भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या गाडीला केज जवळ अपघात;


भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कारला समोरून येणाऱ्या रिक्षाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्या सोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. हा अपघात आज शनिवारी (दि.१५) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मस्साजोग (ता. केज) जवळ झाला.
माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे. त्यासाठी बीड येथील कार्यक्रम आटोपून माधव भंडारी आणि राम कुलकर्णी हे कारमधून अंबाजोगाईकडे निघाले होते. मस्साजोगजवळ त्यांच्या समोरून येणारा अॅपे रिक्षा मातीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने पलटी झाला आणि भंडारी यांच्या कारला धडकला. भंडारी यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून माधव भंडारी, राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. तर, रिक्षाचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर भंडारी हे अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झाले असून ते तिथे मुक्कामी असणार आहेत.