक अनिकेत लोहिया, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ.विजयभाऊ राठी, वरिष्ठ भू वैज्ञानिक एस बी गायकवाड, डॉ. श्रीकांत गायकवाड, प्राचार्य, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर,  डॉ.संजय गवई, समन्वयक मांजरा नदी जलसंवाद यात्रा लातूर, सहसमन्वयक कॅप्टन डॉ.बी एम गोडबोले सदस्य बालासाहेब सूर्यवंशी आणि डॉ.गुणवंत बिरादार मंचावर उपस्थित होते.

लातूर जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने मांजरा नदी जलसंवाद यात्रेसाठी अत्यंत सकारात्मकता दाखवत सहभाग घेतला याचे कौतुक करून ज्यांच्या नेत्रात, हृदयात खळाळता नद्याचा निर्मळ प्रवाह आहे अशी लोकं एकत्र येऊन नद्या निर्मळ करण्यासाठी एकत्र येत आहेत.यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून मांजरा नदी जलसंवाद यात्रेला जल तज्ञ आणि “चला जाणू या नदीला” या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेंद्र सिंह यांनी शुभेच्छा दिल्या.

“चला जाणू या नदीला ” या मोहिमेंतर्गत मांजरा नदी जलसंवाद यात्रा ही एक अनोखी यात्रा असून नदीचे प्रदूषण हा एक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्न असून त्या प्रश्नाने आता गंभीर स्वरूप धारण केले असल्याचे सांगून जलयुक्त लातूर या चळवळीच्या माध्यमातून मांजरा नदीचे काम केल्याबद्दलची भावना वक्त करतांना डॉ. अशोक कुकडे म्हणाले, ज्या वेळी हृदयला रक्त पुरविणाऱ्या धमन्या थांबतात त्यावेळी आपण बायपास करून हृदयापर्यंत रक्त पुरवठा करतो तशीच परिस्थिती आता नद्याची झाली असून आता नद्याचे बायपास करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नद्या प्रदूषण मुक्त आणि जलयुक्त करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांचा सहभाग घेऊन आणि यात सातत्य राखून काम करणे गरजेचे असून ते काम मांजरा नदी जलसंवाद यात्रा करेल अशी अपेक्षाही डॉ. अशोक कुकडे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांनी यावेळी “पाण्यासारखा पैसा खर्च करणे”  ही म्हण बदलून आता “पैशा सारखे पुरवून पाणी वापरा”  हे आता समाजात ठसविण्याची गरज विशद केली.

लातूर पासून 175 किलोमीटर एवढ्या अंतरावर गोकडी ता. पाटोदा जि. बीड येथे मांजरा नदीचा उगम होतो. त्या उगमाच्या ठिकाणच्या पाण्याचे जलपूजन करून तिथला जल कलश या मांजरा नदी जलसंवाद यात्रेत सहभागी असेल असे सांगून 724 किलोमीटर पर्यंत वाहणारी मांजरा नदीला पूर्ववत शुद्ध नदी करण्यासाठी ही यात्रा असून यासाठी विविध व्यक्ति आणि संस्था यांनी एकत्र करण्याचं काम ही यात्रा करेल असे प्रतिपादन मांजरा नदी जलसंवाद यात्रा करेल असे प्रतिपादन  या यात्रेचे समन्वयक अनिकेत लोहिया यांनी केले.

अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे या कार्यात प्रशासन सक्रियपणे कामं करेल असे सांगून या अभियानाचे महत्व विशद केले. यावेळी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या यात्रे संदर्भातील प्रास्ताविक सहसमन्वयक कॅप्टन डॉ.बी एम गोडबोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार बालासाहेब सूर्यवंशी यांनी मानले.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker