भिमाशंकर सहाव्या ज्योतिर्लिंग संदर्भात केलेल्या दाव्यात काय तथ्य आहे?


त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि औंढा नागनाथ हे महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग आपल्याला माहिती आहेत. १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. तसा उल्लेख भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयानं काढलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये आहे. पण, यापैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhishankar Jyotirlinga) आसाममध्ये असल्याचा दावा आसाम सरकारने केला आहे.


या संदर्भात त्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केलीय. त्यावरून सध्या महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय. पण, खरंच आसाममध्ये असं भीमाशंकर देवस्थान आहे का? त्याचा इतिहास काय आहे? आसाम सरकार ज्योतिर्लिंग असल्याचा दावा का करतय?
आसाम सरकारची जाहिरात काय सांगते?


महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं सरकार असलेल्या आसामच्या पर्यटन विभागाकडून १४ फेब्रुवारीला एक जाहिरात प्रसिद्ध केली. यात भारतातले सहावे ज्योतिर्लिंग स्थळ कामरुपच्या डाकिनी पर्वतावर आपलं स्वागत आहे, असं सुरुवातीलाच लिहिलं आहे. यात ज्योतिर्लिंगांची यादी दिली आहे. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात असलेलं ज्योतिर्लिंग भीमाशंकर आहे. पण, या जाहिरातीत भीमशंकर असा उल्लेख आहे. भीमशंकराच्या पुढे डाकिनी असं लिहिलंय. इतकंच नाहीतर शिवपुराणातला काही पार्टही या जाहिरातीत दिलाय…


जाहिरातीच्या खालच्या भागाला भीमशंकर ज्योतिर्लिंग स्थान पामही गुवाहाटी लिहून नकाशाही दिलाय. हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग असल्याचा दावा त्यांनी केला. पण, १२ ज्योतिर्लिंगांमध्ये सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातल्या खेड तालुक्यातलं भीमाशंकर आहे. भारत सरकारच्या कागदपत्रांवर तसा उल्लेखही आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचं ज्योतिर्लिंग पळवल्याचा आरोप विरोधकांनी केला.
आसाम मध्ये खर्च भिमाशंकर मंदिर आहे काय?


पण आसाममध्ये खरंच भीमशंकर आहे का? तर होय…आसाममध्ये गुवाहाटीच्या जवळ डाकिनी इथं भीमशंकर मंदीर आहे. तिथं लाखो भाविक दर्शनासाठी जातात. पण, आसाम सरकार दावा करतंय त्याप्रमाणे हे सहावं ज्योतिर्लिंग आहे का? तर नाही… हे ज्योतिर्लिंग आहे की नाही याबद्दल कुठलाही ऑफिशियल रेकॉर्ड नाही…त्याची अद्यापही पुष्टी झालेली नाही. पण, यावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे.
आसाम सरकारचा पुरातत्व विभाग काय म्हणतो?
आसाममधलं हे भीमशंकर मंदिर, त्याबद्दलच्या वादाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी इंडिया टुडेने आसाम सरकारच्या पुरातत्व विभागाच्या डायरेक्टर डॉ. दीपी रेखा कौली यांच्यासोबत संपर्क साधला. त्या सांगतात, ”आम्ही या साईटला आधीच भेट दिली. तिथं भग्नावस्थेत मंदीर आहे. शिवपुराणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आसामच्या डाकिनी टेकडीवर असल्याचा उल्लेख शिवपुराणात आहे. शिवपुराणातला डाकिनी टेकड्या, कामरूप राजाविषयीचा उल्लेख, तिथं सापडलेलं भग्नावस्थेतलं मंदीर…या दोन गोष्टींमुळे इथं भीमाशंकर ज्योतिर्लिंग अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. पण, डाकिनी इथं ज्योतिर्लिंग आहे की नाही त्याबद्दलचे कुठलेही पुरावे, शिलालेख किंवा लेखन सापडलेले नाही.”


आसाममध्ये ज्योतिर्लिंग असल्याचा कुठलाही पुरावा अद्याप सापडला नाही, असं आसामच्या पुरातत्व विभागानं सांगितलं. त्यामुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी कशाच्या आधारावर सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला? हा प्रश्न आहे.