राष्ट्रीय

भिती मोडुन प्रश्न विचारण्याचे धैर्य राहुल गांधी यांची भारतजोडो पदयात्रा देते; योगेंद्र यादव

भाजपाच्या विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी धोरणाविरूध्द प्रखर लढा देण्यासाठी भारताची अखंडता टिकवण्यासाठी राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ३,७५१ किमी अंतराची कन्याकुमारी ते काश्मीर ही पदयात्रा सुरू केली आहे.. ७ नोव्हेंबर रोजी ही पदयात्रा महाराष्ट्रात येणार आहे. या पदयात्रेला दक्षीण भारतात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आपण पहातो आहोत.
या पदयात्रेत निमित्ताने सामान्य माणसाच्या मनात काही प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी दिली आहेत. सामान्य माणसाच्या मनातील प्रश्नांना योगेंद्र यादव यांनी काय उत्तरे दिली ती आपण पाहु या!

▪️काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत
नागरी संघटना कशासाठी?
आणीबाणीमध्ये लोकशाही धोक्यात आली होती, आता पूर्ण देश. त्याविरोधात लढण्यासाठी राजकीय पक्ष आणि नागरी संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण, विरोधी पक्षांमध्ये तसेच संघटनांमध्येही अंतर्गत समन्वयाचा अभाव आहे. पक्ष व संघटना यांच्यात एकमेकांमध्येही संवाद नाही. त्यांना जोडणारा पूल निर्माण झाला तर संघ-भाजपविरोधात ताकदीने लढता येईल. त्यामुळे संघ-भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेस माध्यम बनू शकतो का आणि काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का, हा संघटनांसमोरचा खरा प्रश्न होता. निवडणुकीच्या राजकारणापुरते न पाहता विषमता, बेरोजगारी, महागाई अशा अनेक व्यापक मुद्द्याचे राजकारण करता येईल का? हा ही सर्वात मोठा प्रश्न होता.

▪️भाजपा विरोधात लढण्यासाठी
काँग्रेस गंभीर आहे का?
रस्त्यावर उतरून संघ-भाजपशी वैचारिक लढाई लढेल का? या शंका घेऊन नागरी संघटनांनी राहुल गांधींशी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर या यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
यात्रेला जनपाठिंबा मिळू लागला, हे कसे ठरवायचे?
यात्रेसाठी काँग्रेसने गर्दी जमवली असे म्हणणे म्हणजे काँग्रेसकडे अजूनही गर्दी जमवण्याची क्षमता आहे हे सिद्ध होते. भाजपच्या समाजमाध्यम विभागाने या यात्रेला बदनाम करण्याचे केलेले पाचही प्रयत्न लोकांना न आवडल्याने फसले आहेत. लोक पदयात्रेचा सन्मान करतात, आणि यामुळेच या पद यात्रेला सहानुभूती मिळत आहे. प्रसारमाध्यमांतून यात्रेच्या बातम्या फारशा दिल्या जात नाहीत, तरीही एक पदयात्रा निघाली आहे, एवढे तरी लोकांना कळले आहे.

▪️’पप्पू’ ही राहुल गांधींची निर्मित
प्रतिमा. पण, लोक त्यांच्याकडे
कसे बघतात?
भाजपने राहुल गांधींची निर्माण केलेली ‘पप्पू’ ही प्रतिमा या यात्रेमुळे लगेच नष्ट होणार नाही. भाजपने प्रचंड पैसे खर्च करून, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून राहुल यांची वाईट प्रतिमा उभी केली. भाजपाच्या या खोटेपणाला तडा गेला आहे, असे म्हणता येईल. लोकांना वाटते त्यापेक्षा राहुल गांधी तल्लख, बुद्धिमान आहेत. गंभीर, सरळमार्गी आहेत. त्यांच्या मनात लोकांबद्दल प्रेम आहे. या यात्रेमध्ये ते लोकांना सहजपणे भेटतात, त्यातून खरे राहुल गांधी आता लोकांना दिसू लागले आहेत. पंतप्रधान मोदी फिरोजपूरच्या पुलावर खोळंबले होते, हाकेच्या अंतरावर भाजपचे कार्यकर्ते उभे असतानादेखील स्वत:च्या कार्यकर्त्यांना भेटण्याचे धाडस नरेंद्र मोदी यांनी दाखवले नाही. हा विरोधाभास यात्रेच्या निमिताने लोकांना अधोरेखित करता आला आहे.

▪️राजकीय वातावरण बदलण्याची
क्षमता यात्रेत आहे का?

ही यात्रा राजकीय आहे आणि ती राजकीयच असली पाहिजे.
लोकशाहीमध्ये देशाचे भविष्य राजकारणाद्वारे निश्चित होत असते. देश नष्ट करण्याचे काम ज्या राजकारणातून होत आहे, तिथूनच देशाला वाचवण्याचे कामही केले पाहिजे. ही यात्रा फक्त निवडणुकीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून निघालेली नाही हे खरे. या यात्रेतून काँग्रेस पक्ष कदाचित मजबूत होईल, निवडणुकीतही त्यांना लाभ मिळेल. त्यापलीकडे जाऊन या यात्रेचा विचार केला पाहिजे. देशावर गडद काळे ढग जमलेले असताना एखादा आशेचा किरण दिसू लागला तर ही यात्रा यशस्वी झाली असे म्हणता येईल. बलात्कार आणि हत्येच्या क्रूर घटनेतील दोषींना केंद्रीय सत्ता मोकळे सोडून देते. पण, सत्तेला जाब विचारण्याची हिंमत विरोधी पक्षांमध्ये नाही. ही यात्रा सत्तेविरोधात उभे राहण्याची ताकद देत असेल तर, ही यात्रा यशस्वी मानता येईल.

▪️यात्रेतून लोकांना काय मिळेल?
हजारो लोक एकत्र पदयात्रा करत आहेत, त्याची छायाचित्रे, चित्रफिती, ड्रोनवरून टिपलेले गर्दीचे क्षण हे सारे पाहून, सत्तेला आव्हान दिले पाहिजे, असे वाटणारा ‘मी एकटा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचू लागला आहे. संघ-भाजपला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला रोजच्या जगण्यामध्ये आसपासच्या लोकांमध्ये, व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये, कुटुंबामध्ये एकटे पाडले जाते आहे, हे अनेकांनी अनुभवले आहे. ज्या गोष्टी कोणी बोलत नव्हते, त्या कोणी तरी जाहीर पणे बोलत आहे. अनेक बोचणारे प्रश्न कोणीतरी यात्रेद्वारे विचारत आहे. यात्रा लोकांच्या मनातील भीती मोडून प्रश्न विचारण्याचे धैर्य देत आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker