भाषाप्रभु : कुसुमाग्रज !


मराठी भाषेचा शुक्रतारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस जो ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रज यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर पुढे ते वामन शिरवाडकर या कुटुंबाकडे दत्तक गेले आणि त्यांचे नाव बदलून विष्णू असे झाले. पुढे साहित्याच्या क्षेत्रात तात्यासाहेब या टोपण नावाने ओळखले जावू लागले. आपली धाकटी बहीण कुसूम च्या सन्मानार्थ तात्यासाहेबांनी कॉलेज जीवनापासूनच ‘कुसुमाग्रज’ हे टोपण नाव धारण करून काव्यलेखन करत होते. ( कुसुमचा अग्रज म्हणजे मोठा भाऊ) वडिलांच्या व्यवसायामुळे शालेय जीवनापासूनच त्यांना स्थैर्य लाभले नाही. नाशिक, पुणे, मुंबई करून त्यांनी शिक्षण घेतलं. कॉलेज जीवनात लोकमान्य टिळकांची स्वराज्याची चळवळ जवळून पाहिली, गांधीजींचा सत्याग्रह व राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय कार्य जवळून पाहिले आणि अंतर्मुख होऊन राष्ट्रीय बाणा आणि मराठी अस्मिता जोपासत वाचन -लेखनाकडे वळले. त्यांनी ‘सीता -सुलोचना’ हे नाटक लिहिले ,कवितांचे गायन आणि नाटकात काम करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. त्यांनी आपल्याच नाटकातील लक्ष्मणाची भूमिका बजावली या भूमिकेबद्दल बोलताना प्रभाकर पाध्ये त्यांना विचारतात,” तुमच्या नाटकातली सीता किती सुंदर होती?” त्यावर कुसुमाग्रज म्हणतात,” छे, मी तिच्या चेहऱ्याकडे कधी बघितलंच नाही. कारण मी तिचा देवर होतो ना! फक्त तिच्या पायाकडेच बघत होतो!” कुसुमाग्रज बालपणापासूनच साहित्य कलेवर जीवापाड प्रेम करणारे संस्कारशील मनाचे होते. याची प्रचिती या विधानावरून येते.
कॉलेज जीवन संपवून ते मराठी साहित्य सेवेत पूर्णवेळ कार्यरत झाले. चरितार्थ भागावा म्हणून ते प्रभात, सारथी, धनुरधारी इत्यादी वृत्तपत्राचे कामही करत होते. याच काळात त्यांच्या लेखन तपश्येला’ विशाखा’ च्या रूपाने गोड फळ लगडले आणि पाहता पाहता महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी आणि लेखकांच्या पंक्तीत ते पोहोचले. पुढे त्यांच्या लेखणीला धार येऊन त्यांनी मुंबई साहित्य संघाच्या वार्षिक उत्सवातून दूरचे दिवे, दूरचा पेशवा, वैजयंता, राज मुकुट ही नाटके रंगभूमीवर आणले आणि त्यातून जीवनावर व समाजावर प्रेम करा हा संदेश दिला. त्यांची ‘विशाखा ‘जशी मराठी कवितेचं सोनेरी पान ठरली तसेच ‘राजमुकुट’ हे शेक्सपियरच्या ‘मॅकबेल ‘चे रूपांतरित नाटक अजरामर ठरले. पुढे लग्नानंतर ते नाशिकला स्थिरावले आणि मराठी माती, स्वगत ,हिमरेषा, जीवन लहरी इत्यादी कविता संग्रहाची बरसात झाली आणि कविता म्हणजे ‘कुसुमाग्रज ‘ही स्थिती निर्माण झाली. पुढे ययाती आणि देवयानी ही त्यांची नाटकेही फार गाजली जी समाज वास्तवाचा ठाव घेणारी होती .कविता नाटकाप्रमाणेच कादंबरी ,कथा लेखनही त्यांनी निष्ठेने केले वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या कादंबऱ्या राष्ट्रीयता आणि देशाभिमान प्रज्वलित करणाऱ्या, भारतीय समाज मन, मध्ययुगीन संतांची भक्ती व गांधीजींच्या कार्याची महती सांगणाऱ्या आहेत. ज्या निसर्गदत्त कल्पना आणि कल्पकतेचे आगार आहेत.


कुसुमाग्रज केवळ साहित्यिक नव्हते तर ते मानव मुक्तीच्या चळवळीचे पाईक होते. साहित्य संघ चळवळी ,बरोबरच त्यांनी समाजसेवी चळवळी, सत्याग्रह, अस्पृश्यता निवारण चळवळीत सक्रिय भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत रस्त्यावर उतरून मराठी भाषिक महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. काळाराम मंदिर प्रवेशाचा डॉ. बाबासाहेबांचा लढा आपला मानून अस्पृश्यता निवारणासाठी रस्त्यावर उतरून खांद्यावर वार त्यांनी झेलले होते. त्यांच्या मनात कायम गरीब -श्रीमंत ,श्रेष्ठ -कनिष्ठ, गरिबांचे होणारे शोषण याविरुद्धची खदखद होती ,पण अफाट चिंतनाने त्यांचा स्वभाव तुटक, अलिप्त आणि अबोल झाला होता. आनंद असो वा दुःख ते कधीच मनाचा समतोल ढळू देत नव्हते. पत्नीच्या निधनानंतर त्यांना आलेलं एकाकीपण त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही. उलट आपल्या मनातील एकाकी पण, समाजातील अनिष्ट प्रवृत्तीविरुद्धचा बंड, मनातला राग ते साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करत होते. ते म्हणत,” जखम वरून न बांधता आतून औषधी घ्यावी, आजच्या चळवळी या मलमपट्टी होत आहेत रोग तसाच राहतोय” ते उथळ चळवळीच्या उथळ कार्याचा समाचार घेतात. मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगताना, “माणूस किती जगतो ते महत्त्वाचे नाही, कसं जगतो हे महत्त्वाचा आहे” असे सांगत.


माणसाने दुःख जवळ ठेवून सुखाची उधळण करत करत स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगाव. आपल्या जगण्याचा अर्थ बांधिलकी असावा. आपले जगणे आकाशातल्या शुक्राच्या चांदणी सारखे आढळ स्थानी असावे” असे ते वारंवार सांगत. आणि “शंभर फुटाच्या वाळवंटापेक्षा दहा फुटाची फुलबाग चांगली” असं ते मानतात, आणि चांगलं ,आनंदी जगण्याचा सल्ला देतात. ते आपल्या मनातील पराकोटीचे दुःख ,हातबलता, एकाकीपण वारंवार व्यक्त करतात आणि म्हणतात,” सूर्याचे दुःख कोणते, तर त्याला काळोख पाहता येत नाही. सोन्याचे दुःख कोणते, तर त्याला संत सहवास मिळत नाही, आणि कवीचे दुःख कोणते तर त्याला सांगायचे ते मधीच सांगता येत नाही”. कुसुमाग्रज बोलघेवड्या चळवळींचा निषेध करतात आणि समाजातील अज्ञानी दारिद्र्य नारायण, जात -धर्माच्या ओझ्याखाली दबलेल्या माणसांच्या उद्धारासाठी लढले पाहिजे ही भावनाही व्यक्त करतात,” त्यांच्यासाठी काळजा मधली|
माया थोडी सुटली पाहिजे” ही तळमळ व्यक्त करतात. अज्ञानी जणांना त्यांचा उद्धार शिक्षणातच आहे ही भावनाही ” भिक आणि भिक |
डोळे पुसून थोडे तरी शिक” अशा पद्धतीने ते व्यक्त करतात. सामान्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन शिक्षणासाठी प्रेरितही करतात.
सामाजिक एकता ,समता त्यांच्या लेखनाची मूळ प्रेरणा आहे समाजातील विषमता दूर व्हावी यासाठी ते दलित बांधवांवर होणारे हल्ले आणि समाजामध्ये नसलेली एकतेची भावना, अस्पृश्यता, भेदभाव याचा ते विरोध करतात आणि लिहितात,”जुने जाऊ द्या मरणा लागुनि
जाळूनि किंवा पुरून टाका
सडत न ऐका ठायी ठाका
सावध ऐका पुढच्या हाका
खांद्यावर चला खांदा भिडवूनि|”


जुनं जे जे म्हणून अनिष्ट आहे तेथे नाकारून नव्याचा स्वीकार करा आणि आनंदाने जगा हाच संमतेचा संदेश कुसुमाग्रज देतात.
