भारत जोडा यात्रा पार्श्वभूमीवर योगेंद्र यादव यांची जनसंवाद यात्रा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/default_1630485944.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/default_1630485944.jpg)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूरपासून भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर ते नांदेड जनसंवाद यात्रा होणार आहे. उद्या बुधवारी बिंदू चौक आणि दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने स्वराज्य इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांची राजर्षी शाहू स्मारक भवनात जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली ते नांदेड अशी ही यात्रा होणार आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता बिंदू चौक ते दसरा चौक अशी जनसंवाद यात्रा होईल. जाहीर सभेला माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार संपतराव पवार, श्रीपतराव शिंदे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, विजय पोवार यांची उपस्थिती असेल. दुपारी इचलकरंजी आणि सायंकाळी जयसिंगपूर येथे पदयात्रा व जाहीर सभा होणार आहे.
भारतजोडो यात्रे समर्थनार्थ सांगली मध्ये सभा
दरम्यान, सांगलीमध्ये जुन्या स्टेशन चौकमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेलाही योगेंद्र यादव मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 7 वाजता ही सभा होईल.
दुसरीकडे स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. मात्र, त्यांनी अलीकडेच याबाबत बोलताना खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, सत्तेच्या उच्चपदावर बसलेले लोक देशातील वातावरणात विष पसरवत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या यात्रेचा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांवर काय परिणाम होईल, असा प्रश्न एका पत्रकाराने यादव यांना विचारला होता.
विजय पराजय सुनिश्चित करण्यासाठी यात्रेला पाठींबा देत नाही
यावर योगेंद्र यादव म्हणाले की, नागरी समाजाचे कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचा विजय किंवा पराभव सुनिश्चित करण्यासाठी या यात्रेला पाठिंबा देत नाहीत. कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे नाव न घेता ते म्हणाले, “देशाच्या वातावरणात विष मिसळले जात आहे. सत्तेतील लोक देशामध्ये विष कालवत आहेत. या लोकांनी त्यांच्या दोन राजवटीत इतके विष ओतले आहे की ते संपवायला दोन पिढ्या लागतील आणि याच चिंतेने आम्हाला येथे आणले आहे.