कुसुमाग्रजांची कविता ही केवळ खाजगी अनुभव मांडणारी नसून ती पददलित, दिनदुबळ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारी आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती नाही तर रुपयाच्या नाण्याभोवती फिरते हा वर्ग संघर्षाचा लढाही त्यांच्या कवितेतून अधोरेखित होतो. सामान्यांचे शोषण उपासात्मक पद्धतीनेही ते मांडतात आणि समतेचा, एकतेचा केवळ डांगोरा पिटणाऱ्या व्यवस्थेवर कोरडेही ओढतात,”उन्हात निखारलेली खडी
फुटता फुटेना
स्तनाला चिकटलेलं मुल
सुटता सुटेना”ही असमानतेची दरी अत्यंत दुःखी मनाने ते रेखाटतात. कुसुमाग्रज यांच्या जीवनावर बालपणापासूनच गांधी ,लोकमान्य टिळक यांचा प्रभाव असल्यामुळे ब्रिटिशावरील जनमानसात वाढत चाललेला आक्रोश त्यांनी आपल्या काव्यातून व्यक्त केलेला आहे व क्रांतीला प्रेरक अशी काव्य निर्मिती केलेली आहे ते लिहितात ,”सरणावरती आज आमुची पेटतांच प्रेते
उठविला त्या ज्वालांतून भाविक्रांतीचे नेते
लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार
आई खळाखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार”कुसुमाग्रज हे मानवतेचे पुजारी होते माणसाने काळाबरोबर वाटचाल करत असताना पृथ्वीतलावरच्या पुत्रावर अन्याय झाला तर तो कसा नाकारायचा, अन्यायाविरुद्ध बंडखोरी करून माणसाची पूजा कशी करायची ते सांगतात. इसवी सन 1962 सालच्या चिनी आक्रमणाप्रसंगी ते दिसून आले. त्यावेळी भारत मातेची अस्मिता आणि समाजाचा प्रक्षोभ कुसुमाग्रजांनी आपल्या काव्यातून व्यक्त केला आहे,”बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळले
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते”कुसुमाग्रज यांची कविता ही खाजगी अनुभव मांडत नाही तर पददलित, दिन- दुबळ्या आदिवासींच्या जखमावर फुंकर घालणारी आहे त्यामुळे ते वर्ग संघर्ष आणि भ्रष्ट सामाजिक तेथून आलेली उदासीनता उपहासात्मकपने ते मांडतात. आदिवासींबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम आणि करुणा आहे आदिवासी या देशाचे मूळ मालक असूनही त्यांना येथे आजही भुकेसाठी तडफडावे लागते नागरवस्ती पासून दूर डोंगर कपाऱ्यात, दऱ्याखोऱ्यात पालीसारखे चिकटून अस्तित्वहीन जीवन जगावे लागते, अंगभर सुरकुत्या पडलेली माणसं, कुपोषणाने ग्रासलेले आहेत या विषमतेची चीड, दाहकता ते आपल्या कवितेतून मांडतात. कोणीतरी व्यापाऱ्याने सडलेले धान्य फेकल्याचे ऐकून आदिवासी स्त्री त्यावर कशी तुटून पडते याचं दाहक वर्णन ते आपल्या कवितेतून करतात,”बाईने आपला हंबरडा
आवरला घशामध्ये अर्ध्यावरच
मुलाचे कलेवर टाकले खाली
आणि घरातल्या पिशव्या गोळा करून
ती बेफाम धावत सुटली
उकिरड्याकडे वाहणाऱ्या यात्रेमध्ये
सामील होण्यासाठी”
कुसुमाग्रज हे समाजातील सर्व घटकांकडे सूक्ष्म दृष्टीने पाहतात आणि त्याचे निरीक्षण आपल्या कवितेतून टिपतात. सामाजिक, शैक्षणिक विषयांबरोबरच वेळप्रसंगी राजकीय उपहासही ते आपल्या कवितेतून करतात. ते महापुरुषांचे पुतळे म्हणजे संगमरवरी मरण मानतात. पुतळ्यांच्या नावाखाली महापुरुषांची होणारी विटंबना ते शब्दबद्ध करतात त्यांच्या नावाने होणारे राजकारणही उपासात्मकपणे मांडतात,”ज्योतीराव परवडत नसले तरी
त्यांचे पुतळे आम्हाला परवडतात
आणि वर्षातून एकदा
घनघोर आठवतात
लांबरुंद भाषणासाठी”ही राजकीय स्थितीची खंतही व्यक्त करतात. ते एका कवितेतून गांधीजींचे आत्मकथन मांडतात शहरातले पुतळे एकत्र येऊन जेव्हा आपापल्या कमाईचा हिशोब करू लागतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते अखिल मानव जातीसाठी काहीतरी भव्य दिव्य करूनही आपण लोटलो गेलो आहोत फक्त आपल्याच जातीच्या आकसलेल्या प्रदेशात. ज्योतिबा फक्त माळ्यांचे शिवराय फक्त मराठ्यांचे आंबेडकर फक्त बौद्धांचे झाले म्हणून त्यांचे पुतळे चौकात चौकात लावले जातात तेव्हा आपल्या गळ्यातला गहिवर गांधीजी पुतळ्याच्या रुपयाने माडतात,”तरी तुम्ही भाग्यवान
एकेक जात जमात तरी
तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यांची भिंत!”कुसुमाग्रज हे भाषाप्रभू होते .कठोरपणे समाज व्यवस्थेवर कोरडे ओढणारे, राजकीय उपासात्मक लेखन करणारे कवी म्हणूनही प्रसिद्ध होते ,त्याचबरोबर अंतर्मनातून हळवे आणि प्रेम अनुभव व्यक्त करणारे कवीही होते कुसुमाग्रजांच्या मनातील प्रेम हे उदात्त स्वरूपाचे होते. प्रेम कोणावर करावं, त्यात शुभ-अशुभ, चांगले -वाईट ,गरीब- श्रीमंत, शत्रू- मित्र असे पाहून करू नये तर राधेच्या वत्सलतेवर आणि कुरूप, विद्रुप, कुजट तेवरही तितकंच प्रेम करावे, तसेच कंसाच्या काळजातील द्वेशावर ,तळमळणाऱ्या सावजांवर प्रेम करावं .प्रेम अनंत गोष्टीवर करावं असे ते सांगत,”प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणि खडंगाच्या पात्यावरही करावं”अशी प्रेमाची कणखरता ते व्यक्त करतात. ज्याला मारायचं त्याच्यावरही प्रेम करावे आणि ज्याला तारायचं त्याच्यावरही तितकंच प्रेम करावे. प्रेम हे उत्तुंग असतं असा मानवी जीवनाशी असलेला प्रेमाचा संयोग ते आपल्या काव्यातून मांडतात.
मराठी भाषा ही त्यांचा जीव की प्राण होती . संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले ते सेनानी होते महाराष्ट्र मराठी भाषा याविषयी त्यांच्या मनात सार्थ अभिमान होता त्यांनी लोकहितवादी मंडळाची स्थापना करून मराठी संस्कृती व भाषा जतनाचे कार्य नेटाने केले ते मराठी विषयी लिहितात,”माझ्या मराठी मातीला
नका म्हणू हीन दिन
स्वर्गलोकाहून थोर
मला तिचा अभिमान”.
कुसुमाग्रज हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे कवी होते. समाजातील सर्व स्तरातील माणसांचे सुखदुःख त्यांनी काव्याच्या माध्यमातून अधोरेखित केलेले आहे भारताच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा आदर ते व्यक्त करतात त्याच बरोबर समाजातील विषमता, अंधश्रद्धा, लुटमार यावरही कोरडे ओढतात. सामान्य माणसाच्या मनात क्रांतीची प्रेरणा- ज्योत प्रज्वलित करतात. त्याचबरोबर मराठी भाषेचे गुणगान , भारत मातेची अस्मिता आणि समाजाच्या प्रक्षेप काव्याचा विषय बनवतात. पारंपरिक चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर ते प्रहार ओढून दलितां बरोबरच आदिवासींच्या शोषणकर्त्यांवर कोरडेही ओढतात. स्त्रियांवर होणारे अत्याचारावर ते तटस्थपणे बोलतात. स्त्रियांच्या शिक्षणाचा आग्रह ते धरतात .सामाजिक चळवळी या वरवरच्या मलमपट्टी आहेत याचाही ते समाचार घेतात. उदात्त प्रेमाचाठावही ते घेतात. ते आजही आपल्या लेखनाच्या समाजाभिमुख कार्याच्या माध्यमातून समाज मनात घर करून तेवत आहेत त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिनंदन व सर्वांना शुभेच्छा.


प्रा. डॉ. देविदास खोडेवाड
मराठी विभाग प्रमुख
खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई
मो.नं. 97 64 210 313